तळेऱ्यातील सेवाभावी डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याला प्रा. शरद काळे स्मृती पुरस्कार प्रदान

वाळपई (गोवा) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटणच्या शारदीय प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रा. शरद काळे स्मृती पुरस्कार तळेरे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील डॉ. मिलिंद आणि डॉ. ऋचा कुलकर्णी या सेवाभावी डॉक्टर दाम्पत्याला प्रदान करण्यात आला. धारखंड-वाळपई (गोवा) येथे झालेल्या कार्यक्रमात गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी शारदीय प्रतिष्ठानच्या श्रीमती वर्षा काळे, चारुता काळे-प्रभुदेसाई, डॉ. अनुजा जोशी आणि कपिल काळे उपस्थित होते. ‘सत्यकथा’ या दर्जेदार मासिकात लेखन केलेले कोकणचे ज्येष्ठ कथालेखक आणि खारेपाटण हायस्कूलचे माजी प्राचार्य शरद काळे यांचे शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक कार्य उलगडून दाखवणारा ‘ही एक प्रेरक सत्यकथा’ हा कार्यक्रम या वेळी मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांनी सादर केला.

तळेरे येथे गेली ३० वर्षे कोकणातील गोरगरीब लोकांसाठी एक सहृदय ‘कोकणचो डॉक्टर’ म्हणून सुपरिचित असलेले डॉ. मिलिंद आणि डॉ. ऋचा कुलकर्णी यांना या वेळी रोख १० हजार रुपये, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि मोरपीस देऊन गौरवण्यात आले. या वेळी दोघांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. काळे सरांसारख्या समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या एका सत्प्रवृत्त शिक्षक-लेखकाच्या नावे मिळणारा हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरक आहे आणि पुढे कार्य करण्यासाठी बळ देणारा आहे अशी भावना दोघांनी व्यक्त केली.
गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘शरद काळे हे तेजाचा प्रेरक वसा घेऊन उत्तम अध्यापन आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती करणारे लेखक होते. त्यांनी अनेक नवोदितांना लेखनप्रेरणा दिली. तसेच आज नवीन शैक्षणिक धोरणात जे अध्ययन, अध्यापन अभिप्रेत आहे ते सर्व शैक्षणिक प्रयोग त्यांनी खारेपाटणच्या शाळेत ४० वर्षांपूर्वी सुरू केले होते. म्हणूनच ते काळाच्या पुढे होते. असामान्य व्यक्तिमत्त्व असूनही सामान्य जगणारे आणि अनेक महामानवांनी दिलेल्या जीवनधारणा आयुष्यभर जोपासणारे ते एक असामान्य व्यक्ती होते.’ (उर्वरित बातमी आणि फोटो जाहिरातीच्या खाली)

वाळपई परिसरातील मान्यवर साहित्यिक, ग्रामस्थ, तसेच तळेरे, खारेपाटण येथील काळे कुटुंबीयांचे स्नेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्रीमती वर्षा काळे यांनी मनोगत व्यक्त केले. शरद काळे यांच्या कन्या सौ. चारुता काळे-प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनुजा जोशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि उपस्थितांचे आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply