Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात; म्हणूनच सायबर संस्कार या १७व्या संस्काराची गरज : डॉ. अक्षय फाटक

Advertisements

रत्नागिरी : समाजात आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यांचे प्रकारही वेगवेगळे आहेत; मात्र सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात. आपण दक्ष राहिलो आणि न घाबरता परिस्थितीला तोंड दिले, तर हे गुन्हे घडणार नाहीत. म्हणूनच आजच्या युगात सायबर संस्कार या १७व्या संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षय फाटक यांनी केले. रविवारी (तीन ऑगस्ट) सायंकाळी रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायबर संस्कार’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, रत्नागिरी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मयूर बेहेरे उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध वयोगटांतील रत्नागिरीकरांनी हजेरी लावली होती. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

मोबाइलद्वारे फसवणुकीचे अनेक गुन्हे घडतात. कधी ओटीपी मागून, तर कधी बिल न भरल्यामुळे वीज तोडण्याची भीती घालून फसवले जाते. हे जाळे ओळखायचे कसे, त्यात अडकू नये म्हणून आणि अडकायला झाले तर काय करायचे याबद्दलचे मार्गदर्शन डॉक्टर अक्षय फाटक यांनी या अनोख्या कार्यक्रमातून रत्नागिरीकरांना केले. सायबर फसवणुकीची उदाहरणे सांगतानाच, मोबाइलची आवश्यक सेटिंग्ज आणि डिजिटल व्यासपीठावर माहितीची गोपनीयता जपण्याबद्दलही त्यांनी सांगितले. मुलांना मोबाइल द्यायचा झाल्यास काय काळजी घ्यावी, याबद्दल सांगतानाच चांगली व्यक्ती घडण्यासाठी ‘सायबर संस्कार’ हा १७वा संस्कारही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या नावावर असलेले मोबाइल क्रमांक जाणून घेण्यासाठी संचारसाथी या वेबसाइटबद्दल त्यांनी सांगितले. तसेच, सायबर गुन्हा घडल्यास तातडीने रिपोर्ट करण्यासाठी १९३० या टोल फ्री क्रमांकाची माहितीही त्यांनी दिली. मोबाइल अनलॉक करण्यासाठी फिंगरप्रिंटचा वापर करणे आणि मोबाइलचे लोकेशन कायम ऑन ठेवणे कसे धोक्याचे आहे, याबद्दलही त्यांनी सांगितले. समाजमाध्यमांवर वेळोवेळी स्टेटस अपडेट करण्यातून गुन्हे कसे घडू शकतात, हेही त्यांनी उलगडून सांगितले. आपण दक्ष राहिलो, सारासार विचार करण्याची बुद्धी न हरवता शांतपणे अशा प्रकाराला सामोरे गेलो, तर असे गुन्हे घडणारच नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तरीही काही घडलेच, तर मदतीसाठी आपण कायम उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. आपला मोबाइल क्रमांक, यूट्यूब चॅनेल, इन्स्टाग्राम चॅनेल याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, उपस्थितांच्या निवडक प्रश्नांची उत्तरेही दिली. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

सध्या रत्नागिरीत वास्तव्याला असलेले डॉ. अक्षय फाटक हे मूळचे कसबा-संगमेश्वर येथील तरुण इंजिनीअर असून, ज्योतिर्विद्यावाचस्पती आहेत. आपल्या मैत्रिणीला अशाच एका प्रकारातून जीव गमवावा लागल्यानंतर त्यांनी समाजावर सायबर संस्कार करण्याचा वसा घेतला आहे. मोबाइल किंवा समाजमाध्यमांवरची खाती हॅक झाल्यास किंवा सायबर फसवणूक घडल्यास त्यातून तातडीने मार्ग काढण्यासाठी डॉ. अक्षय मदत करतात आणि तीही कोणतेही मानधन न घेता. तरीही कोणी मानधन देऊ केल्यास ती रक्कम थेट दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या आशादीप आणि आविष्कार या संस्थांना द्यावी, असे ते सांगतात. यातून आतापर्यंत त्या संस्थांना दीड लाख रुपयांहून अधिक देणगी मिळाली आहे. यातून त्यांच्या कार्याची व्याप्ती कळते. डॉ. फाटक यांनी आतापर्यंत शाळा-महाविद्यालयांसह अनेक ठिकाणी हा कार्यक्रम छोट्या स्वरूपात केला आहे. रविवारी झालेला कार्यक्रम ८५वा होता आणि तो प्रथमच व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. फोनमध्ये कोणाचाही नंबर सेव्ह करताना त्या व्यक्तीच्या रक्तगटासह सेव्ह केल्यास गरजेच्या वेळी तातडीने रक्तदाते शोधण्यास उपयुक्त ठरेल, असा एक उपाय डॉ. फाटक यांनी सुचवला. तसेच, आजारी व्यक्तीला भेटायला जाताना कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे किंवा बिस्किटे घेऊन जाण्यापेक्षा तेवढेच पैसे पाकिटात घालून संबंधित व्यक्तीला दिल्यास त्यांना थोडी आर्थिक मदत होऊ शकेल, अशी कल्पनाही त्यांनी मांडली.

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. एका फोनकॉलच्या माध्यमातून आपलीही १२ लाख रुपयांची फसवणूक होणार होती; मात्र नेमक्या वेळी शंका येऊन उचललेल्या पावलांमुळे ती फसवणूक झाली नाही, याबद्दलचा किस्साही डॉ. सामंत यांनी या वेळी सांगितला. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रायव्हेट नंबर असतो, तरीही असा प्रकार घडू शकतो. त्यामुळेच दक्ष राहणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी आपल्या उदाहरणावरून स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी सावरकर नाट्यगृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल पालिकेचे कौतुक करतानाच पालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version