रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येने आज (पाच ऑगस्ट) दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. आज सापडलेल्या २२ नव्या रुग्णांमुळे बाधितांची संख्या २०१४ झाली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीत १७, तर ॲन्टीजेन टेस्टमध्ये तिघे रुग्ण आढळले आहेत. तसेच, रात्री उशिरा दोन नवे रुग्ण आढळले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ नवे रुग्ण आढळले आहेत.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज (पाच ऑगस्ट) सायंकाळच्या स्थितीनुसार, आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२ असून, त्यात माटे हॉल, चिपळूण येथील एक, समाजकल्याणमधील सहा, घरडा येथील १२ आणि कामथे, चिपळूण येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३५७ झाली आहे. बरे होणाऱ्यांचे हे प्रमाण ६७.४ टक्के आहे. आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९१ आहे. जिल्ह्यात सध्या २३८ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्यांचे आणि त्यामुळे होम क्वारंटाइन केलेल्यांचे प्रमाण वाढले आहे. आजअखेर होम क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची संख्या २७ हजार ७०० इतकी आहे. परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात कालपर्यंत एकूण दोन लाख ३६ हजार ९५५ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून, इतर राज्यांत, तसेच इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या एक लाख १० हजार ९६५ आहे.
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी करोनाप्रतिबंधक सुविधा दुप्पट करणार असल्याचे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज सांगितले. त्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज १२ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांची एकूण संख्या ४३४ झाली आहे. आतापर्यंत ३१० जण बरे झाले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. १२१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
