Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

खेड, चिपळुणात संभाव्य पूरस्थितीसाठी यंत्रणा सज्ज; जगबुडी, वाशिष्ठीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ

Advertisements

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून, नद्यांची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडे पावसाचे प्रमाण अधिक असल्याने खेड शहरातल्या जगबुडी नदीने इशारा पातळी आज (तीन जुलै) दुपारीच ओलांडली असून, रात्री आठपर्यंतच्या अवघ्या सहा तासांमध्ये पाणीपातळी जवळपास पाऊण मीटरने वाढली. प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन बोटींसारख्या आवश्यक साहित्यासह पथक सज्ज ठेवण्यात आलं आहे. नदीची धोकापातळी सात मीटर असून, रात्री आठ वाजता पाणीपातळी सहा मीटर होती.

चिपळूणमधल्या वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीतही सहा तासांमध्ये जवळपास पाऊण मीटर वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात एनडीआरएफचं २६ जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं असून, चिपळूण शहरातल्या पूर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची या पथकाने संध्याकाळी पाहणी केली. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडेही त्यांच्यासोबत होते.
दरम्यान, जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना सुरूच आहेत. चिपळूण पंचायत समिती कार्यालयासमोरचं मोठं झाड आज कोसळलं. त्याखाली उभ्या करून ठेवलेल्या काही दुचाकींचं नुकसान झालं; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version