रसौषधींच्या ज्ञानाचा अर्क : वैद्य‌ रघुवीर भिडे

वैद्यचूडामणी रघुवीर भिडे यांचे आज (२७ जुलै) निधन झाले. सावंतवाडीतील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा श्रद्धांजलीपर लेख….
…..

आजचा, २७ जुलैचा दिवस उजाडला तोच एक दुःखद वृत्त घेऊन.

रत्नागिरीचे वैद्य रघुवीर भिडे यांच्या दुःखद निधनाचं वृत्त समजलं. ऐकून मला धक्काच बसला. कारण गेल्याच आठवड्यात त्यांच्यासोबत मी फोनवर बोललो होतो.

तसं पाहिलं तर वैद्य रघुवीर भिडे यांच्याशी पूर्वी माझा विशेष परिचय नव्हता. कारणानुपरत्वे आमचं बोलणं बहुधा फोनवरच व्हायचं. गेल्या वर्षापासून मात्र एक रुग्ण म्हणून माझा त्यांच्याशी विशेष परिचय झाला. त्या वेळेपासून त्यांच्या स्वभावातले आणि व्यवसायातले बारकावे माझ्या लक्षात आले. आयुर्वेदामध्ये पूर्वी काष्ठौषधी चिकित्सक आणि रसौषधी चिकित्सक असे वैद्यांचे दोन प्रकार प्रामुख्याने कार्यरत होते. (पंचकर्म-चिकित्सक हा प्रकार अगदी अलीकडचा).

त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्या वेळी आयुर्वेद क्षेत्रात MD ही पदव्युत्तर परीक्षा उपलब्ध नसल्याने त्यांनी जामनगरमध्ये (गुजरात) HPA (Higher Proficiency in Ayurved) हे पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. (जामनगर म्हणजे आम्हा आयुर्वेदीय वैद्यांची पंढरी, तेथून उत्तीर्ण होणाऱ्या वैद्यांकडे सर्व देशभरात अत्यंत आदराने पाहिलं जातं.) त्यानंतर आयुर्वेदाच्या रसौषधी विभागात विशेष अभ्यास करून वैद्यकीय व्यवसायातदेखील प्रावीण्य आणि उज्ज्वल यश संपादन केलं होतं. केवळ आयुर्वेदीय व्यवसाय करून प्रथितयश बनलेल्या, कोकणातील मोजक्या वैद्यांमध्ये त्यांची गणना होत होती. असंख्य असाध्य समजल्या जाणाऱ्या रुग्णांना त्यांनी व्याधीमुक्त केलं होतं. विशेषतः मूत्रपिंडाच्या (kidney) अनेक चिरकालीन व्याधींच्या यशस्वी चिकित्सेच्या बाबतीत त्यांचा हातखंडा होता.

‘काष्ठौषधी’ या प्रकारात औषधी वनस्पतींचं मूळ, खोड, पानं, फुलं आणि फळं हे अवयव वापरून चिकित्सा केली जाते. ‘रसौषधी’ या प्रकारात प्रामुख्याने पारा, गंधक यांच्याबरोबर विविध प्रकारची खनिजं (minerals) विशिष्ट प्रकाराने शुद्ध करून वापरली जातात; तसंच समुद्रातील ‘सुधा वर्ग’ या प्रकारातील मोती, शंख, शिंपले, कवड्या (कपर्दिक), प्रवाळ इत्यादी औषधींचं भस्म यांचा या प्रकारात वापर केला जातो.

काष्ठौषधी प्रकारातील औषधांची मात्रा (प्रमाण) मोठी असते; पण रसौषधींची मात्रा मात्र अतिशय अल्प असते. तसंच काष्ठौषधींमधली काही चूर्णं आणि काढे रुग्णाला सहसा न आवडणाऱ्या चवीचे असतात. याउलट रसौषधींना चव नसल्याने रुग्ण औषधं घेण्याचा कंटाळा करीत नाही. रसौषधींचा वापर सद्य:फलदायी असतो; मात्र त्यांची योजना आणि प्रमाण योग्य असावं लागतं. तरच तो रसवैद्य व्यवसायात यशस्वी ठरतो. याबाबतीत कै. रघुवीर भिडे हे अत्यंत निपुण असल्याने नामांकित वैद्यांमध्ये त्यांची गणना होत होती.

यशस्वी वैद्य असूनही त्यांनी एखाद्या विशिष्ट चिकित्सा प्रकाराचा कधीही आग्रह धरला नाही. तसंच यशासोबत येणाऱ्या गर्वाचा लवलेशदेखील त्यांच्या ठिकाणी नव्हता. नामांकित असूनही ‘अत्यंत अल्प किमती’मध्ये यशस्वी औषधी देणारे वैद्य असा लौकिक त्यांना लाभला होता. व्यवसायात पदार्पण करू इच्छिणाऱ्या अनेक नवीन वैद्यांना हातचं काहीही राखून न ठेवता त्यांनी विद्यादान केलं होतं.

वैद्यकीय शिक्षण घेताना अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या रघुवीर भिडे यांना मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात व्यवसायाला भरपूर वाव होता. परंतु पैसा हे ध्येय न मानलेल्या कै. भिडे यांनी आपल्या वडिलांचा वारसा चालवण्यासाठी रत्नागिरी हेच तेव्हाचं तसं दुर्गम ठिकाण कार्यक्षेत्र म्हणून निवडलं आणि जीवनाच्या अखेरपर्यंत गरीब-गरजू रुग्णांच्या आरोग्यासाठी ते कार्यरत राहिले.

त्यांच्या विपुल व्यावसायिक अनुभवामुळे त्यांना महाराष्ट्रात आणि बाहेरही अनेक ठिकाणी व्याख्यानांसाठी सतत निमंत्रणं येत असत. विना-मोबदला ज्ञानदानाचं त्यांचं हे अमूल्य कार्य शेवटपर्यंत चालूच होतं.

माझा व्यावसायिक मित्र आणि काही बाबतीत गुरुस्थानी असलेल्या या स्नेह्याच्या निधनामुळे आयुर्वेद क्षेत्राचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे. आयुर्वेदातल्या रसौषधींच्या ज्ञानाचा अर्कच जणू आज लुप्त झाला आहे.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

  • वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई, सावंतवाडी

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply