मोबाइलद्वारे फसवणूक टाळण्यासाठी ‘सायबर संस्कार’; रत्नागिरीत होणार मार्गदर्शन कार्यक्रम

रत्नागिरी : समाजात सध्या ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, उच्चभ्रू व्यक्तींची सायबर फसवणूक केली जात आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी समाजावर सायबर संस्कार होण्याची गरज आहे. याकरिता या विषयातील तज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांचा सायबर संस्कार कार्यक्रम रत्नागिरी नगरपालिकेच्या  सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. आज (३ ऑगस्ट) रोजी सायंकाळी सहा वाजता रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.

दैनंदिन जीवनाचा एक मोठा आधार किंवा घटक झालेल्या मोबाइलचा सध्या चाललेला गैरवापर रोखण्यासाठी, तो कसा वापरावा, तो कसा वापरू नये या संदर्भात ‘सायबर संस्कार’ कार्यक्रमात डॉ. फाटक मार्गदर्शन करणार आहेत. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकारचे संस्कार त्याच्यावर गुरू, आई-वडील, नातेवाईक, मित्र यांनी करायचे असतात. बालपणात आई-वडिलांनी केलेले, शाळा, कॉलेजमध्ये शिक्षकांनी केलेले आणि मित्रमंडळींच्या सहवासातले. सामाजिक संस्कारही आवश्यक असतात. यामध्ये एका नवीन संस्काराची गरज निर्माण झाली आहे ती म्हणजे सायबर संस्काराची. याकरिता हा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

२१व्या शतकात भारतात डिजिटल क्रांती झाली आणि सेलफोनचा (मोबाइल) वापर प्रचंड प्रमाणात वाढला. रोजच्या जगण्यातील अनेक गोष्टींसाठी माणूस मोबाइलवर अवलंबून राहायला लागला. कोविड महामारीच्या काळात शाळा बंद असल्याने अपरिहार्यता म्हणून हाच मोबाइल विद्यार्थ्यांच्या हातात आला. कोविडनंतर जगरहाटी पूर्ववत झाली; पण विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाइल त्यांच्या हातातच राहिला. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. याप्रमाणे या काळात मोबाइलच्या उपयोगासोबतच त्याचे उपद्रव दृश्यमान झाले आणि सायबर क्राइम या गुन्ह्याच्या नव्या प्रकाराचा जन्म झाला. याचे आर्थिक, नैतिक परिणाम होऊ लागले. चारित्र्यावरही ते होत आहेत.

हे सर्व रोखण्याचा प्रयत्न करायचा असेल, तर सर्वांनीच सायबर सज्ञान होण्याची गरज निर्माण झाली आहे; पण दुर्दैवाने आपल्या कुठल्याही शिक्षणपद्धतीत हा विषय आवश्यक तेवढा अजून आलेला नाही. त्यामुळेच या व्याख्यानाचा जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक, महिला, नागरिक, ज्येष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply