४२ मुलांना करोनातून तारणारा योद्धा धारातीर्थी; डॉ. दिलीप मोरे यांचे निधन

रत्नागिरी : येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टर दिलीप मोरे यांचे आज (ता. ६) सकाळी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

डॉक्टर रुग्णांची रुग्णांची पिळवणूक करतात, असे सर्वसाधारण चित्र असते. पण त्याला पूर्णपणे छेद देणारी आणि प्रसंगी रुग्णाला औषध घेण्यासाठी पैसे नसतील तर स्वतःकडून पैसे देऊन रुग्णांसाठी सेवा बजावणारे डॉक्टर अशी मोरे यांची प्रतिमा होती.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सहाध्यायी असलेले डॉ. मोरे रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून दाखल झाले आणि ते पूर्ण रत्नागिरीकर झाले. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील अत्यंत सेवाभावी डॉक्टर अशी मोरे यांची प्रतिमा होती. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत जिल्हा रुग्णालयात त्यांनी बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा केली. कुवारबाव येथे स्वतःच्या घरीही ते रुग्णांना सेवा देत असत. निवृत्तीनंतर लांजा येथे काही काळ त्यांनी दवाखाना सुरू केला होता. मात्र ते तेथे रमले नाहीत. थोड्याच काळात ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात मानद बालरोगतज्ज्ञ म्हणून रुजू झाले. त्यानंतर सुमारे सहा वर्षे ते तेथे कार्यरत होते. गेल्या मार्च महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा शिरकाव झाला. पुढच्याच महिन्यात सहा महिन्यांच्या एका बालकाला करोनाची बाधा झाली. त्याची आई करोनामुक्त होती. पण तिच्या बालकाला करोना झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करणे अत्यंत आव्हानाचे होते. ते आव्हान डॉ. मोरे यांनी लीलया पेलले. मातेच्या दुधावरच त्या बालकाला बरे करण्यात त्यांनी यश मिळवले. त्यानंतर तीन महिन्यांत सुमारे ४२ बालकांना त्यांनी करोनामु्क्त केले. या काळात रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडलेल्या मुलांच्या मातापित्यांच्या डोळ्यांतून आलेले आनंदाश्रू आपल्या सेवेची चीज झाल्याचे सांगतात, अशी डॉक्टरांची भावना होती.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांबद्दल आणि तेथील वातावरणाबद्दल चांगले बोलले जात नाही. अत्यंत वाईट अनुभव लोकांना येत असतात. पण डॉक्टर मोरे यांच्यासारखे त्याला सन्मान्य अपवाद होते. डॉक्टर मोरे दिवसभरात जिल्हा रुग्णालयात जेव्हा जेव्हा असतील, तेव्हा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक समाधान व्यक्त करत असत.डॉक्टर रुग्णालयात असताना कधीही वादाचे प्रसंग उद्भवले नाहीत. परिचारिका आणि डॉक्टरांच्या बाजूने ते नेहमीच उभे राहिले. पण त्याच वेळी कोणताही कडवट प्रसंग निवारण करण्यात डॉक्टरांचा हातखंडा होता. त्यामुळेच ते रुग्णांबरोबरच रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये प्रिय होते.

याच महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी जिल्हा रुग्णालयातील मानद सेवा थांबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याच दरम्यान त्यांना स्वतःला करोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. मात्र काल दिवसभरात त्यांची प्रकृती ढासळली आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले. करोनाच्या कराल दाढेतून ४२ बालकांना सुखरूप बाहेर काढणारा करोनाचा योद्धा त्याच्या स्वतःच्या युद्धभूमीवरच धारातीर्थी पडला आहे. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

एका चिमुकल्याला करोनावर मात केल्यानंतर घरी सोडतानाचा हा व्हिडिओ एप्रिल महिन्यातील आहे. या व्हिडिओत सगळ्यात पुढे चालत आलेले डॉक्टर दिलीप मोरे आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply