रत्नागिरी : शहराजवळील काजरघाटी (पोमेंडी खुर्द) येथील श्री सिद्धिविनायक फाउंडेशनतर्फे गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे, तसेच वह्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, कृषी विभागाच्या हातखंबा फळरोपवाटिकेचे प्रमुख राजेंद्र कुंभार, सामाजिक कार्यकर्ते विकास पेजे, सरपंच भारती पिलणकर आणि पोलीस पाटील वीणा पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
करोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. अनेक अडचणींना सर्वांना सामोरे जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना मदत म्हणून श्री सिद्धिविनायक फाउंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यात आल्या. पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावी या दोन गटात या वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. करोना काळात आपला जीव धोक्यात घालून लोकांना मदत करणाऱ्या करोना योद्ध्यांचाही सत्कार श्री. इंगळे यांच्या हस्ते झाला.
या वेळी श्री. इंगळे म्हणाले, ‘नव्या पिढीने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. कुंभार जसा मडक्याला आकार देतो, तसे हे विद्यार्थी असतात. या विद्यार्थ्यांना आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात. स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे, तर चांगले प्रशासकीय अधिकारी निर्माण होतील.’
गावातील जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत साबळे यांनी केले. निशांत कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड