बहुआयामी व्यक्तिमत्त्व : अरुअप्पा जोशी

रत्नागिरीत शिक्षण, समाजकारण, धर्मकारण, राजकारण आणि अर्थकारण या क्षेत्रांमध्ये ज्यांचा आदराने उल्लेख होतो आणि मार्गदर्शन घेतले गेले, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे अरुअप्पा जोशी ! आज २८ फेब्रुवारी – त्यांचा स्मृतिदिन ! त्यानिमित्ताने या कर्मयोग्याच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा….

नरसिंह विठ्ठल तथा अरुअप्पा जोशी आपल्या कर्तबगारीने संपूर्ण रत्नागिरीकरांना परिचित. मंदिर ग्रामदैवतेचं असो वा ज्ञानाचं, तेथे ईश्वरी अधिष्ठानाबरोबरच अरुअप्पांच्या योगदानाचा परिमळ दरवळत राहिला.

समाजकारणासाठी राजकारण ही त्यांची आग्रही भूमिका. त्यांनी रत्नागिरी नगरपालिकेत नगरसेवक, उपनगराध्यक्ष अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याने एखाद्या प्रश्नाचा सर्वांगीण वेध घेऊन त्यावर विचारमंथन घडवून आणण्यात अरुअप्पा कायम अग्रणी होते. समाजकारण हेच उद्दिष्ट निश्चित असल्यामुळे समाजोपयोगी कामासाठी निधी संकलन करताना त्यांना पक्षीय मतभेद आड आले नाहीत. किंबहुना सर्वपक्षीय मंडळी आप्पांच्या मताला मान देत आणि एखादं काम अगदी लीलया होऊन गेलं, हेच मी पाहिलं.

विविध सामाजिक उपक्रमांत आप्पांचा सक्रिय सहभाग होता. भैरी, विश्वेश्वर, जोगेश्वरी, विठ्ठल अशा अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामदेवता श्री भैरी देवस्थान ट्रस्टचे तर ते तीन दशकं प्रमुख विश्वस्त होते. या देवस्थानच्या नूतनीकरण कामात आप्पांची भूमिका फार मोलाची होती. ते उपक्रमशील असल्यामुळे त्यांना परंपराप्रियतेबरोबरच नावीन्याचा ध्यास होता. या दोघांचा मेळ घालणारी प्रथा – गुढी पाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतासाठी प्रभातफेरी या कल्पनेचे तेच एक प्रणेते. एखाद्या कुटुंबातील मृत्यू, परिसरातील आग अथवा नैसर्गिक आपत्तीचा फटका अशा प्रसंगी संकट निवारणात आप्पा अग्रेसर होते. आप्पांनी जोडलेले स्नेहसंबंधही असेच की त्यांनी साद देताच सारे मदतीला तत्पर.

अरुअप्पा एक यशस्वी करसल्लागार म्हणूनही सर्वपरिचित होते. त्यांनी अनेक आर्थिक संस्थांची निर्मिती, संवर्धन यासाठी घाम गाळला आहे. एखाद्या संस्थेशी आप्पा निगडीत आहेत याचाच अर्थ ती संस्था उत्कृष्टता आणि विश्वासार्हता यांचं प्रतीक आहे, असं जनता मनोमन मानत होती.

शैक्षणिक क्षेत्रात तर आप्पांच्या रूपाने रत्नागिरीतील शिक्षणव्यवस्थेला परिसस्पर्श लाभला, हे आपल्या सर्वांचं भाग्य! रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीत त्यांनी तीन दशकं नियामक मंडळ सदस्य, सहसचिव, उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या नात्याने काम करताना कर्तबगारीचे नवे मापदंड निर्माण केले. ज्या उपक्रमात अरुअप्पांनी प्रवेश केला ते ते क्षेत्र कालिदासाच्या ‘संचारिणी दीपशिखेव’ या उपमेप्रमाणे उजळून निघालं.

त्यांनी १९९५ साली. र. ए. सोसायटीचं कार्याध्यक्षपद स्वीकारले आणि दहा वर्षांतच संस्थेचा चौफेर विकास झाला. सातत्याने नवे उपक्रम, बदलत्या व्यवस्थेचा आधीच वेध घेऊन आवश्यक ते कोर्सेस यामुळे संस्थाविस्तार झाला. केवळ संख्यात्मकच नाही तर गुणात्मक वाढ व्हावी, यासाठी अप्पा जागरूक होते. एका परीने आप्पा कोकणातील शैक्षणिक चळवळीचे नायक होते. र. ए. सोसायटीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या बाबूराव व मालतीबाई या जोशी दांपत्याप्रमाणेच कळसाध्यायही अरुअप्पा जोशींनी लिहावा हा विलक्षण योगायोग!

आप्पांचं वाचन चौफेर. या वाचनाचे सहजसंदर्भ त्यांच्याशी फोनवर बोलतानाही जाणवायचे. ते ‘अमुक दिवशीचा इंडियन एक्स्प्रेस किंवा हा इंडिया टुडे वाच. त्यातील अमुक असा लेख’ असे संदर्भ आवर्जून द्यायचे . उत्कृष्टतेच्या ध्यासापोटी ते चेन्नई, शिवकाशी ते पार दिल्लीपर्यंत भ्रमण करायचे. इंटरनेटवरून, विविध वेबसाइटवरून माहिती हुडकून काढत असत. शिक्षक प्रशिक्षणाविषयी ते अतिशय आग्रही असत, स्पर्धात्मक जगात टिकाव धरण्यासाठी संस्थेच्या कर्मचारीवगनि सतत Update आणि Upgrade झालं पाहिजे, असं त्यांना वाटत असे आणि आप्पांसारखा Source असला की men, money आणि material यांसारख्या गोष्टी सहज resources बनत, हे अनुभवायला येत होतं. योजकस्तत्र दुर्लभः या उक्तीला छेद देत आप्पा साऱ्या गोष्टींचं कुशल संयोजन करायचे.

प्रतिदिन दहा-बारा तासांहून अधिक काम करणारे आप्पा साहजिकच माझ्यासारख्या तरुणांना Role Model होते . त्यांना पदाचा हव्यास, सोस नव्हता, ते स्वतःला कार्यकर्ताच समजत आणि अगदी grassroot level वरील कर्मचाऱ्यांशीही आपुलकीने वागून प्रेरित करत.

फ्युचरॉलॉजी या शास्त्रातील तत्त्वांचा आप्पा वापर करत, भविष्याचा वेध घेत. आगामी शतकाच्या दृष्टीने नजीकच्या दशकांची त्यांना आधीच चाहूल लागायची. येथील भूमिपुत्राची शिक्षणाच्या दृष्टीने आबाळ होऊ नये, म्हणून ते प्रयत्नशील होते. ते कार्याध्यक्ष झाल्यावर रत्नागिरी शिक्षण संस्थेच्या प्रवासाने जी.जी.पी.एस. ते गुरुकुल असा मोठा टप्पा गाठला.

मी जीजीपीएस शाळेत एकूण १० वर्षं शिक्षक म्हणून काम केलं. पहिली काही वर्षं आप्पांशी फारसा संबंध आला नाही. एक प्रसंग मला कायम स्मरणात राहिला. तेव्हा ‘साने गुरुजी गुणवत्ता अभियान’ सुरू होतं. वेगवेगळ्या शाळेतील शिक्षकांची टीम अनुभवी मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या केंद्रातील ( cluster) शाळांची तपासणी करायची. अशा टीममध्ये माझा समावेश होता. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने हे अभियान गांभीर्याने घेतलं होतं. एका संध्याकाळी मी दोन शाळांतील तपासणी करून शाळेत उशिरा परतलो. तेव्हा आप्पा पोर्चमध्ये एकटेच उभे होते. ते म्हणाले, ”उल्हास आला, आता सर्व माहिती मिळेल.” संस्थेच्या अध्यक्षांनी जातीने , आपुलकीपूर्वक लक्ष घातलं होतं, हे दृश्य अभावानेच दिसतं.

नंतर मी शाळेत शिक्षक प्रतिनिधी झालो, संस्थेचा आजीव सभासद झालो. आप्पा व माझा मामा – सुभाष देव सर ही अगदी राम-लक्ष्मणसारखी जोडी होती. दोघांनी संस्थेच्या विकासासाठी भरपूर कष्ट घेतले. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेतही मी भरपूर सहभाग घेतला. आप्पा संस्थेच्या कार्यालयात आले की माझ्यासाठी निरोप पाठवत. मी तर लहान तोंडी मोठा घास या पद्धतीने मला वाचताना आवडलेलं त्यांच्याशी शेअर करायचो. ‘भारतीय शिक्षण’ मासिकातील ‘बेंचमार्किंग’ ही लेखमाला मी त्यांना वाचायला सुचवल्याचं आठवतं.

अरुअप्पा हे एक संकल्पवीर होते, ते संकल्प सोडायचे. त्यांचा सच्चा सूर, त्यांच्या आश्वासक वाणीने प्रत्येक हृदयाला भिडत असे आणि अजोड कार्यरूपी गोवर्धन उचलला जायचा. २८ फेब्रुवारी २००७ रोजी महाविद्यालयात संस्थेचा जोरदार कार्यक्रम झाला. अप्पांनी नेहमीप्रमाणेच भविष्यातील उपक्रमांची घोषणा केली. त्याच रात्री अत्यंत अकल्पित घडलं. मला मध्यरात्री मित्राने फोन करून त्यांच्या निधनाची दु:खद वार्ता कानी घातली. ग्रीक दंतकथेत सॅमॅरिटन या महापुरुषाचं वर्णन आहे -जो लोकांच्या दुःखाने व्यथित होतो आणि स्वतः झिजून लोकांना मदत करतो. म्हणूनच अरुअप्पांचं स्मरण करताना म्हणावंसं वाटतं, हॅटस ऑफ टू द गुड सॅमॅरिटन !

  • उल्हास श्रीनिवास सप्रे
  • मुख्याध्यापक, पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, रामापूर पाटण, जि. सातारा
  • (संपर्क – ९४२११ ४२६५८)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply