रत्नागिरीचा प्रथमेश तारळकर संगीत अलंकार परीक्षेत देशात प्रथम

रत्नागिरी : आडिवरे (ता. राजापूर) येथील सुपुत्र, प्रसिद्ध पखवाजवादक प्रथमेश तारळकर याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या पखवाज वादन संगीत अलंकार परीक्षेत देशपातळीवर सर्वप्रथम आला आहे.

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरातील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अॅकॅडमीमध्ये 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता प्रथमेशला संगीत अलंकार ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर पं. गणेश आण्णा चौधरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रथमेशने आपल्या पखवाजवादनाने राज्यभरात नावलौकिक मिळवला आहे. आता त्याने देशपातळीवरही आपली ओळख निर्माण केली आहे. संगीत क्षेत्रातील प्रख्यात शास्त्रीय, उपशास्त्रीय नामवंत गायक पं. संजीव अभ्यंकर, पं. शौनक अभिषेकी, पं. आनंद भाटे, पं. रघुनंदन पणशीकर, तसेच विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर, विदुषी देवकीताई पंडित, विदुषी मंजूषा पाटील यांना प्रथमेशने पखवाजसाथ केली आहे. यंदा शास्त्रीय संगीतातील जगविख्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवातही वादन केले आहे.

प्रथमेश वयाच्या आठव्या वर्षांपासून पखवाज वादनाचे शिक्षण घेत आहे. प्रथमेशचे वडील संजय तारळकर भजन करत असल्याने घरातूनच सांगीतिक संस्कार मिळाले .राज्यभरातील विविध मान्यवर संगीत महोत्सवात पखवाज वादन केले आहे. तसेच नामवंत गायकांनाही संगीत साथ केली आहे. गायकांना पखवाज साथसंगत करण्याबरोबर प्रथमेश आता एकल पखवाज वादनही करत आहे. त्याने मुंबईत पखवाज वादनाचे क्लासही सुरू केला आहे. त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

गुरू परशुराम गुरव आणि तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर यांच्याकडे पखवाज वादनाचे धडे गिरविले आहेत. आपण हे यश गुरूंबरोबरच तसेच आई संध्या, वडील संजय तारळकर आणि त्याच्यासोबत कायम पाठीशी असलेला मित्रपरिवार यांच्या कृपाशीर्वादाने मिळविल्याचे प्रथमेशने सांगितले.

हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी प्रेरणादायी असून यापुढेही आपली संगीत साधना, संगीत सेवा अशीच सुरू ठेवणार असल्याचे प्रथमेशने सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply