रत्नागिरीतील लॉकडाउन शिथिल होणार?; भाजप शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांचे आश्‍वासन

रत्नागिरी : देशात व राज्यात अनलॉक अर्थात लॉकडाउन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्याने सामान्य नागरिकांपासून व्यापारी मंडळी नाराज आहेत. त्यामुळे लोकभावना लक्षात घेऊन लॉकडाउनमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली. त्या वेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यात काही निर्बंध ठेवून शिथिलता देऊ, असे आश्‍वासन दिल्याची माहिती भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात एक ते आठ जुलै कडक लॉकडाउन लागू करण्यात आले होते; मात्र या कालावधीमध्येही करोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे नऊ जुलैपासून १५ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याबाबत चर्चा करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांसह शहराध्यक्ष सचिन करमरकर, सरचिटणीस बाबू सुर्वे आणि भाजयुमो शहराध्यक्ष विकी जैन यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

त्या वेळी अ‍ॅड. पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लोकांची भावना सांगितली. १०० दिवस लॉकडाउन झाल्यानंतर लोकांची मानसिकता जपण्याची गरज आहे. जनता नाराज आहे. व्यापार बंद आहे आणि अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या सर्व भावना लक्षात घेऊन लॉकडाउनमध्ये शिथिलता द्यावी, असे अ‍ॅड. पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे लॉकडाउनमध्ये नक्कीच शिथिलता देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी अॅड. पटवर्धन यांना दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply