रत्नागिरी : करोनाच्या बेरोजगारीच्या काळात देवरूख आणि रत्नागिरीतील काही तरुणांनी आपले ज्ञान, शिक्षण किंवा सामाजिक चौकटीची तमा न बाळगता वेगळ्या वाटेने जाऊन रोजगार शोधला आहे. त्यातील काही तरुण इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आहेत, तर काही जण पौरोहित्य करणारेही आहेत. सध्याच्या काळाची गरज ओळखून त्यांनी घरोघरी वस्तू आणि विविध प्रकारचा माल पोहोचविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
देवरूख येथील श्रेयस डोंगरे, श्रेणीक डोंगरे, कपिल मुळे आणि अभियांत्रिकीच्या त्यांच्या सहाध्यायींनी मिळून करोनाप्रतिबंधक फेसशील्ड तयार केले होते. अल्प किमतीत ते उपलब्ध केल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्यापाठोपाठ याच तरुणांनी देवरूख आणि परिसरात वस्तू घरपोच पोहोचविण्याची सेवा सुरू केली आहे. एखादे सामान घरी विसरले गेले असेल, बाजारातून काही आणायचे असेल, तर गरजेनुसार आवश्यक ती सेवा आणि वस्तू थेट घरी पोहोचविली जाणार आहे. माफक शुल्कात ही सेवा देवरूख शहराच्या पाच किलोमीटरच्या परिसरात अत्यंत माफक मोबदल्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन पेमेंट पर्यायही उपलब्ध आहे.
करोनाच्या लॉकडाउनच्या काळात आणि करोनाप्रतिबंधासाठी असलेले गर्दी टाळण्याचे उपाय म्हणून घरच्या घरी वस्तू पुरविल्या जात आहेत. ग्राहकांनी आपल्या सोयीच्या दुकानातून खरेदी केलेल्या वस्तू घरपोच देणे किंवा त्या वस्तूंची खरेदी करून त्या घरपोच करणे असे या सेवेचे स्वरूप आहे. करोनामुळे लोक घराबाहेर जायला घाबरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची तर फारच पंचाईत होत आहे. अशा सर्वांसाठी सर्वांना घरबसल्या वस्तू पोहोचविल्या जात आहेत. काही ऑनलाइन सेवा पुरवठादार केवळ अन्न आणि खाद्यपदार्थांची सेवा पुरवितात; मात्र ती सेवाही देवरूखसारख्या शहरात उपलब्ध नाही. त्यातूनच या सेवेची कल्पना या तरुणांना सुचली. पाचशे किलोपर्यंतच्या सर्व वस्तूंसाठी ही सेवा सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध आहे. या सेवेकरिता व्हॉट्सअॅपवर संपर्क साधण्यासाठी https://bit.ly/3fezcay या लिंकवर क्लिक करावे. 77760 01036 या मोबाइल क्रमांकावर फोन करावा.
रत्नागिरी शहर-परिसरातील नागरिकांसाठी
रत्नागिरीत पौरोहित्य करणारे योगेश गानू आणि रूपेश पाटणकर यांनीही अशाच पद्धतीची सेवा सुरू केली आहे. रत्नागिरी शहर परिसरापासून अगदी कुवारबाव, खेडशीपर्यंत भाजीपाला, दूध, अंडी आणि किराणा सामानापर्यंत सारे काही घरपोच देण्यासाठी श्री जनरल या नावाने ही सेवा त्यांनी सुरू केली आहे. करोना लॉकडाउनच्या पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात हेल्पिंग हँड्स ही सेवाभावी कार्यकर्त्यांची आभासी साखळी नागरिकांना घरोघरी विविध सेवा पुरविण्यासाठी स्थापन झाली होती. ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी केलेल्या औषधांपासून जीवनावश्यक वस्तू मोफत घरपोच देण्याचे काम सुमारे २५ संस्थांचे कार्यकर्ते निरलसपणे करत होते. लॉकडाउन शिथिल झाले असले, तरी अनेक निर्बंध अजूनही कायम आहेत. लॉकडाउनमुळे पौरोहित्याची कामे झालीच नाहीत. त्यामुळे तीन महिने मिळकतीविनाच गेले. अशा स्थितीत घरपोच वस्तू पोहोचविण्याचे काम या तरुणांनी सुरू केले आहे. डीटीएच डिश, मोबाइल रिचार्ज, वीजबिल भरणा, धार्मिक साहित्य पुरविणे या सेवांसह किराणा माल घरपोच पोहोचवण्याचीही सेवा ते देत असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोणताही अधिक मोबदला न घेता ते ही सेवा घरोघरी पुरवत आहेत. त्यामुळे अनेकांची आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय झाली आहे.
स्वतःहून ठरवले, तर कोणताही व्यवसाय करून उपजीविका करणे शक्य आहे, असाच धडा या तरुणांनी घालून दिला आहे.
श्री जनरल सेवेच्या माध्यमातून वस्तू घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकद्वारे व्हॉट्सअॅपवर ऑर्डर नोंदवावी.
योगेश गानू : https://bit.ly/2Zci8N9
रूपेश पाटणकर : https://bit.ly/2BUQMlz
