द हिंदू लेडी – पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई सावे यांची संघर्षकहाणी

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मुंबईच्या नवहिंद बालमित्र मंडळाने द हिंदू लेडी हे नाटक सादर केले.

भारतातील पहिल्या कार्यरत महिला डॉक्टर डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांच्या संघर्षाचा नाट्यमय आविष्कार द हिंदू लेडी या नाटकात मांडला आहे.

पडदा उघडताच ‘रखमा’ कोर्टरूममध्ये आपली बाजू मांडत आहे, तिला पतीपासून विभक्त का व्हायचे आहे, हे ती कोर्टासमोर सांगत आहे. फ्लॅशबॅकद्वारे तिच्या आयुष्याच्या संघर्षाची कहाणी सुरू होते,
ब्रिटिश राजवटीचा हा काळ आहे. पुरोगामी विचाराची मंडळी प्रार्थना समाज संस्थेची स्थापना करतात, त्याद्वारे ते समाजातील प्रतिगामी, अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी बालविवाह होऊ नयेत, विवाहाचे वय वाढवावे, स्त्रीला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे, अशा मागण्या करतात. संस्थेतीलच डॉ. सखाराम राऊत त्या काळात विधवा स्त्रीच्या पुनर्विवाहास मान्यता न देण्याच्या प्रथेविरुद्ध विधवा असलेल्या व ‘रखमा’ ही मुलगी असलेल्या जयंतीबाईंचा पत्नी म्हणून स्वीकार करतात. त्यातून समाजापुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करतात.

रखमाचा विवाह दादाजी भिकाजीशी लहानपणीच निश्चित झाला असतो. मात्र आता डॉ. राऊत यांनी या विवाहास रखमा लहान असल्याने विरोध दर्शवितात. मात्र पत्नीच्या आग्रहास्तव विवाहास काही अटींवर मान्यता देतात. रखमा-दादाजीचा विवाह होतो.

दादाजीचा मामा नारायण स्वार्थी, लबाड, लंपट गृहस्थ असतो, तो दादोजीला आपल्या कह्यात ठेवतो. दादोजी शिक्षण घेत नाही, मात्र नारायण डॉ. सखाराम राऊत यांना रखमाला सासरी पाठविण्याचा तगादा लावतात. नारायणमामा डॉ. राऊत यांच्याकडून पैसे उकळतो.

डॉ. राऊत अशिक्षित स्त्रियांना मार्गदर्शन मिळावे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पेचे यांचे व्याख्यान आयोजित करतात. लहानपणापासून रखमाला डॉक्टर व्हायची इच्छा असते, ती डॉ. पेचे यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू करते.
नारायण व दादोजी डॉ. राऊत यांच्याकडे येतात. तेथे नारायणचे रखमाशी गैरवर्तन व दादाजीने अर्टीनुसार शिक्षण न घेणे यामुळे रखमा सासरी जायला नकार देते. दादाजी कोर्टात जातात. कोर्ट रखमाच्या इच्छेविरुद्ध दादोजीकडे जाण्यास सांगू शकत नाही, असे सांगून घटस्फोट मंजूर करते.

नारायण व दादाजी या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात दाद मागतात, या कामी प्रतिगामी हिंदू लोक त्यांना मदत करतात, कोर्टात रखमाच्या विरुद्ध निकाल लागतो, रखमा निकालाविरोधात वागल्यास काय शिक्षा असेल, ती भोगायला तयार होते. मात्र सासरी जाणार नाही, असे कोर्टाला निक्षून सांगते.

दरम्यान, इंग्लंडच्या राणीला रखमा पत्र लिहिते. वृत्तपत्रांमध्ये ‘हिंदू लेडी’ या टोपण नावाने समाजप्रबोधन करणारी रखमाच आहे, हे कळल्यावर राणी तिची शिक्षा रद्द करते व तिला वैद्यकीय उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठविण्याची तजविज करा, असा आदेश देते.

इंग्लंडमधून शिक्षण घेऊन डॉ. रखमा पुन्हा मुंबईत परतते. तेथे जिवाची पर्वा न करता प्लेगच्या साथीमध्ये हजारो रुग्णांची सेवा-शुश्रूषा करते. याची नोंद घेऊन राणी व्हिक्टोरियाकडून डॉ. रखमाचा सन्मान केला जातो. (डॉ. आनंदीबाई जोशी (३१ मार्च, १८६५, २६ फेब्रुवारी १८८७) या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या, मात्र त्यांना वैद्यकीय सेवा करता आली नाही. पदवी घेऊन आल्यानंतर अवघ्या बाविसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. याउलट, डॉ. रखमाबाई सावे (२२ नोव्हेंबर १८६४ – २५ सप्टेंबर १९५५) यांनी प्रदीर्घ काळ सेवा करता आली. त्यांनी मुंबईत कामा हॉस्पिटल आणि राजकोटमध्ये सेवा केली.)

नाटकात रखमाची मध्यवर्ती भूमिका दिग्दर्शिका शिवानी पेडणेकर यांनी उत्तम संवादफेक करून संयतपणे साकारली आहे. बेरक्या, लंपट ‘नारायण’ अनुप येरूणकर यांनी इरसालपणे वठवला आहे, डॉ. सखाराम राऊत यांचीही भूमिका विनीत लाड यांनी दखलघेण्यायोग्य साकारली आहे, बाकीच्याच्या भूमिका प्रसंगानुरुप यथायोग्य आहेत. डॉ. रखमाचे धैर्य, शिक्षणाची तळमळ व चिकाटी, अस्तित्वासाठीचा संघर्ष, न्यायालयीन लढाई, प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर इंग्लंडला जाऊन घेतलेले शिक्षण, ज्या काळात स्त्रीला घराबाहेर पडणे शक्य नव्हते, स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते अशा वेळी प्रतिगामी परंपरांच्या विरोधात उभी राहून खंबीरपणे निर्णय घेऊन आपली इच्छा पूर्ण करणे. असा डॉ. रखमाच्या लढ्याचा प्रवास नाटकात गतिमानतेने घडविला आहे. नाटकाचे नेपथ्य सुंदर आहे. प्रसंगांच्या गरजेप्रमाणे रंगमंचावर वेगवेगळ्या भागात प्रकाशव्यवस्थेचा वापर करून परिणामकारकता वाढविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गरजेनुसार संगीत, रंगभूषा व वेशभूषा यांचा वापर करून एका कल्पनारम्य कथानकाला वास्तववादी स्पर्श देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

श्रेयनामावली
नाटक – द हिंदू लेडी
संस्था – नवहिंद बालमित्र मंडळ, मुंबई
लेखक – चेतक घेगडमल
दिग्दर्शक – शिवानी पेडणेकर
संगीत – दिनेश धुरी
नेपथ्य – देवदत्त राऊत
नेपथ्यनिर्माण – उल्हास सुर्वे आणि मंडळी
प्रकाशयोजना – सुनील मेस्त्री
वेशभूषा – अनुप-विनीत-वंदना
रंगभूषा – शरद सावंत

पात्रपरिचय
मोठी रखमा – शिवानी पेडणेकर
छोटी रखमा – कृपा शेटकर
जयंतीबाई – विनीत लाड
नारायण मामा – अनुप येरूणकर
डॉ. पेचे – रेवती केतकर
डॉ. सखाराम राऊत
दादाजी भिकाजी- ओंकार काकडे
दिघू – प्रणव चव्हाण
पांडू – योगेश मोरे
आत्माराम पांडुरंग – अभिषेक शेट्ये
बेहरामजी मलबारी – मृण्मय जाधव
चिन्नमा – समिधा खामकर
शास्त्री – ऋतुज करंदीकर
श्रीमंत – अथर्व शिंदे
राणी व्हिक्टोरिया – वंदना गानू
बिशप – प्रसाद पेडणेकर
पेपरवाला – अजय चिवलकर
कॉमनमॅन – आदित्य शेंगाळ
अन्य कलाकार – समीर मालणकर, नम्रता दळवी, राशी राणे, देविका पवार, सारांश तांबे,
गौरव गगाडे, सक्षम साळुंखे

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply