देवरूख : येथील रहिवासी मदन वामनराव मोडक आणि सौ. मंजिरी मदन मोडक यांनी नागपूर येथे वनवासी कल्याण आश्रमासाठी एक कोटी अकरा लाख रुपये देणगीचा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या हाती नुकताच सुपूर्द केला.
वनवासी कल्याण आश्रम देशभरातील वनवासी समाजाच्या विकासासाठी कार्यरत आहे. कल्याण आश्रम देशभरात विद्यालय, एकल विद्यालय, आश्रमशाळा चालवत आहे. या प्रकल्पामध्ये एक लाखपेक्षा अधिक विद्यार्थी शिकत आहेत. संस्थेद्वारे व्दारा रुग्णालय, आरोग्य केंद्र, आरोग्य शिबिर, ग्रामआरोग्य रक्षक योजना अशा माध्यमांमधून लाखो रुग्णांची सेवा केली जाते. या सामाजिक कार्याला श्री. मोडक यांनी देणगी दिली आहे.
श्री. मोडक देवरूख येथील प्रतिष्ठित बागायतदार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते देवरूखमधील श्री स्वामी समर्थ सेवक प्रतिष्ठान, देवरूख शिक्षक प्रसारण मंडळ, कोकण मराठी साहित्य परिषद अशा विविध संस्थांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी उभारलेल्या शहीद जवान स्मारक प्रकल्पाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली होती. अशा सेवाभावी मोडक यांनी स्वत: वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाची माहिती घेऊन एक कोटी अकरा लाख रुपयांची देणगी दिली आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. मोडक म्हणाले की, “माझे वडील भारतीय सेनेत होते, त्यांच्याकडून मिळालेल्या संस्कारातून मला ही सेवेची प्रेरणा मिळाली. सामाजिक बांधिलकीतून मी ही मदत करत आहे.”
आश्रमाचे अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांनी सांगितले की, भामाशाह याने जशी राणा प्रताप यांना मदत केली तसे आज सामाजिक कार्यासाठी भामाशाह आवश्यक आहेत. याप्रसंगी मोडक परिवाराला कल्याण आश्रमाच्या वतीने धन्यवाद दिले.
कार्यक्रमाला कल्याण आश्रम विदर्भ अध्यक्ष नीलिमाताई पट्टे, संघटन मंत्री अतुल जोग, युवा प्रमुख वैभव सुरंगे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया आणि श्री. मोडक यांच्या दोन्ही कन्या सपरिवार उपस्थित होत्या.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

