कूच कूच : राजकीय व्यवस्थेवर उपरोधिक कोरडे

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी नाशिकच्या परिवर्त संस्थेने कूच कूच हे नाटक सादर केले.

सध्याची राजकीय व्यवस्था, राजकीय नेत्यांचे समाजातील वागणे आणि त्यांचे खासगी तसेच राजकीय जीवन या सर्वांवर उपरोधिकरीत्या भाष्य करणारे म्हणजे कूच कूच नाटक.

पडदा उघडताच डार्विनच्या सिद्धांतानुसार माकडाचा माणूस झाला, उपयोगशून्य अवयव गळून पडतो, त्यानुसार माकडाचे शेपूट गळून पडल्याने त्याचा मानव झाला असा सिद्धांत सांगत, एक पुंगीवाला लांबलचक पुंगी घेऊन रंगमंचावर येतो, त्याच्या पुंगीच्या नादाने बिळातले उंदीर बाहेर पडतात व त्याच्यापाशी जमा होतात.
नाटकी सुरावटीची कला मी कशी शिकलो व सत्यशोधकाचा माझा प्रवास इथपर्यंत कसा झाला, आतापर्यंत मी विषमतेच्या पट्ट्या डोळ्यांवर बांधून होतो, आता मात्र सगळे स्पष्ट दिसू लागले आहे, असे तो जमलेल्या उंदरांना ऐकवतो.

त्याच्या बोलण्याने प्रभावित होऊन एक ज्येष्ठ मुख्य उंदीर त्याला म्हणतो, ”मला तुमच्यासोबत लोकसेवा करायची आहे, मला तुमचा सचिव करा.” पुंगीवाला त्याला म्हणतो, ”तुला काहीतरी द्यावे लागेल. त्याशिवाय तुला मी सचिव कसा करणार?” मूषक त्याला विचारतो, ”मला काय द्यावे लागेल?” पुंगीवाला म्हणतो, ”मूषका, मला तुझी शेपटी तुला द्यावी लागेल.” सुरुवातीला उंदीर आपली शेपटी द्यायला तयार होत नाही, मात्र मिळणारे लाभ पाहता शेवटी तो शेपटी द्यायला तयार होतो.

वाजत गाजत पुन्हा पुंगीवाल्याचे रंगमंचावर आगमन होते, त्यावेळी त्याच्यासोबत शेपटी नसलेला उंदीर सचिव बनून सोबत असतो. तो पुंगीवाल्याला म्हणतो, ”महाराज, आपण निवडून आला आहात. आता आपला शपथविधी करून घेतला पाहिजे. त्याकरिता आपण पांढरी गांधी टोपी घाला.” पुंगीवाल्याचा शपथविधी होतो. पुंगीवाला राजा/मंत्री बनतो. राज्यकारभार हाती घेतल्यावर त्याच्यात व त्याचा स्वीय सचिव झालेला शेपटी नसलेला उंदीर यांच्यामधील संवाद, प्रसंग दाखविलेले आहेत. ते राजकीय व्यवस्था, राजकीय नेत्यांचे समाजातील वागणे, व्यवहार, राजकीय निर्णय, शासन निर्णय, राज्यकर्त्यांची निष्ठा, खासगी जीवन, राजकीय जीवन, कौटुंबिक जीवन या सर्वांवर उपरोधिकरीत्या भाष्य करणारे आहेत. नर्म विनोदाची भाषा वापरून थेट प्रहार न करता विडंबनात्मक व्यक्तिचित्र उभे करून प्रहार केलेले आहेत.

नाटकात नेपथ्य विशेष नाही, पांढरे पडदे सोडलेले आहेत, प्रकाशयोजनेद्वारे त्यावर विविध बदलत्या रंगछटा उमटवल्या आहेत, त्यात ‘तिरंगा’ही आहे. सुकलेले झाड, त्याला फळरूपाने धनुष्यबाण, कमळ, गदा, तलवार अशी मांडणी केली आहे. मूषकांचे रंगमंचावरील आगमन प्रेक्षागृहातून दाखवून तसेच पुंगीवाल्याचे संवाद कथन रंगमंचासमोरील जागा वापरून नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

पुंगीवाला रोहित पगारे व मुख्य उंदीर किरण मोहिते या दोघांचेच संवाद नाटकात आहेत. नाटकाला बांधीव असे कथानक दिसत नाही. त्यामुळे संवादांची, प्रसंगांची साखळी आढळत नाही, मुक्त/स्वैर संवाद व उपरोधिक भाषा वापरून नाट्यनिर्मिती केलेली आढळते. संविधान व संविधानकर्त्यांबद्दल आदर/सन्मान आणि ते राबविणारे राज्यकर्ते यांच्यावर नाटकात कोरडे ओढलेले दिसतात.

……
श्रेयनामावली
नाटकाचे नाव – कूचकूच
संस्था – परिवर्त बहुद्देशीय संस्था, नाशिक
निर्मिती प्रमुख – प्रा. गंगाधर अहिरे, नितीन भुजबळ
लेखक – रोहित पगारे
दिग्दर्शक – नूतन गोरे-पगारे
नेपथ्य – शरद गोरे, नेपथ्य सहायक – नीलेश गांगुर्डे, भीमराव चव्हाण, शरद केदारे
प्रकाशयोजना – रवींद्र रहाणे
पार्श्वसंगीत – भरत कुलकर्णी
रंगभूषा – माणिक कानडे
वेशभूषा – कृष्णा शिंदे

पात्रपरिचय
पुंगीवाला – रोहित पगारे
मुख्य उंदीर – किरण मोहिते
ताई – श्रावस्ती मोहिते
उंदीर – काव्या बागुल, स्वरा केदारे, सृष्टी चव्हाण, रेयांश पगारे, निर्मिका चव्हाण, आरव गांगुर्डे, रेवांत पगारे, ओवी गांगुर्डे,
कियांश पगारे

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply