पळून चाललंय गाव, आचरे त्याचं नाव

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरे इथली गावपळण १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. २०१९ सालानंतर यंदाचं वर्ष गावपळणीचं असल्याने प्रथेनुसार देवदिवाळीला श्री देव रामेश्वराचा कौल घेण्यात आला. त्यानंतर हे दिवस निश्चित झाले. गावातली सगळी मंडळी या काळात बाहेर जातात. आजच्या काळातही पाळल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथेबद्दल आचरे गावातले ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला लेख इथे प्रसिद्ध करत आहोत.
……………..
आज पाच वर्षांच्या खंडानंतर येणारी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आणि दत्तजयंतीचा दुसरा दिवस! रामेश्वराच्या कृपाप्रसादाने चार वर्षांनी आलेल्या ‘गावपळणीला’ उत्साही आचरेवासीयांचा पळून जाण्याचा शुभमुहूर्त. रामेश्वर संस्थान मजरे आचरे गाऊडवाडी. बारा वाड्यांचे, बारा चौकड्यांचे आणि सात हजार लोकवस्ती असणारे हे ऐतिहासिक गाव. या गावाला आज पहाटे पहिल्या प्रहराला जाग आलेली असणार. गोठ्यातील गाई, वासरे, बैल, म्हशी, पहाटेपासून शेपट्या वर करून आणि हंबरून सांगत असतील, ‘बा माझ्या मालका, आम्हालादेखील तुझ्याबरोबर पळून यायचं हाय.’ आचरे गावातील समस्त शेतकरी, दुकानदार, व्यावसायिक, मजूर, बायाबापड्या आणि मुलेदेखील आज पहाटेच उठून आपला बाडबिस्तरा आवरून दुपारचे दोन कधी वाजतात आणि रामेश्वराच्या नगारखान्यातील नगारा कधी दणाणतो याची वाट पाहत असतील.

गावपळणीदिवशी दुपारी रामेश्वराची नौबत धडधडू लागते. (सर्व फोटो कपिल गुरव (आचरे) यांच्या सौजन्याने)

हळूहळू आज दुपारचा प्रहर जवळ येईल. दुपारी दोन वाजता श्री देव रामेश्वर संस्थानाचे सर्व बारा-पाच मानकरी रामेश्वर मंदिरात जमा होतील. एकमुखाने रामेश्वराला गाऱ्हाणे घातले जाईल, ‘बा देवा रामेश्वरा महाराजा, तुझ्या हुकमाप्रमाणे आज आम्ही गाव फोडत आहोत. सगळ्यावर रखवाली खरी करून तुझी ही प्रभा खरी करून घे.’ या गाऱ्हाण्याला ‘होय महाराजा’चे स्वर आणि घंटा गाभाऱ्यात निनादू लागताच रामेश्वराच्या प्रांगणात तोफा गर्जू लागतील. नगारखान्यातील प्रचंड नगारा दणाणू लागेल. सर्व बारा-पाच मानकऱ्यांच्या हाताने रामेश्वराचे पहिले महाद्वार बंद होईल. त्यानंतर दुसरे महाद्वार, दिंडी दरवाजा – असे करत करत रामेश्वराच्या समोरील दरवाज्याचा लाकडी आडणा बारा-पाच मानकऱ्यांच्या हातांनी अलगद सरकवला जाईल. कानठळ्या बसवणारे तोफांचे प्रचंड आवाज, पुन्हा नगारखान्यातील तापलेल्या चामड्यावरील दणदणाट!

मानकरी रामेश्वराच्या महादरवाजाला कुलूप घालताना.

…आणि तो आवाज आचरे पारवाडीपासून आचरे हिर्लेवाडीपर्यंत आणि आचरे वरची चावडीपासून आचरे पिरावाडीपर्यंतच्या आपले सामानसुमान बांधून आणि कान टवकारून असलेल्या समस्त ग्रामस्थांच्या कानी जाईल. समस्त आचरेकरांच्या घरांना, त्यांच्या घरमालकांच्याच हाताने आडणे पडतील, कुलपे लागतील. कुलपांना चावी लावताना मनात म्हणतील, ‘रामेश्वरा, बा तुला दंडवत. सोडून जातो गाव.’ आणि एकाच वेळी समस्त आचरेवासीय रामेश्वराचे नाव घेऊन, सोबत आपली गुरे, वासरे, कुत्री, मांजरे, पोपट, पाळलेली कबुतरे, कोंबड्या घेऊन सीमेबाहेर पडतील.

(आचरे गावाची जवळजवळ सात हजार वस्ती पायी, होडी, बैलगाडी किंवा मिळेल त्या वाहनाने गाव सोडते. गावात सर्व धर्मांचे नागरिक आहेत. हिंदूंसोबत मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध सर्व जण रामेश्वराची आज्ञा पाळून गाव सोडून जाताना…)

आचरे संस्थानच्या बारा चौकड्यांच्या बारा वाड्यांचे बारा हमरस्ते माणसांनी भरून जातील. ‘जनांचा प्रवाहो चालला’ म्हणजे काय हे ज्यांना प्रत्यक्ष अनुभवायचे असेल त्यांनी त्या दिवशी दुपारी एक ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आचरे गावच्या कोणत्याही रस्त्यावर जरी नजर टाकली, तरी त्या नजरेतून दिसून येईल, संस्थान आचरेची ही आगळी परंपरा, विविधतेतून एकता, सामाजिक सलोखा आणि ‘कोणतीही गोष्ट करायची ती दणक्यात’ हा प्रत्येक आचरेवासीयाचा मूलमंत्र.

गावपळण : एक आगळी प्रथा
गावपळणीची प्रथा कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरे पंचक्रोशीत पाहायला मिळते. आचऱ्याला लागून असलेल्या वायंगणी, चिंदर, मुणगे आदी गावांतही दर तीन ते चार वर्षांनी गावपळण होत असते. मुणगे गावात मात्र काही समाजाचीच माणसे गावपळणीची प्रथा पाळतात.

आचऱ्याची रामनवमी, डाळपस्वारी, गणेशोत्सव आदी सण-उत्सवांना जसा संस्थानी थाट असतो, एक आगळेवेगळेपण असते ते आगळेवेगळेपण आचरे गावाच्या गावपळणीतही दिसून येते. चार वर्षे पूर्ण झाली, की गावपळणीचे वर्ष आले याची कुजबुज सुरू होते. शेतकरी आपली नाचणी, भुईमूग, भाताची कापणी वेगाने सुरू करतात. ‘न जाणो म्हाताऱ्यान प्रसाद दिल्यान तर आमका गाव सोडूक व्हयो,’ ही चर्चा शेतापासून घरापर्यंत चालू असते. (आचरे गावात श्रीदेव रामेश्वराला प्रेमाने, आपुलकीने ‘म्हातारा’ म्हणण्याची प्रथा आबालवृद्धांमध्ये आहे.)

गावपळण जाहीर होताच झोपड्या सजतात.

गावपळणीचा प्रसाद म्हणजे उत्साह आणि उधाणाचा प्रसाद
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला रखवालीचे गाऱ्हाणे घालण्यासाठी सर्व बारा-पाच मानकरी मिळून गावपळणीचा कौल लावतात. ‘देवान गावपळणीचो पोटचो उजवो कौल दिल्यान’ याची खात्री झाल्यावर ही वार्ता क्षणार्धात आसमंतात घुमते. संध्याकाळी शेतकरी लोक गावपळणीत राहण्यासाठी तात्पुरत्या मंडपाचा शुभारंभ करतात. (याला गावपळणीची ‘खुंटी’ पुरणे असे म्हणतात) जागांची पाहणी केली जाते. ही वार्ता मुंबईला समजल्यावर निसर्गाच्या सान्निध्यात रामेश्वराचे नाव घेऊन राहण्यासाठी सर्व मुंबईकरांचे पाय रेल्वे बुकिंग ऑफिस, ट्रॅव्हलिंग ऑफिसकडे वळू लागतात. आचरा परिसरातील शैक्षणिक संस्था सुट्टीच्या कालावधीत शाळा कशी भरायची याचे नियोजन करतात. सरकारी कार्यालये केवळ चालू ठेवायची म्हणून चालू असतात. ज्यांची शेतीवाडी नाही ते आपल्या पै-पाहुण्यांकडे सांगावा धाडतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत प्रत्येक आचरेवासीयांच्या अंगात गावपळण कशी चढत जाते हे अनुभवायचे असेल तर पर्यटकांनीदेखील गावपळणीच्या दिवसात आचऱ्याच्या शेतकऱ्यांनी उभारलेल्या राहुटीत तीन दिवस, तीन रात्री राहिलेच पाहिजे.

झोपडीतील जेवणाच्या पंगती

ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु
‘एकत्र येऊ या, एकत्र राहू या, एकत्र जेवू या’ हा सहजीवनाचा आनंद त्या झापाच्या कावणातच असतो. त्याचे वर्णन आचरे पारवाडी येथील एका शेतकऱ्याने मालवणी कवनात छान केले आहे.
अशी आमची गावपळान
ऱ्हवाक झापाचा कावान
भुकेक माशाचा जेवान
तानेक पेजेचा धुवान
मजेक इस्पिकाचा कुटान
थंड्येक इडयेचा खुटान
निजेक गोणपाटाचा किंतान
असा तीन दिवस भायर मजेत ऱ्हवान
घराक जावचा नदीतसून पेवान।

खरोखरच आचरे गावाची गावपळण अनुभवायची असेल, तर ती आचरे गावच्या सीमेलगतच असलेल्या गवताच्या झोपड्यांतून आणि झापाच्या कावणातून. वास्तव्य जरी तीन दिवस-तीन रात्री असले, तरी त्याची जय्यत तयारी पंधरा दिवस चालू असते. जमिनी तीन-चार वेळा सारवल्या जातात. प्रत्येकाची घरे नव्याने सजतात. जेवण विभाग, कोंबड्यांसाठी वेगळी जागा, गुरांचा गोठा, झिलग्यांची इस्पिका कुटुची स्वतंत्र खोली, पोरग्यांका धूमशानासाठी वेगळा हॉल आदी हौसेने उभारले जाते. गावपळणीची जेवणेदेखील लज्जतदार लागतात. सोबत नेलेल्या कोंबड्यांची संख्यादेखील गावपळणीच्या कडाक्याच्या थंडीत कमी करायची असते. नदीच्या माशांचे कालवण आणि शिकारीचे मटण झाल्याशिवाय गावपळणीच्या रात्रीच्या जेवणाला टेस्ट येत नाही. कुर्ल्याला जाणे, वावळीला जाणे आदी कार्यक्रम तर गावपळणीत अलिखित असतात. रात्री एकत्र भजने, भेंड्या, अंताक्षरी, बायकांच्या फुगड्या आदी करमणुकीचे कार्यक्रम म्हणजे गावपळणीची खास मेजवानी. सतत संसारात राबराब राबणाऱ्या बायकांबरोबर पुरुषांचेदेखील माहेरपण या रामेश्वराने एकाच वेळी साजरे करायला दिलेले असते.

झोपडीतील तीन-चार दिवसांची करमणूक

म्हणून संस्थान आचरे गावाची गावपळण बारा वाड्यांच्या सीमेबाहेर केवळ साजरी होत नसते, तर ती अक्षरशः संपन्न होत असते. त्यांच्या गप्पा आणि गजाली पुढची गावपळण येईपर्यंत पाच वर्षे अक्षरशः चवीने चघळल्या जातात.

छत आकाशाचे आमुच्या घराला
आचरे गावाचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर शिवशंभूने चार वर्षांतून एकदा आपल्या भूतगणांना वावर करण्यासाठी हे तीन दिवस दिलेले असतात. त्यामुळे गावात न थांबता सर्व जण वेशीबाहेरची परंपरा जोपासतात. तसेच हा गाव पूर्वी नांदत नव्हता. तो नांदावा म्हणून तीन दिवस गाव ओस पाडेन, असे वचन रामेश्वराने दिल्याने तीन ते चार वर्षांतून ही गावपळण होऊन गाव अक्षरशः ओस पाडला जातो. अशा प्रथा जुन्याजाणत्या माणसांकडून सांगितल्या जातात; पण ‘रामेश्वरावर आमची नितांत श्रद्धा आहे. त्याने म्हटले की जायचे आणि त्याने म्हटले की यायचे,’ हा एकच महानियम आम्ही मानतो. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या बाबींची चर्चा ज्यांना करायची असेल त्यांनी खुशाल करावी! रामेश्वर हीच आमची श्रद्धा, या एकाच मूलमंत्राने भारावून प्रत्येक जण आपले घर सोडत असतो.

झोपडीसमोर रांगोळ्या

आकाशाचे छत म्हणजे आमचा रामेश्वर! तृणांकुराची शय्या म्हणजे आमचा रामेश्वर! दगडाची व चिऱ्याची उशी म्हणजे आमचा रामेश्वर! हीच श्रद्धा प्रत्येक आबालवृद्धाची असल्याने हे तीन दिवसांचे आगळे माहेरपण बायकांबरोबर पुरुषही अनुभवत असतात. गावपळणीच्या काळात आचरे गाव भयाण वाटते. ‘माणसाशिवाय गाव’ ही कल्पना डोळ्यांनी बघणेसुद्धा महाभयंकर असते. तो आवाज, तो कोलाहल, ते हसणे, ती भांडणे, सारे कसे शांत, शांत, रामेश्वरसुद्धा तीन दिवस अगदी शांतपणे कैलासी समाधी लावून बसलेला असतो, आपल्या आचरेवासीयांचे कल्याण चिंतित!

श्री रामेश्वर मंदिर संस्थान, आचरे

गाव पळून गेलेले असले तरी रामेश्वराचे नैमित्तिक कार्यक्रम मात्र तसेच चालू असतात. त्यात खंड नसतो. रामेश्वराची त्रिकाल पूजा, महानैवेद्य, महाआरती आदी कार्यक्रम ठरल्याप्रमाणे, ठरल्यावेळी होत असतात.

गाव भरताना तोफा कडाडतात, नौबत झडू लागते. गाव आपल्या लेकरांना पुन्हा साद घालू लागतो.

म्हणून एक तरी गावपळण अनुभवावी
शेवटी आपलं राहतं, नांदतं गाव प्रत्येकाला कधी ना कधी सोडावंच लागतं. मुलींना लग्न होऊन सासरी जाताना, मुलांना नोकरीनिमित्त परगावी जाताना, थोरा-मोठ्यांना उद्योग-धंद्यानिमित्त परदेशी जाताना आणि शेवटी इहलोकीचे अवतारकार्य संपल्यावर प्रत्येकाला आपला गाव सोडून परलोकी जातानासुद्धा! आनंदात कसे जायचे? पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘कण्हत, कण्हत की गाणे म्हणत?’ हा गाणे म्हणत गाव सोडण्याचा अनुभव एक वेगळाच असतो. तीन दिवस-तीन रात्रींसाठी सर्व संसारावर तुळशीपत्र ठेवून गाणे म्हणत रमण्याचा तो क्षण! याचा अनुभव गावपळणीच्या या अनोख्या ट्रेलरमधून प्रत्येकाला येत असतो. गावपळणीचे मंतरलेले ते तीन दिवस आणि मंतरलेल्या तीन रात्री प्रत्येकाला आगळेवेगळे तत्त्वज्ञान शिकवून जातात. त्या तत्त्वज्ञानाचे मोल कोणत्याच मापात होऊ शकणार नाही. म्हणूनच प्रत्येक आचरेवासीय आपल्याला धन्य मानतात की, ‘देवानेच आपल्याला संस्थान आचऱ्याच्या कुशीत जन्माला घातले.’ म्हणूनच म्हटले जाते, प्रत्येकाने एक तरी गावपळण अनुभवावी.

पावले पुन्हा गावी वळताना.


गाव भरू लागण्याचे वेध
तीन दिवस-तीन रात्री मजेत घालवल्यावर तेथील बकऱ्यांच्या झुंजी, कोंबड्यांच्या झुंजी मनमुराद अनुभवल्यावर (त्या बकऱ्या आणि कोंबड्यांच्या झुंजीचा निकाल एकाच असतो – जिंकले तरी मटण आणि हरले तरी मटण! शेवटी दोघांचा निकालच आणि जिभेची लज्जत) तीन रात्री झाल्यावर बारा-पाच मानकरी गाव भरविण्याचा कौल लावतात. कौल झाला नाही, एक दिवस वाढला, तरी आचरेवासीय खुशीत असतात. कारण एक दिवस वाढल्याने येणारी संकष्टी त्यांना त्या झोपडीतच साजरी करता येते. मार्गशीर्षातील व्रते, मार्गशीर्षातील घट त्या झोपडीतच बसतात. शेवटी म्हणतात ना, माणसाचा देव माणसाबरोबरच. पुन्हा चौथ्या दिवशी सर्व मानकरी देवळात जमून गाव भरविण्याचा कौल लावतात. कौल झाल्यावर पुन्हा तोफांचे आवाज, पुन्हा नौबतीच्या इशारती – आपल्या माणसांना परत गावात बोलवण्यासाठी! पण तत्पूर्वीच कौल झाल्याची बातमी वाऱ्याबरोबर सर्व चतुःसीमा पार करते. पुन्हा रस्ते फुलून जातात, माणसांनी आणि गुरावासरांनी प्रेमभराने गावात परतण्यासाठी गाव पुन्हा सर्वांना बोलावू लागते. गावाला माणसांची जाग येऊ लागते. संपूर्ण आचरे संस्थान जुनी कात टाकून नव्या उमेदीने ताजेतवाने होते, आणि पुढील चार वर्षांनी येणाऱ्या गावपळणीची आतुरतेने वाट पाहू लागते.

– सुरेश ठाकूर 
संपर्क : 
९४२१२ ६३६६५

(हा लेख सुरेश ठाकूर यांच्या ‘शतदा प्रेम करावे’ या पुस्तकातील असून, ते पुस्तक उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ठाकूर यांच्या परवानगीने हा लेख येथे प्रसिद्ध करण्यात आला आहे. ई-बुक बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे. ते खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply