रत्नागिरी : लवकरच सुरू होणार असलेल्या गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांकरिता करोनाप्रतिबंधक सोयीसुविधा दुप्पट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (पाच ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार असलेल्या विविध सोयीसुविधांची माहिती मिश्रा यांनी या वेळी दिली. एसटीतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील कशेडी घाटात एसटीची गाडी तपासणीसाठी थांबविली जाणार नाही. पास घेऊन, तसेच विनापास येणाऱ्या वाहनांमुळे कशेडी घाटात तपासणी नाक्यावर गर्दी होत आहे. त्यामुळे साऱ्यांचीच गैरसोय होत आहे. त्यामध्ये एसटीच्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांची तपासणी केली जाणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड तालुक्यांमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्यांसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
येणाऱ्या सर्वांची करोनाविषयक तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या स्क्रीनिंग सेंटरची क्षमता दुप्पट केली जाणार आहे. ५५ वर्षांपेक्षा अधिक वय, तसेच करोनाची लक्षणे असलेल्यांची अँटीजेन चाचणी केली जाणार असून, त्याकरिता १५ हजार किटची व्यवस्था करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील प्रयोगशाळेची क्षमताही दुप्पट केली जाणार आहे. मुंबईतून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या होम क्वारंटाइनचा कालावधी १४ दिवसांवरून दहा दिवस करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. याबाबत मार्गदर्शक सूचना आल्यानंतर सर्वांना तसे कळविले जाणार आहे. कोव्हिड केअर सेंटरची क्षमताही दुप्पट केली जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना होम क्वारंटाइन किंवा संस्थात्मक क्वारंटाइन केले असेल, तर त्यांना उत्सवाच्या मिरवणुकीत किंवा इतरत्र फिरायला, भजन-कीर्तनामध्ये सहभाग घ्यायला मनाई करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे संचारबंदीची नोटीस बजावली जाणार आहे, असेही मिश्रा यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांमधून ८० डॉक्टरांची सुविधा घेतली जाणार आहे. ज्येष्ठ डॉक्टर वगळून आळीपाळीने हे डॉक्टर सेवा उपलब्ध करून देणार आहेत. तसेच आयुर्वेदिक डॉक्टरांकडूनही सेवा घेतली जाईल. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीही कमतरता जाणवत असून, त्याकरिता दररोज चारशे रुपये या मेहनतान्यावर रोजगार दिला जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळा आता तीन पाळ्यांमध्ये चालविली जाणार असून, तेथे आणखी एका मशीनची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे तेथे दररोज दुप्पट नमुन्यांचे अहवाल मिळणे शक्य होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले, की जिल्ह्यातील ३२ पोलीस कर्मचारी करोनाबाधित आणि क्वारंटाइनखाली आहेत; पण ते लवकरच कामावर रुजू होतील, अशी अपेक्षा आहे. बंदोबस्ताकरिता, तसेच तपासणी नाक्यांवर पोलीस मित्रांची मदत घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर उपाय योजला जाणार आहे. पोलिसांसाठी स्वतंत्र कोव्हिड केअर सेंटर सुरू केले जाणार होते; मात्र तेथे तपासणी करणारे डॉक्टर आजारी पडल्यामुळे ते सुरू करण्यात आलेले नाही; मात्र ४० खाटांची व्यवस्था असलेले हे केंद्र लवकरच सुरू करणार असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
One comment