नाणारच्या कातळावरची पांढरी रेघ

कोकणच्या विकासासाठी अलीकडे नाणार हा परवलीचा शब्द झाला आहे. कोणे एके काळी कोकणचा कॅलिफोर्निया केला जाणार होता. प्रत्येक व्यासपीठावर कोकणाच्या विकासासंदर्भातील विषय निघाला की कॅलिफोर्नियाचा उल्लेख होत असे. नंतरच्या काळात कोकणाच्या ग्रामीण विकासाची मोठी चर्चा होती. पण ती केवळ चर्चाच होती. नंतर त्याला पर्यटनाची जोड मिळाली. आंबा-काजू आणि मासळी ही कोकणाच्या विकासाची मूलतत्त्वे आहेत, असेही मध्यंतरीच्या काळात घोकले जाऊ लागले. एन्रॉन प्रकल्प आला की कोकणाचा असा काही विकास होईल की सगळे जग कोकणाकडे आकर्षित होईल, असे चित्र त्यानंतरच्या काळात रेखाटले गेले. त्या चित्रामुळे एवढे दिपून जायला झाले, की त्यापुढे कोकणातली दुर्गमता दिसेनाशीच झाली. पण या प्रकल्पामुळे कोकणची राखरांगोळी होणार असल्याची हाकाटी झाल्यामुळे एन्रॉनचा प्रकल्प समुद्रात बुडविला गेला. पण काही काळ तो समुद्रात राहिल्याने तो पूर्णपणे स्वच्छ झाला आणि गुहागरच्या किनारपट्टीवर वसला. बरेच बदल घडल्यानंतर आणि सातत्याने मालकी बदलल्यानंतर एन्रॉन प्रकल्पाचा धुरळा खाली बसला. तोपर्यंत जैतापूरची बत्ती पेटली. ती विझवण्याच्या भीमदेवी थाटातल्या घोषणा झाल्या. सध्या त्या घोषणाही सुरू आहेत आणि बत्ती पेटवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

हे सारे सुरू असतानाच नाणारच्या कातळावर विकासाच्या रेषा उमटायला सुरुवात झाली. कित्येक लाख कोटी रुपये त्यावर खर्च होणार असल्यामुळे लक्षावधी लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्याच्या काळात नाणार हाच मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे. करोनाचे संकट आले नसते तर तो विषय तसाच धुमसत राहिला असता. आता करोना सुरू असला तरी करोनासोबतच जगायचे असल्यामुळे जुने विषय पुन्हा वर आले आहेत‌. करोनाचा वाढता फैलाव आणि गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमान्यांचे कोकणात येणे हे विषय ज्वलंत आहेत. चाकरमानी आपापल्या परीने तो विषय सोडवत आहेत. राजकारणी लोकांच्या घोषणा तात्पुरत्या असतात, हे त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे त्यातून फारसे काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही.

या पार्श्वभूमीवर नाणारच्या रिफायनरीचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या पटलावर आला आहे. तेथे रिफायनरी उभी राहणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे रत्नागिरीचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. स्थानिक नागरिक जोपर्यंत रिफायनरीची मागणी करीत नाहीत, तोपर्यंत रिफायनरीचा पुनर्विचार होणार नाही, अशी भूमिका खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली‌. प्रकल्पासाठी साडेआठ हजार एकर जमिनी प्रकल्पाला देण्याची तयारी असलेले शेकडो स्थानिक भूमिपुत्र खासदार राऊत यांच्या विचारसरणीचे नसल्यामुळे त्यांना ते स्थानिक मानतच नाहीत. त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना हवा असेल तर प्रकल्पाबाबत विचार करण्याचे धोरण जाहीर केले आहे. ते जेव्हा विरोधात होते किंवा सत्तेत राहूनही विरोध करत होते, तेव्हा प्रकल्पाला विरोध करणे त्यांना सोयीचे वाटत होते. आता स्वतःच सत्तास्थानी असल्यामुळे सत्तेचा मुकुट काटेरी असतो, याची जाणीव त्यांना झाली असावी. त्यातूनच त्यांनी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका जाहीर केली आहे. या साऱ्यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात गोंधळ आणि संभ्रमच निर्माण झाला आहे. पण तो दूर होईल. करोनासुद्धा आता ज्या पद्धतीने लोकांच्या अंगवळणी पडला आहे, तशीच नाणारच्या कातळावरची पांढरी रेघ रंग बदलेल आणि जैतापूरप्रमाणेच विरोधाची रेघ पुसली जाईल किंवा त्या रेघेच्या बाजूलाच समर्थनाची मोठी काढली जाऊ शकेल. फक्त वाट पाहायला हवी. ते तर कोकणवासीयांच्या अंगवळणी पडलेलेच आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ३१ जुलै २०२०)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

2 comments

Leave a Reply