कोकण इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात ६० शोधनिबंध सादर

कल्याण (जि. ठाणे) : कोकण इतिहास परिषदेचे अकरावे एकदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन गेल्या महिन्यात येथे पार पडले. अधिवेशनात ६० पेक्षा अधिक शोधनिबंध सादर झाले, हे विशेष.

कल्याण येथील बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या सहकार्याने हे अधिवेशन झाले. अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते. बिर्ला महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. नरेश चंद्र, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, अधिवेशनाच्या अध्यक्षा एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. वर्षा शिरगावकर, बिर्ला महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. स्वप्ना समेळ आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले, विद्यार्थिदशेत विज्ञान विषयात मला काही कळत नव्हते. त्यामुळे मी त्या विषयात रमलोच नाही. म्हणून नंतर पुणे विद्यापीठात एम. ए. पदवी इतिहास हा विषय घेऊन मिळवली. नेट परीक्षा पास झालो. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून जिल्हाधिकारी झालो. त्यामुळे इतिहास विषयाशी विशेष आत्मीयता निर्माण झाली. कोकण इतिहास परिषदेस सहकार्य केल्याबद्दल बिर्ला महाविद्यालयाचे त्यांनी कौतुक केले. सरकारने रायगड किल्ल्यासाठी ६०० कोटीचा निधी दिला. त्यातील काही खर्च इतिहासाचा अभ्यास मोठ्या प्रमाणात होण्यासाठी अनुदान म्हणून दिल्यास संशोधन होऊ शकेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

नरेशचंद्र, डॉ. अविनाश पाटील, डॉ. स्वप्ना समेळ यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने अनेक कार्यक्रम, उपक्रम महाविद्यालयात सुरू असल्याची माहिती डॉ. नरेश चंद्र यांनी दिली.

कोकण इतिहास परिषदेने दरवर्षी इतिहास विषयात विशेषतः कोकणातील इतिहासावर मोठे संशोधन करणाऱ्या संशोधकांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावर्षी हा पुरस्कार भारतीय इतिहासाच्या कला, स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राच्या मुंबईतील अभ्यासिका डॉ. कुमुद कानिटकर मुंबई यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात मराठीबरोबर इंग्रजी भाषादेखील संशोधकांनी शिकावी, असे आवाहन त्यांनी केले. इतर भाषांपेक्षा मराठी भाषा नक्कीच समृद्ध आहे. आपल्या प्रभुत्वासाठी अभ्यासकांनी विपुल वाचन, इतर भाषातील शब्दसंग्रह वाढवणे आवश्यक असते. याबाबत उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, परकीय मुस्लिम आक्रमकांनाही भाषेची महती कळली होती. म्हणूनच त्यांनी तयार केलेल्या नाण्याच्या एका बाजूला फारसी कलमा आणि दुसऱ्या बाजूला संस्कृत भाषेत शब्द होते.

अधिवेशनाच्या अध्यक्षा डॉ. वर्षा शिरगावकर यांनी मनोगतात कोकणाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासावर भर दिला. अभ्यासकांनी यासाठी युरोपियनांनी केलेल्या नोंदी, विशेषतः डच रेकॉर्डवर कमी काम केले. त्यामुळे त्याचा अभ्यास केल्यास समुद्र किनाऱ्यावरील कोकणाची संस्कृती मोठ्या प्रमाणात समजू शकते. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत कोकणात लोकांचा आणि परकीयांचा कोणकोणत्या प्रथा होत्या, त्या सांगून त्यांनी उपस्थितांना अचंबित केले. ख्रिश्चन लोक अवयवाची मेणाची प्रतिकृती माउंट मेरी येथे देऊन प्रार्थना करीत. पेशवेकाळात सोन्याच्या प्रतिकृती देवाला वाहत. गाई-गुरांना आजार झाल्यास त्यांच्याही अवयवाचा प्रतिकृती वाहण्याची प्रथा होती. पेशवेकाळात सोन्याच्या दागिन्यात पुतळीमाळ, लक्ष्मीहार कसे आले, शाहू महाराज इंग्रजांकडून कान्होजी आंग्रेमार्फत कोणत्या जिनसा मागत, मुळात गणपती उत्सव कसा सुरू झाला, अशा विविध गोष्टींचा इतिहास त्यांनी मनोरंजक पद्धतीने मांडला आणि आपल्या या आगळ्या वेगळ्या संशोधनाची मांडणी केली.

कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या मनोगतात परिषदेने आजपर्यंत कोणाकोणाला जीवनगौरव दिले, कोणकोणते परिषद कोणकोणते उपक्रम राबवत आहे, हे सांगून वस्तुसंग्रहालय आणि परिषदेच्या कार्यासाठी कार्यालयाची किंवा त्यासाठी जागेची उपलब्धता शासनाने करून द्यावी, अशी मागणी केली.

मागील वर्षी झालेल्या अधिवेशनात जे शोधनिबंध वाचले गेले, त्यापैकी उत्कृष्ट शोधनिबंध म्हणून परिषदेच्या सचिव प्रा. विद्या प्रभू यांचे दिवंगत वडील यांच्या स्मरणार्थ १००० रुपये आणि प्रमाणपत्र प्रा. कृष्णा गायकवाड आणि डॉ. अजय धनावडे यांच्या शोधनिबंधाला देण्यात आले.

अधिवेशनास मोठा प्रतिसाद मिळाला असून जवळजवळ ६० पेक्षा अधिक शोधनिबंध अभ्यासकांनी पाठवले. या शोधनिबंधाचे परीक्षण प्राचीन विभाग – डॉ. अनुराधा रानडे (माजी प्राचार्या, पेंढरकर महाविद्यालय, डोंबिवली), मध्ययुगीन विभाग – डॉ. मोहसिना मुकादम (सहयोगी प्राध्यापिका, रुईया महाविद्यालय), आधुनिक विभाग – डॉ. मेहेर ज्योती सांगळे (सहयोग प्राध्यापिका, एसएनडीटी महिला विद्यापीठ), डॉ. अनघा राणे (उपप्राचार्य, अग्रवाल महाविद्यालय) यांनी केले. तत्पूर्वी उपस्थितांना त्यांनी आपल्या मनोगतातून कोकणाच्या विविध काळाची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा जाधव, तांत्रिक कार्य प्रा. शितल चित्रे-ठाकूर यांनी केले. परिषदेचे समन्वयक म्हणून प्रा. जितेंद्र भामरे यांनी काम पाहिले.
(संपर्क 9769428306)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply