Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

‘संपूर्ण’ नाटकात स्त्रीत्वावर भाष्य

Advertisements

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सुरू आहे. स्पर्धेत परभणीच्या राजीव गांधी युवा फोरम संस्थेने संपूर्ण हे नाटक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केले.

स्त्री पुरुषाशिवाय अथवा पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. मातृत्वानेच स्त्री पूर्णत्वाकडे जाते, असे म्हणणाऱ्या पत्नीवर संशयाचे गारूड घालून अखेर तिचा खूनही केला जातो. स्त्रीचे मातृत्व, स्त्रीत्वावर भाष्य करणारे, अपूर्ण या कथानकावर नाटक ‘संपूर्ण’ राज्य नाट्य स्पर्धेत परभणीच्या राजीव गांधी युवा फोरम या संस्थेने केले. येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग झाला. दोनच पात्रांमधील संवादातून स्त्रीत्वाचा उलगडा करणारी संहिता लेखक-दिग्दर्शक विजय करभाजन यांनी लिहिली. उत्तम अभिनयातून साकार झालेल्या या नाटकाला रसिकांनी दाद दिली.

‘संपूर्ण’ नाटकाच्या संहितेत बॅंक अधिकारी-लेखक, समुपदेशक, वकील अशी भूमिका बजावणाऱ्या लेखकाच्या अपूर्ण या कथानकावर आधारित आहे. नाटकाच्या सुरवातीला एक महिला अचानक रंगमंचावर येते. विजांचा कडकडाट, पाऊस सुरू असतो. महिला घाबरलेली असते. विक्षिप्त बोलत असते. समुपदेशक तिला नाव विचारण्याचा प्रय़त्न करतो. पण ती नाव सांगत नाही. नाव तुम्ही ओळखा, तुम्ही विचारवंत, नामवंत आहात असे सांगते. समुपदेशक अविनाश जगताप तिचे म्हणणे काय विचारतो. तेही ती नीट सांगत नाही. तुम्हीच माझ्या प्रश्नाची उकल करा, असेच सांगत असते. तुमच्या कथा मी वाचल्या आहेत. तुमचे लिखाण स्फोटक आहे, असे सांगून ती शब्दांत अडकवत असताना ती सांगते, तुम्ही बॅंक अधिकारी निरुपम आहात. दोघांचे भाष्य होत असताना ती म्हणते, मी प्रतिमा आहे. तुमचे माझ्यावर प्रेम होते. अविनाश घाबरतो. मी अविनाश आहे, असे तो तिला सांगतो. ती पुरावा मागते. अविनाश रेशनकार्ड, आधारकार्ड, बॅंक पासबुक दाखवतो. हे बनावट करता येते, असे ती सांगते. तुम्ही निरुपमच आहात. बॅंक अधिकारी निरुपम आणि प्रतिमा यांचे लग्न झालेले असते. बँकेच्या कामामुळे निरुपम अनेकवेळा बाहेरगावी जातो. त्या दोघांना मूल नसल्यामुळे प्रतिमा एकटीच घरी असते. एके दिवशी प्रतिमा नातेवाईकांकडे गेली असताना निरुपम कधी येणार म्हणून फोनवरून विचारतो. त्यावेळी तेथील पुरुष नाही येणार ती, असे सांगतो. हे निरुपम ऐकतो. त्यानंतर त्याचा मित्र मदन घरी आलेला असताना प्रतिमाचा पदर पेटतो. मदन तो विझवतो. या सगळ्या प्रकाराने निरुपमच्या डोक्यात काहूर उठते. संशय निर्माण होतो. त्याचे मन सैरभर होते. प्रतिमाशी वागण्याचा त्याचा मूड बदलतो. प्रतिमाला तो घरातून हाकलून लावतो. स्त्रीशिवाय एकाकी जगण्यासाठी निरुपम अविनाश हे नाव बदलून राहतो. घरातून बाहेर काढलेली प्रतिमा निरुपमच्या घरी येते. पुन्हा संशयाचे जाळे सुरूच असते. दोघांमध्ये वाद होतात. विषय फक्त स्त्रीत्वाचा असतो. मातृत्वाने स्त्री पूर्णत्वास जाते, असे प्रतिमा सांगते. पण निरुपमला पटत नाही. तो प्रतिमाचा गळा आवळून तिला मारतो आणि कथाकाराची अपूर्ण कथा पूर्णत्वास जाते.

स्त्रीत्वावर भाष्य करणारे ‘संपूर्ण’ नाटक सादर करण्यास संस्था यशस्वी झाली.

सूत्रधार आणि साह्य –

निर्माता : संजय पांडे, नेपथ्य : अनिल पांडे, आदित्य पांडे, प्रकाशयोजना : अतुल साळवे, प्रकाश बारखिंड, संगीत : संतोष चिक्षे, प्रमोद बल्लाळ, वेशभूषा : प्रसाद देशपांडे, शौनक पांडे, रंगमंच व्यवस्था : चारुदत्त हापटे, त्र्यंबक वडसकर, श्रीकांत कुलकर्णी आणि दिनकर जोशी.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version