Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

चहापानाची प्रथा टिकविणे पथ्याचे

Advertisements

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांसाठी मुख्यमंत्री एकत्रित चहापानाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. राज्यात अशा अनेक प्रथा आहेत ही त्यापैकीच एक. गेल्या काही वर्षांपासून राज्यामधील विरोधकांना सत्ताधाऱ्यांबद्दलचा संताप व्यक्त करायला ठिकाणच मिळत नाही. त्यामुळे ते या चहापानावरच बहिष्कार घालतात आणि आपला सरकारवरील रोष जनतेपर्यंत पोहोचवतात. यावेळच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाही तीच प्रथा पाळण्यात आली. आता जे विरोधक आहेत, ते काही काळापूर्वी सत्ताधारी होते आणि आताचे सत्ताधारी तेव्हा विरोधात होते. मात्र त्यांनीही तेव्हा चहापानावर बहिष्कार घालण्याची प्रथा इमाने इतबारे पाळली होती. शेवटी शो मस्ट गो ऑन हेच तत्त्व सत्ताधारी आणि विरोधकही पाळत आहेत.
दुसरीकडे चहापानामध्ये विरोधकच नसल्याने सत्ताधारी सदस्यांना काही कामच उरत नाही. आपणच आपल्या हाताने चहा घ्यायचा, तो पिता पिता आपल्या राजकीय सहकाऱ्यांशी काही तरी बोलूनचालून वेळ मारून न्यायची, एवढेच त्यांना करावे लागते. त्यातही गट-तट असतात, हा भाग वेगळा. विधिमंडळात विरोधक असले की मजा असते. कोणी सभापतींचा राजदंड पळवितो. मग त्याला रोखण्यासाठी त्याच्या मागे धावा, त्याला पकडून ठेवा. कोणी तरी विधिमंडळ कामकाजाची कागदपत्रेच सभागृहात टराटरा फाडून निषेध व्यक्त करतो. कोणी सदस्य कोणाच्या श्रीमुखात भडकावतो. काय काय चाललेले असते सभागृहात. ते करण्याची संधी चहापानाच्या कार्यक्रमात नसते, हेसुद्धा बहिष्काराचे कारण असू शकेल का?
जगात सर्वप्रथम चहाचा पेय म्हणून आस्वाद घेण्यात आला तो चीनमध्ये. ख्रिस्तपूर्व २०० व्या शतकात चीनमध्ये चहा विलक्षण लोकप्रिय होता, असे सांगितले जाते. चीनमधील लोकप्रियता नंतर जपान आणि कोरियामध्ये पोहोचली आणि हळूहळू जगभरात पोहोचले. सुरवातीच्या काळात काळ्या स्वरूपात असलेल्या चहामध्ये इंग्रजांनी दूध आणि साखर घालून तो गोरा केला. चहा हे पेय खऱ्या अर्थाने भारतीयांच्या मनावर ठसविले गेले ते १८२० पासून. ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड केली. भारतावर इंग्रजांनी राज्य केल्यामुळे भारतीयांनीही चहाला दिवाणखान्यातून थेट स्वयंपाकघरात पोहोचविले. आता तर चहा हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे. आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपण कोणाकडे गेलो तरी चहा घेणार का, अशी लगेच विचारणा होते. कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात आणि त्यातही कुणबी समाजात चहा म्हणजे लग्न ठरण्याचा महत्त्वाचा घटक आहे. चहापान झाले की लग्न ठरल्याची खातरजमा होते. थोडक्यात चहा विचारणे, पिणे हा आपल्या व्यावहारिक सभ्यतेचा एक भागच होऊन गेला आहे.
चहा प्यायल्याने तरतरी येते असे म्हणणारे तसेच चहाने अ‍ॅसिडिटी वाढते म्हणून तो पिऊ नका असे सांगणारे, असे दोन्ही टोकाचे लोक असतात. त्यातही अलीकडे जीभ तिखट असली, तरी शरीराने गोडपणा धारण केल्यामुळे चहावर मनाविरुद्ध बहिष्कार घालावा लागतो. विरोधक जेव्हा चहापानावर बहिष्कार घालतात, तेव्हा अशा साखरेच्या पोत्यांची संख्या विरोधकांमध्ये अधिक आहे का, अशीही शंका येते. मात्र चहापानाच्या उपचारावर बहिष्कार घालून विरोधक खरे तर एका चांगल्या संधीला मुकत असतात. कारण चहाच्या पेल्यातील वादळे राजकारणातच अधिक होत असतात. विधिमंडळ अधिवेशनाच्या आसपास तर अशी वादळे नेहमीच घडत असल्याचा प्रत्यय येतो. या वादळांचा अंदाज या चहापानाच्या काळातच येऊ शकतो. सत्तेत कोणीही असले आणि त्यांच्या विरोधात कोणीही असले, तरी चहापान ही प्रथाच बंद करण्याबाबत मात्र एकमत होऊ शकते. तसे झाले आणि विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचे चहापान बंद झाले, तर अशा चहाच्या पेल्यांमधील वादळांचा अंदाज सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांनाही येणार नाही. चहा पिणे कुपथ्याचे असले, तरी चहापानाचा कार्यक्रम करणे पथ्याचे आहे. त्यामुळे चहापानाची प्रथा बंद होऊन चालणार नाही. ती टिकवायलाच हवी. याबाबतची चर्चाही चहापानाच्या कार्यक्रमातच होऊ शकते. विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनीही त्याचा जरूर विचार करावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version