महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी बोईसरच्या नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमीने ओय लेले हे नाटक सादर केले.
ओय लेले हे नाटक आजकालच्या ऑनलाइन जगताचे आणि नातेसंबंधांचे आहे. आजकाल कुणी पहिल्यांदा भेटल्यावर त्याचा निरोप घेताना त्याला पुन्हा भेटू असा म्हणण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्स अॅप, फेसबुकवर आहात का? असे विचारले जाते. माणसाच बोलणे आता chat झालाय आणि चेहरा Profile pic.. पूर्वी घरात एखादी वस्तू खरेदी करून आणण्यासाठी घरातल्या माणसांबरोबर चर्चा होत होत्या. मग बाजारात वस्तू आणण्यासाठी वेळ ठरवली जायची. घरात वस्तू आणल्यावर पूजा केली जायची. पण आता ऑनलाइन एव्हढ्या सुविधा आल्या आहेत, ज्यामुळे हे सगळे कुठेतरी हरवून गेले आहे. घरात असलेल्या वस्तूंची काळजी घेण्यापेक्षा नवीन वस्तू घरात कशी आणली जाईल, याचा विचार होत आहे. आपल्याकडे काय आहे त्यापेक्षा आपल्याकडे काय नाहीय, याचा विचार जास्त होतो. पगार हातात पडण्याआधीच तो खर्च करण्याचे प्लॅनिंग झालेले असते. मग लेटेस्ट व्हर्जन, फीचर्स, डिस्काउं ऑफरच्या भरीस पडून फक्त घर भरत जाते. त्यात जुन्या पूर्वजांच्या वस्तूंची अडगळ वाटते आणि नवीन-जुने अशी तुलना सुरू होते. जुन्या वस्तू विकणे, त्यातून नवीन वस्तू आणणे सुरू होते. अशाच नवीन जुन्यात अडकलेल्या घराबद्दलची, मनात जपलेल्या भावनांची आणि सध्याच्या आधुनिकीकरणाची, हरवत चाललेल्या बापमुलाच्या नात्याची ही कथा आहे.
पडदा उघडताच ‘केशव लेले’ यांच्या घराचा दिवाणखान्यात पत्नी आशा, सून मेघा यांच्यात डिलिव्हरी बॉय आकाश ने आणून दिलेल्या नवीन फोनची चर्चा सुरू असते. मुलगा श्रावण वारंवार नवीन फोन ऑनलाइन मागवत असतो, हा सारखे मोबाइल का बदलतो, हा प्रश्न आई-वडिलांना पडलेला असतो. नवीन मॉडेलमधील नवीन सुविधा श्रावण समजावत असतो, अंगावरील कपड्यांपासून घरातील मोठ्या वस्तूंपर्यंत श्रावण सगळ्या गोष्टी ऑनलाइन मागवतो, यामुळे केशव व श्रावण यांच्यात मतभेद होत असतात.
केशवचा मित्र नारायण केशवकडे येऊन तेथील तणावपूर्ण वातावरण विनोदपूर्ण संवादांनी बदलण्याचा प्रयत्न करतो. नारायणच्या आयुष्यातही दुःख आहेच, तो एकटाच राहत असतो. मुलगा परदेशी असतो, त्यांच्यात फारसा सुसंवाद नसतो.
श्रावण घरातील जुने डायनिंग टेबल व रेडिओ ऑनलाइन विकून टाकतो आणि नवीन मागवतो. हे कळताच केशवला यांना प्रचंड धक्का बसतो. जुन्या आठवणींचे ते टेबल व रेडिओ विकल्याने तो हळवा होतो. जुन्या रेडिओची खरखरच जास्त व सुविधायुक्त टेबल उपयोगी कसे, हे श्रावण समजावतो. केशवला ते पटत नाही, दोघांचे कडाक्याचे भांडण होते.
रागाच्या भरात केशव ऑनलाइन विक्री साइटवर पत्नीसह स्वतःच्या विक्रीबद्दलची जाहिरात देतो. पाच कोटी रुपयांना वायदा ठरतो. प्रत्यक्षात पुंडलिक इमानदार श्रावणला भेटून आई-वडिलांना केव्हा न्यायला येऊ, असे विचारतोय श्रावण व मेघा या प्रकाराने हडबडून जातात. कारण त्याने आईवडिलांच्या विक्रीची जाहिरात दिलेली नसते. पुंडलिक वायद्याची रक्कम घेऊन येतो असे सांगून जातो. पुंडलिक आई-वडिलांना अलिबागच्या घरी त्याच्या मुलाला आजी-आजोबा व घरचे संस्कार हवेत म्हणून नेणार असतो. श्रावणला तो सांगतो, पाच कोटीच्या रकमेत तुम्ही तुमची कर्जे भागवा, नवीन घर घ्या, सुखाने राहा, गरजेच्या वेळी मी आईवडिलांना तुमच्याकडे घेऊन येईन. मेघा हे नाकारते मात्र पुंडलिकची कल्पना श्रावणला आवडते.
केशव व आशा यांना श्रावणच्या वागण्यातील बदल जाणवतो. ते श्रावणला सांगतात की, तुझ्यातला बदल आमच्या लक्षात आलाय, जाहिरात आम्हीच दिली होती, आम्ही पुंडलिकसोबत जायला तयार आहोत, असे सांतात. पुंडलिक न्यायला येतो, तेव्हा श्रावण-मेघाचे डोळे उघडतात. आपण हे काय करुन बसलो, हे त्यांच्या लक्षात आल्याने ते पुंडलिकला आई-वडिलांना घेऊन जाऊ नये, यासाठी आर्जवे करतात. केशव-आशालाही सांगतात, चूक मान्य आहे. माफ करा, जाऊ नका. पुंडलिकलाही गहिंवरून येते. तो त्यांना न्यायचे रद्द करुन निघतो. त्यावर केशव-आशा त्याला सांगतात, आम्ही तुला वायदा रद्द करू देणार नाही, आम्ही यायला तयार आहोत. केशव-आशा सामान घेऊन घराबाहेर पडतात.
प्रकाश योजना, नेपथ्य, पार्श्वसंगीत विशाल तांबे, रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे.
नेपथ्याची मांडणी करताना रंगसंगतीचा वापर योग्य केला आहे.
भूमिका व कलावंत… केशव लेले धनंजय कुलकर्णी, आशा लेले मंजूषा अमीन, श्रावण लेले – प्रशांत गुरव, मेघा लेले मधाली गुरव, नारायण दीपेश सावंत, पुंडलिक इमानदार परेश बागवे, आकाश हर्ष म्हैसकर. मध्यवर्ती ‘केशव लेले’ची भूमिका धनंजय कुलकर्णी यांनी परिणामकारक साकारली आहे, बाकीच्यांच्याही भूमिका प्रसंगानुरुप यथायोग्य आहेत. काही प्रसंगात प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रु उभे राहातात.
शब्दांकन : प्रसाद वैद्य 94201 55333
श्रेयनामावली
नाटक – ओय लेले
संस्था – नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमी, बोईसर
लेखक – दीपेश सावंत
दिग्दर्शक – विशाल तांबे, दीपेश सावंत
नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत – विशाल तांबे
रंगभूषा – उदयराज तांगडी
ध्वनिसंकेत – वेदांत पावसकर
प्रकाशसंकेत – ध्रुव समानी
पात्रपरिचय
केशव लेले – धनंजय कुलकर्णी
आशा लेले – मंजूषा अमीन
श्रावण लेले – प्रशांत गुरव
मेघा लेले – मधाली गुरव
आकाश – हर्ष म्हैसकर
पुंडलिक इमानदार – परेश बागवे
नारायण – दीपेश सावंत
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

