विशेष एसटी गाड्यांचा लाभ घेण्याचे महाराष्ट्र एसटीप्रेमी महासमूहाचे आवाहन; असे आहे वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र एसटीप्रेमी महासमूहातर्फे करण्यात आले आहे.

याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की ‘गावी जाईन तर एसटीनेच जाईन!’ असे अभिमानाने म्हणणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांचे एसटी लाल परीबद्दल असलेल निस्सीम प्रेम आणि गणपती बाप्पावर असलेल्या भक्तीला तोड नाही. वर्षातील गौरी-गणपती उत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी ही मोठी पर्वणीच असते. उत्सवाची तयारी एक-एक महिना अगोदरपासूनच सुरू झालेली असते. प्रत्येक जण नोकरीव्यवसायासाठी मुंबई-पुण्यात असतो. अगोदरच सुट्ट्यांचे, रजेचे नियोजन करून उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज होतो; पण गावी जाण्यासाठी त्यांची पहिली पसंती एसटीलाच असते. कारण बऱ्याच वर्षांपासून एसटीतर्फे दर वर्षी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना त्यांच्या गावी जाता यावे, म्हणून विशेष नियोजन करून जादा गाड्या सोडल्या जातात. या वर्षी मात्र करोनाचे संकट असल्याने एसटीच्या अत्यावश्यक सेवा आणि जिल्हांतर्गत बससेवा सोडल्या तर बाकी सर्व सेवा ठप्पच आहेत; मात्र खास गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्या १२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. या सेवेकडे एसटी कर्मचारी, महामंडळ आणि एसटीप्रेमी खूप आशा लावून बसले आहेत. त्यामुळे एसटीच्या जादा गाड्यांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चाकरमान्यांच्या माहितीसाठी जादा गाड्यांचे वेळापत्रकही देण्यात आले आहे.
दररोज सुटणाऱ्या या गाड्यांचे वेळापत्रक असे –
बोरिवली-चिपळूण सकाळी ६:३०, बोरिवली-महाड सकाळी ६:३०, बोरिवली-महाड सकाळी ११:३०, बोरिवली-कणकवली सायंकाळी ४:३०, बोरिवली-लांजा सायंकाळी ६:३०, बोरिवली-गुहागर रात्री ९.१५, बोरिवली-दापोली रात्री ९:३०, बोरिवली-खेड रात्री ९:३०.

चिंचवड-महाड सकाळी ८, चिंचवड-रत्नागिरी रात्री ८:३५, चिंचवड-चिपळूण रात्री ९, चिंचवड-दापोली रात्री ९:३०, चिंचवड-देवरूख रात्री ९:३०, चिंचवड-गुहागर रात्री १०, चिंचवड-खेड रात्री १०:३०.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply