मी कुमार : उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील तणाव, नातेसंबंध

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेने मी कुमार हे नाटक सादर केले.

मधु राय लिखित कुमारनी आगाशी या मूळ गुजराती नाटकाचा विजय तेंडुलकर यांनी अनुवाद केला आहे. हे एक मानसशास्त्रीय रहस्यमय नाटक आहे. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील तणाव, नातेसंबंध आणि त्यातून निर्माण होणारे रहस्य यावर नाटकाची कथा आधारित आहे. १९८० च्या दशकात हे नाटक मराठी रंगभूमीवर प्रथम आले होते.

पडदा उघडताच अमर-सुधा यांच्या घरी पार्टी सुरू असून पार्टीत निशा-हर्षद, केतन, अभिलाषा सहभागी आहेत आणि बिपिन येण्याची वाट पाहत आहेत. खरे तर बिपिनचे येणे हर्षदला आवडलेले नाही (कारण, हर्षदचा भाऊ कुमार याची आत्महत्या नसून तो खून आहे आणि तो बिपिनने केला आहे, असे त्याला वाटत असे). बिपिन पार्टीला उशिराने येतो. अभिलाषा बिपिनला कुमारविषयी काही प्रश्न विचारते. त्यावर बिपिन खुलासा करतो, हर्षद ते अमान्य करून बिपिनचे तोंड पाहायचे नाही, असे सांगतो. थोडी वादावादी होते, निशा बिपिनला गैर बोलते, त्याच्याशी फटकाऱ्याने वागते. हर्षद, निशा घरी जायला निघतात. बिपिन त्यांना थांबवतो आणि सांगतो, ”कुमारचा खुनी कोण? मीही त्याला शोधतोय”,

फ्लॅशबॅकद्वारे कुमारची कथा सुरू होते. तो कलकत्ता येथे असून अभ्यासाकडे त्याचे लक्ष नाही. तो कोणाच्या तरी पत्राची वाट पाहत असतो, बिपिन त्याला भेटायला येतो. त्याची चलबिचल पाहून बिपिन त्याला विचारतो, ”काय होतंय? कोणाच्या पत्रासाठी अस्वस्थ आहेस?” कुमार काहीच बोलत नाही, पोस्टमन आला का, हे पाहाण्यासाठी खोलीबाहेर जातो. तेवढ्यात बिपिनला निशावहिनीचे पत्र सापडते. निशामध्ये कुमार भावनिकरीत्या गुरफटतोय, हे त्याच्या लक्षात येते. कुमारला तो अभ्यास करुन स्कॉलरशिप मिळवून परदेशी नोकरीला जा, असे सुचवितो.

कुमारला भेटायला निशा येते, कुमारवरील प्रेम व्यक्त करते आणि जवळीक साधते. सुधा-अमर व केतन कुमारला भेटायला कलकत्त्यात येतात सगळ्यांच्या गप्पा सुरू असतात. कुमार अस्वस्थ असतो, निशाला तो सांगतो की, आपण भावाला आपण फसवतोय. निशा ते नाकारते. कुमारची अवघडलेली परिस्थिती बिपिनच्या लक्षात येते. तो सगळ्यांनी बाहेर जाऊ असे सुचवितो. कुमार त्यांच्यासोबत जात नाही, निशाची पत्रे गोळा करतो, त्याची मानसिक स्थिती बिघडते. यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसल्याने तो इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या करतो.

पार्टीमध्ये बिपिन उपस्थितांना कुमार सोबत घडलेला घटनाक्रम सांगतो. निशा प्रथम बिपिन खोटे बोलतोय, असे भासविते. हर्षद सगळ्यांसमोर निशाच्या व कुमारच्या मैत्रीची मला माहिती होती, हे सांगतो. शेवटी निशा आमचे एकमेकांवर प्रेम होते हे सगळ्यांसमोर कबूल करते आणि मग कुमारच्या आत्महत्येमागील रहस्य उलगडते.

नाटक तीनअंकी असून पहिल्या व शेवटच्या अंकात पार्टीला आवश्यक असे व दुसऱ्या अंकात कुमारच्या कलकत्त्यातील घराचे नेपथ्य दाखवले आहे. सर्व कलावंतांचा सांघिक प्रयत्न नाटकाची उंची वाढविणारा आहे. निशाचा दीर्घ संवाद विचार करायला लावतो.

उच्चमध्यमवर्गीय कुटुंब आणि त्यांचे नातेसंबंधातील ताण-तणाव, रहस्य हे बऱ्याच अंशी उलगडत नाहीत किंवा सुटत नाहीत. भौगोलिक परिस्थिती, सामाजिक स्तर, आसपासचे वातावरण त्याला कारणीभूत असते. समाजातल्या प्रत्येकाच्या मनात एक वेगळे विश्व असते. त्याप्रमाणे वावरताना नैतिक-अनैतिक या चक्रात तो फसण्याची शक्यता असते. म्हणून काही घटना कधी कधी न उलगडता रहस्य बनून राहतात. या नाटकात अशाच रहस्यमय घटना, नातेसंबंध, मानवी भाव-भावनांचा मेळ लेखकाने गुंफला आहे.

श्रेयनामावली
नाटक – मी कुमार
संस्था – निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी
लेखक – विजय तेंडुलकर
दिग्दर्शक – अभिजित फाटक
निर्मिती – विजयानंद लंबे
सूत्रधार – अंकुश गरगटे
प्रेरणा आणि आशीर्वाद – पपू श्री. बाळ महाराज
जाहिरात आणि प्रसिद्धी – प्रतिरंग स्टुडिओ
नेपथ्य – ओंकार चौगुले, प्रताप डांगरे
प्रकाशयोजना – आशिष भागवत
पार्श्वसंगीत – अनुजा कुलकर्णी
वेशभूषा – स्नेहा वर्मा
रंगभूषा – सुनीता वर्मा
रंगमंच व्यवस्था – निखिल पोवार, गौरव खानाज, राजश्री गोगंडी, अनिलकुमार सोनटक्के, प्रतीक हुंद्रे, रोहित पाटील, जान्हवी काटू, अंजली गोगंडी, राजू गायकवाड

पात्रपरिचय
अमर – विजयानंद लंबे
सुधा – वैष्णवी हळदे
हर्षद – अनिरुद्ध भागवत
निशा – स्नेहल बंडगर
केतन – जॉयलुईस रॉड्रीग्ज
बिपिन – हितेश दायमा
अभिलाषा – आसावरी झिरमिटे
कुमार – हर्षवर्धन कारंडे-देशमुख

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply