उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाचे कामकाज सुरू झाले आहे. मुलांना शाळेबद्दल आपलेपणा वाटावा यासाठी त्यांचे स्वागत करण्याची प्रथा अलीकडे शाळांमधून सुरू करण्यात आली आहे. शिक्षक परिसरातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे उत्साहाने स्वागत करतात. त्यांची ओवाळणी करतात. पहिल्याच दिवशी त्यांचे तोंड गोड करतात. अलीकडे अंगणवाडीची पार्श्वभूमी असल्यामुळे मुलांमध्ये शाळेबद्दल तितकीशी भीती नसते. तरीही नव्या शाळेत जायचे असल्यामुळे वेगळ्या प्रकारची हुरहूर असते. त्यातील काही मुले रडकुंडीला येतात. त्यामुळे त्यांच्या स्वागताचा सोहळा ही खरेच चांगली प्रथा आहे. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काही शाळांना भेट दिली आणि शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने शालेय शिक्षण विभागाचीही शाळा घेतली. हा उपक्रमही स्तुत्य म्हणावा लागेल. अशी शाळा सातत्याने घ्यावी लागेल.
शालेय शिक्षण विभागाच्या या शाळेत पालकमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील ३६५ दिवस शाळा चालविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाचे उदाहरण दिले. काही शाळांमधील विद्यार्थी एक ते तीसच नव्हे तर १३०० पर्यंतचे पाढे बिनचूक म्हणतात. काही विद्यार्थी डाव्या हाताने इंग्रजी, तर उजव्या हाताने मराठी लिहितात. असे नावीन्यपूर्ण उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात का होत नाहीत, असा सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या शाळांना घरघर लागली आहे. या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण सुरू केले गेले असले तरी मुलांपेक्षाही पालकांना इंग्रजी शाळेच्या असलेल्या आकर्षणामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील संख्या दिवसेंदिवस घटत आहे. अनेक शाळा बंद पडत आहेत. ही घट कमी करण्यासाठी वेगळे काही उपक्रम केले आहेत का, याची विचारणाही पालकमंत्र्यांनी केली. वर्षभरात मुलांमधून राज्यात आदर्श निर्माण होईल, असे काम करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी या शाळेत केले.
पालकमंत्र्यांनीच शालेय शिक्षण विभागाचे कान टोचले हे खूपच चांगले झाले. त्यातून काही चांगले घडेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तरीही पालकमंत्र्यांनीही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांच्या मागण्या आणि आंदोलने हा विषय पूर्णपणे वेगळा आहे; पण भावी नागरिकांचा पाया ज्या शाळांमध्ये तयार होतो आणि ज्या शिक्षकांकडून तो तयार करून घेतला जातो, त्या शिक्षकांकडून मुलांच्या मनाची पुरेशी मशागत केली जाते का आणि ती केली जात नसेल तर त्याला नेमकी कोणती कारणे आहेत, याचाही शोध घ्यायला हवा. विविध ठिकाणची संमेलने आणि प्रशिक्षण यामध्ये शिक्षकांचे अनेक दिवस जातात. तेवढ्या काळात ते मुलांना शिकवू शकत नाहीत. याशिवाय संगणकीय लिखापढीचे भरपूर काम त्यांना करावे लागते. खासगी शाळांमध्ये अशा तऱ्हेचे कारकुनी काम करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली असते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असे कर्मचारी नसतात. शिवाय शिपायाचे पदही नसते. त्यामुळे संमेलन आणि प्रशिक्षणासारखी अन्य व्यवधाने सांभाळतानाच त्यांना लिखापढीचे कामही करावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या किती शैक्षणिक तासांचे नुकसान होते, याचीही मोजदाद करायला हवी. मुळात शिक्षकांची संख्या पुरेशी नसते. त्यामुळे एकशिक्षकी आणि दोनशिक्षकी शाळांचे प्रमाण अधिक आहे. या एक किंवा दोन शिक्षकांना चार-चार वर्ग सांभाळावे लागतात. त्यातूनही राहिलेला वेळ कारकुनीसाठी खर्च करावा लागतो. अशा स्थितीत त्यांच्याकडून वेगळ्या कामाची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. शाळांची आणि शालेय शिक्षण विभागाची शाळा घेतानाच या बाबींचाही विचार शासनाचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्यांनी केला तर अधिक चांगले काही घडू शकेल.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २० जून २०२५)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड






