कुरतडे येथेही आढळली पुरातन कातळशिल्पे

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचा शोध लागला असून दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडत आहे. कुरतडे (ता. रत्नागिरी) येथेही कातळामध्ये खोदलेल्या काही चित्रकृती निदर्शनाला आल्या असून, त्याबाबत अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या निसर्गयात्री या संस्थेने गेल्या सहा-सात वर्षांमध्ये कोकणातील विविध ठिकाणी असलेल्या कातळखोदशिल्पांचा शोध लावला आहे. स्थानिक गुराखी आणि लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारसू (ता. राजापूर), उक्षी (ता. रत्नागिरी) इत्यादी ५२ ठिकाणी दगडामध्ये काही चित्रकृती खोदलेल्या आढळल्या. या कातळशिल्पांविषयीची माहिती वाचल्यानंतर कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील प्रगतिशील आणि प्रयोगशील ज्येष्ठ शेतकरी विलासकाका आंबर्डेकर यांना सुमारे आठ वर्षांपूर्वी कुरतडे येथील कातळवाडीतही अशाच काही चित्रकृतींचे पाहिल्याचे स्मरण झाले. त्यातील काही भाग त्यांनी स्वच्छ केल्यानंतर या चित्रकृती आणखी स्पष्ट झाल्या.

या चित्रकृतींच्या जवळच काही अंतरावर पांडवकालीन समजली जाणारी विहीरही आहे. अशा कातळखोद शिल्पांच्या जवळ विहिरी असल्याचा अनेक ठिकाणचा उल्लेख त्यांनी वाचला होता. त्यामुळे कुरतडे येथे आढळलेल्या कातळातील चित्रकृती म्हणजेसुद्धा कातळखोद शिल्पे असावीत, असा त्यांचा अंदाज आहे. साप्ताहिक ‘कोकण मीडिया’च्या प्रतिनिधींना त्यांनी या कातळातील चित्रकृती दाखविल्या.

ही चित्रे स्पष्ट होण्यासाठी त्या भागाची साफसफाई होणे आवश्यक आहे. कुरतडे येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश मांडवकर यांनी त्यासाठी मदत करायचे ठरविले आहे. जागा स्वच्छ केल्यानंतर चित्रकृती आणखी स्पष्ट होणार आहेत. दहा हजार वर्षांपूर्वीची इतर ठिकाणी सापडलेली कातळशिल्पे आणि कुरतडे येथील या चित्रकृती सारख्याच आहेत का, त्याही तेवढ्याच पुरातन आहेत का, याविषयीचा अभ्यास संबंधित अभ्यासकांनी करावा, अशी अपेक्षा श्री. आंबर्डेकर यांनी व्यक्त केली आहे.

श्री. विलास आंबर्डेकर यांचा संपर्क क्रमांक : (०२३५२) २४५०९८

(कुरतड्यातील या चित्रकृतींचे फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(साप्ताहिक कोकण मीडियाच्या ६ मार्च २०२०च्या अंकात ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंक खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://imojo.in/olzhp)

(कोकणातील कातळ खोद शिल्पांच्या शोधाची कहाणी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Leave a Reply