कोकणातील शिमगोत्सव : मंडणगडचा वैशिष्ट्यपूर्ण ‘डेरा’

‘डेरा’ हा लोककला प्रकार रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील मंडणगड तालुक्यात आढळतो. शिमग्याच्या दिवसांत मंडणगडजवळील पाट या गावातील गवळी समाजाचे लोक हे सादर करतात. हे लोक शिमग्यात घरोघर फिरतात. अन्यत्र कोठे हा प्रकार आढळत नाही.

डेरा म्हणजे मडके. मडक्याच्या तोंडावर चामड्याचे झाकण लावतात, त्याला सीलबंद हुकांनी दोन चामड्याचे पातळ पट्टे अडकवतात. चित्रात दिसतात त्याप्रमाणे ते ओढतात. त्यांचा टरररर टररररर असा तालबद्ध आवाज येतो. त्या वेळी पट्टे ओढणारे हातापायाची पारंपरिक पद्धतीने विशिष्ट प्रकारची हालचाल करतात, कलाकारांच्या सोबत असणाऱ्या चमूतले दोघे-तिघे पारंपरिक गाणी गातात.

पूर्वी मोठी मडकी भरून ताक घुसळत, रवीचे एक टोक वर घराचे आढे धरून बसवलेले असे दोन स्त्रिया दोरी मागेपुढे ओढून रवी फिरवत. त्याचे हे प्रतीक आहे. शिमग्यात हा खेळ घेऊन येणाऱ्यांना पूर्वी धान्य वगैरे देत, आता रोख रक्कम देतात. मंडणगड हे किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले बाजाराचे गाव. त्या काळचे राजवटीच्या सेवेत असणारे विविध जातींचे लोक गावांत राहत. त्यांच्याकडे सेवाकार्ये करणारी, वस्तू पुरविणारी माणसे शिमग्याच्या सणानिमित्त निरनिराळी सोंगे आणत, त्यात ‘डेरा’ हे मोठे आकर्षण असे आणि आजही आहे.

घोडा
शेतकरी पावसापासून वाचण्यासाठी बांबूच्या पट्ट्यांनी विणलेले ‘इरले’ वापरत. एखाद्या जुन्या इरल्याला मध्यभागी चौकोनी खिडकी कोरून ते कमरेभोवती अडकवले जाई. मग अंगावर भपकेबाज पोशाख आणि इरल्याभोवती पायघोळ झूल पांघरत. इरल्याच्या पुढच्या टोकाच्या शेंडीसारख्या हुकावर घोड्याचे तोंड बसवले की झाला शिमग्यातला घोडा! त्याच्यासोबत दहा-बारा जण. ही मिरवणूक घरोघर जाई, ‘राव राव करताय, घोडा मिरवताय’ अशा गजरात घोडेस्वार दारासमोरच्या पायऱ्यांवरून मोठ्या कौशल्याने मागेपुढे करत असे. आता इरलेच बनवले जात नसल्याने ‘घोडा’ इतिहासजमा झालाय.

शिमगा
मंडणगडमध्ये या लोककला सादर करणारे आजही पूर्वीप्रमाणे संघटित आहेत. ते ठराविक दिवशी येतात. कोणीही सोंग काढून दारोदार पैसे मागत फिरावे असा प्रकार होत नाही. तालुक्यातील माहू, बोरघर, कोन्हवली इत्यादी गावांच्या पालख्या येतात. एक-दोन ठिकाणांहून मुलाला नऊवारी लुगडे (साडी) नेसवून गवळणीचा नाचही तेथे येतो. परंतु मंडणगड हे ऐतिहासिक मुख्य ठाणे असल्याने तेथील ग्रामदैवत भैरी गावाची वेस ओलांडत नाही. बाकीचे देव त्याच्या गावात येतात. परंतु कोणताही देव प्रत्यक्ष भेट घेत नाही. अन्य देव मेण्यातून येतात, भैरीची मात्र गोल छताची दोन्ही बाजूंनी उघडी असणारी पालखी असते. हे त्याच्या मुख्यपणाचे चिन्ह. भैरी वस्तीबाहेर आपल्या देवळातच असतो.

सोनारवाडीत दहा दिवस होळी पेटवतात. पौर्णिमेचा होम लागल्यावर दुसऱ्या दिवशी तो पालखीत बसून गावांत येतो. पालखी बसते त्या सहाणेला चौकी म्हणतात. पाच दिवस देवासमोर गावातील कलावंत गणगौळण सादर करतात. साधारणपणे धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी भैरीची पालखी मंडणगड गावातील घरांना भेटी देते. याला ‘छबिना’ म्हणतात. त्या वेळी ‘नाच्या’ पालखीसोबत असतो, अन्य काही गावांप्रमाणे हा नाच्या कुणाच्याही घरी जात नाही. ही मध्ययुगीन मध्यवर्ती गावातील प्रतिष्ठेची खूण असावी.

वैशिष्ट्यपूर्ण ग्रामरचना
उत्तर कोकणातील अन्य डोंगरी किल्ल्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये क्वचितच एकसंध वस्ती दिसते. बहुतेक गावे दूरवर वसलेल्या वाड्यांनी बनलेली आहेत. मंडणगड हे गाव किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जेमतेम सपाटीवर वसले आहे. मुख्य भागात शक्य तेवढ्या रेखीव रस्त्यांच्या दुतर्फा घरे, मध्यभागी मिश्र वस्ती, सभोवती जातवार विभागलेल्या, परंतु परस्परांच्या अगदी निकट वसलेल्या वाड्या ही या गावाची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. मंडणगड गावाचा हा मूळ भाग पन्नास साठ वर्षांपूर्वी प्रशासकीय वहिवाटीत होता. याच भागात तहसीलदार कचेरी, पोलीस वसाहत (पोलीस लाइन) आणि ग्रामपंचायत होती. शाळा, सार्वजनिक वाचनालय, जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्ट ऑफिस, दोन-तीन दुकाने (त्या वेळी पुरेशी), सोनार वगैरे बलुतेदार, दवाखाना हे सगळे होते. एवढेच काय, १९७०च्या आसपास हायस्कूल सुरू झाले तेही याच जुन्या भागात. सुरुवातीची एसटी आणि त्या पूर्वीची खासगी ‘सर्व्हिस बस’ या वस्तीतून पुढच्या गावी जात. पुढचे गाव म्हणजे बाणकोट आणि वेळास.

१९६०नंतर पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आस्थापना भिंगळोली या मंडणगडच्या आधी लागणाऱ्या सपाटीवर वसलेल्या गावी सुरू झाल्या. तरीही १९७३-७४पर्यंत हा जुना भाग चैतन्यमय होता. १९८०पर्यंत पोलीस लाइनदेखील वहिवाटीत होती. आता त्या ठिकाणी शासकीय वसतिगृह आहे.

आता मंडणगडला गेल्यावर प्रथमदर्शनी सुंदर वाटावा असा बसस्थानकाचा परिसर नाही. पूर्वीचे मंडणगड लहानसे, आडवळणी गाव होते, पण तेच देखणे होते खास!

  • राजेंद्रप्रसाद मसुरकर

(डेरा या लोककला प्रकाराची छोटीशी झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत…)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply