सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेशासाठी ई-पास नको; पण १४ दिवस होम क्वारंटाइन आवश्यक

सिंधुदुर्गनगरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाउन शिथिल करण्यासाठी सुरू झालेल्या मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेशासाठी ई-पासची आवश्यकता नाही. मात्र येणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहणे आवश्यक आहे, असे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे.

अर्थचक्राला गती देण्यासाठी आजपासून (ता. २) राज्यात तसेच राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता असणार नाही, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. खासगी बसेसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपाहारगृहे) आणि लॉज (निवासगृहे) १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक, हॉटेल, लॉजेसचे कार्यान्वयन याबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली जारी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहणे बंधनकारक असणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी शासकीय कार्यालयांमध्ये अ व ब गटातील अधिकाऱ्यांची यापुढे १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि वेळोवेळी सूचित करण्यात आलेल्या इतर महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचारी किंवा किमान ३० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी किंवा किमान ५० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. खासगी कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार ३० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय आणि खासगी कार्यालये आणि आस्थापना यामध्ये निरीक्षण अधिकारी (व्हिजिलंट ऑफिसर) नियुक्त करणे आवश्यक करण्यात आले असून हा अधिकारी सॅनिटायझेशन, शारीरिक अंतर आणि इतर सुरक्षाविषयक उपयायोजनांकडे लक्ष पुरवेल.

आंतरजिल्हा प्रवासी व मालवाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. त्यासाठी ई-परमिट, संमती, स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply