वैद्यचूडामणी रघुवीर भिडे कालवश

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रख्यात वैद्य प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे (वय ७३ वर्षे) यांचे आज पहाटे एक वाजून ४० मिनिटांनी निधन झाले. रुग्णांना बरे करण्यासाठी अखेरपर्यंत झटणारा ऋषितुल्य वैद्यराज काळाने हिरावून नेल्याची भावना व्यक्त होत आहे.

बीएस्सी झाल्यानंतर त्यांनी आयुर्वेद क्षेत्रातील वैद्यचूडामणी ही त्यांच्या काळातील सर्वोच्च पदवी संपादन केली होती. रत्नागिरी पालिकेच्या माळ नाका येथील आयुर्वेदीय दवाखान्यात त्यांनी कित्येक वर्षे सेवा दिली. सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या घरी आणि टिळक आळी येथील दवाखान्यात वैद्यकीय सेवा देत असत. अनेक असाध्य आजारांवर त्यांनी उपचार केल्यानंतर रुग्ण बरे होत असत. कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, तसेच एड्ससारख्या रोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांनाही त्यांच्या उपचारांनंतर आराम वाटत असे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, बालसुधारगृह अशा संस्थांमध्ये त्यांनी भरीव काम केले. स्वतः उत्तम ब्रिजचे खेळाडू असलेल्या वैद्य भिडे यांनी त्या खेळाच्या प्रसारासाठीही प्रयत्न केले.

रुग्णांना बरे करण्याचे घेतलेले व्रत त्यांनी अखेरपर्यंत सोडले नाही. आवश्यकता असल्यास घरी जाऊन रुग्ण तपासण्याचे कार्य त्यांनी अगदी करोनाच्या काळातही सुरू ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक अपघात झाला होता आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांना ताप आल्याने करोनाची टेस्ट करण्यात आली. ती सुरुवातीला निगेटिव्ह आली; मात्र नंतर दोन-तीन दिवसांनी पुन्हा केलेली टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे निधन झाले. करोनावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर चर्मालय येथील स्मशानभूमीत रत्नागिरी नगरपालिकेच्या इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वैद्य भिडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, पुतण्या वैद्य मंदार भिडे आणि त्यांना गुरुस्थानी मानणारे असंख्य वैद्य असा मोठा परिवार आहे.
……

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply