
पुणे : प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांची ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर एक ते चार जानेवारी २०२६ या कालावधीत हे संमेलन भरणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाची बैठक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज (१४ सप्टेंबर) पुण्यात झाली. त्यात एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रा. जोशी यांनी सांगितले. या बैठकीला विविध साहित्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विश्वास पाटील हे निवृत्त आयएएस अधिकारी असून, त्यांचे गेल्या चाळीस वर्षांपासून मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या ‘पानिपत’ या ऐतिहासिक कादंबरीला विशेष ओळख मिळाली आहे. त्यांनी झाडाझडती, नागकेशर, संभाजी, मिसळ अशा कादंबऱ्यांसह अनेक साहित्यकृती लिहिल्या आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह ७०हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणारे हे संमेलन मराठी साहित्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवडीबद्दल विश्वास पाटील यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनने या संमेलनाचे आयोजन केले आहे. घटक संस्थांनी, तसेच महामंडळातील सर्व संलग्न संस्थांनी पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने सुचवले होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

