शिरोडा (ता. वेंगुर्ले) : श्रेष्ठ साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचा सांगता सोहळा आरवली (ता. वेंगुर्ले) येथे येत्या १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

या कार्यक्रमात जयवंत दळवींचा जीवनपट अनोख्या पद्धतीने उलगडण्यात येणार आहे. त्यामध्ये जयवंत दळवींच्या साहित्यातील पाऊलखुणा या विषयावरील दृक् श्राव्य सादरीकरण, कौटुंबिक जयवंत दळवी या कार्यक्रमात आप्तेष्टांशी हितगुज, जयवंत दळवींच्या साहित्याचे अभिवाचन आणि नाट्यछटा, साहित्यापलिकडील जयवंत दळवी या कार्यक्रमात जयवंत दळवींच्या सन्मित्रांशी संवाद असे कार्यक्रम होतील. जयवंत दळवींच्या बत्तीस पुस्तकांचे वाचन आणि अवलोकन या वर्षभर राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचा आढावाही यानिमित्ताने घेण्यात येईल.
समारंभाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, ‘संगीत देवबाभळी’ या प्रसिद्ध नाटकाचे लोकप्रिय लेखक आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, प्रसिद्ध साहित्यिक मुकुंद टाकसाळे, जयवंत दळवींचे सुपुत्र गिरीश दळवी उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम आरवलीतील साळगावकर मंगल कार्यालयात गुरुवारी, दि. १४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. आपल्या बावनकशी साहित्याने आरवली-शिरोडा परिसराची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची पताका मराठी साहित्यविश्वात फडकवणाऱ्या कै. जयवंत दळवी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी साहित्यरसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक साहित्य प्रेरणा कट्टा (आजगाव), शिरोडा येथील र. ग. खटखटे ग्रंथालय आणि दळवी कुटुंबीयांनी केले आहे.
जयवंत दळवी यांची निवडक साहित्यसंपदा











कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

