आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूणमध्ये?

चिपळूण : आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यास येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर इच्छुक असून त्याबाबतचे पत्र संस्थेतर्फे अ. भा. मराठी साहित्य महामंडळाला देण्यात आले आहे.

शतकोत्तर परंपरा जपणाऱ्या, चिपळूण शहराला कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संस्थेने आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला नवी दिल्ली येथील संमेलनात याबाबतचे निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन याच संस्थेने यशस्वी केले होते. चिपळूणच्या संमेलनाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात नवा मानदंड निर्माण केल्याचे बोलले जाते.

लोकमान्य टिळक स्मारक ही निःस्पृह कार्यकर्त्यांचे बळ लाभलेली, संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील जिज्ञासूंमध्ये चिपळूणची ओळख सांगणारी, इथल्या श्रोत्यांना सजग आणि बहूश्रुत बनवून शहराचे सामाजिक भान उत्तम विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी संस्था म्हणून परिचित आहे. वाचनालयातर्फे सातत्याने नवनवीन उपक्रम सुरू असतात. त्यामुळे दर्दी लोक वाचनालयाला वारंवार भेट देत असतात. चिपळूणकरांना उत्तमोत्तम ग्रंथांची उपलब्धी, देशभरातील दिग्गजांच्या व्याख्यानांची मेजवानी, ज्ञानवर्धक कार्यक्रम, पुस्तक प्रकाशने, जवळपास सर्व प्रकारच्या साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन संस्थेने केले आहे. सर्व सुजाण संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या खंबीर पाठबळावर वाचनालय आज समृद्ध स्वरूप अनुभवत आहे. या वाचनालयातर्फे दरवर्षी सुमारे पंचवीस पुरस्कार साहित्य-समाज-संस्कृतीअनुरूप उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दिले जातात. महाराष्ट्रात हे सारे पुरस्कार भूषणावह मानले जातात. कोकणाला स्वतःच्या आत्मविश्वासाची जाणीव करून देणारे, समाज साहाय्यातून सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारले गेलेले वस्तुसंग्रहालय आणि कलादालन हे वाचनालयाचे दोन्ही भव्यदिव्य प्रकल्प आवर्जून भेट देऊन पाहावेत, पुढील पिढीला समजून सांगावेत इतके महत्त्वाचे आहेत. चिपळूणच्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे उद्घाटक, तर सुनील तटकरे स्वागताध्यक्ष होते.

आगामी संमेलनाचे निमंत्रण पत्र वाचनालयाच्या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अरुण इंगवले, मसापच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे आणि वाचनालयाचे संचालक धीरज वाटेकर यांनी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना सुपूर्द केले. संमेलनाच्या आयोजनासाठी चिपळूणसह सातारा, इचलकरंजी, औदुंबर याही ठिकाणाचे निमंत्रणे महामंडळाला प्राप्त झाली आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply