माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक ४ (आचरे केंद्रशाळेतील ठाकूर गुरुजी)

श्री. ठाकूर गुरुजी

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील चौथा लेख आहे सुगंधा केदार गुरव यांचा… आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बा. ना. बिडये विद्यालय केंद्रशाळेतील शिक्षक सुरेश श्यामराव ठाकूर यांच्याविषयीचा…
………
‘शाळा आमची आहे किती छान, नि आम्ही रोज शाळेला जाणार!’ हे गाणे मुलाच्या ओठावर येते, तेव्हा समजावे, की शाळा आणि शिक्षक खऱ्या अर्थाने मुलाला आवडू लागले आहेत. माझेही तसेच झाले. या जगात पदार्पण केले, तेव्हाच परिसरातून शिक्षण सुरू झाले; मात्र लौकिक अर्थाने पहिलीत प्रवेश घेतला ती माझी पहिली शाळा. अर्थात जीवन शिक्षण विद्यामंदिर म्हणजे बाळकृष्ण नारायण बिडये विद्यालय केंद्र शाळा आचरे नंबर एक.

शाळेचा जन्म स्वातंत्र्यापूर्वीचा, १८५७चा. निसर्गरम्य परिसर, कौलारू छपराची प्रसन्न शाळा मला प्राणांइतकीच प्रिय आहे. त्याचे कारण म्हणजे मला लाभलेले शिक्षक, ज्यांनी उत्तम संस्कारांनी माझी जडणघडण केली. फक्त अभ्यासक्रम पूर्ण न करता विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना हेरून योग्य दिशा देण्याचे काम करतो तोच खरा शिक्षक! असेच मला लाभलेले शिक्षक म्हणजे आदरणीय सुरेश श्यामराव ठाकूर गुरुजी.

‘राहणी साधी, विचार मोठे!’ उत्तम कथाकथन, नाट्यीकरण, वक्तृत्व आणि सामाजिक जाणीव असणाऱ्या ठाकूर गुरुजींचा प्रभाव माझ्यावर पडला नसता तर नवलच. माझ्यातील कलागुणांना हेरून आयुष्याला उत्तम शिस्त लावण्याचे महान कार्य गुरुजींनी केले. ‘शिक्षक हा निव्वळ पेशा नसून, पालकत्वाचे दुसरे नाव आहे,’ हे ठाकूर गुरुजींकडे पाहून मलाच काय तर त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकालाच पटेल.

काटकसर, कष्ट, स्वावलंबनाबरोबरच ‘जेजे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकलांसी!’ ही शिकवण गुरुजींकडून मिळते. उत्तम अभिनय, वक्तृत्व, हजरजबाबीपणा, व्यासपीठ आणि प्रेक्षकांची मने जिंकण्याचे बाळकडू गुरुजींकडूनच मिळाले. चांगल्याचे कौतुक आणि चुकीसाठी खडसावणारे गुरुजी माझे खरे पालकच. शाबासकीची थाप आणि हक्काने रागावणे हे माझ्या बाबतीत नेहमीच घडते. माझ्या दुःखद प्रसंगातून जिद्दीने उभे राहण्याचे बळ गुरुजींनी दिले. सतत कार्यमग्न आणि कार्यतत्पर असणारे गुरुजी सर्वांनाच वंदनीय आहेत. विद्यार्थी बनून धडे घेता घेता विद्यार्थ्यांना धडे देण्याचे अर्थात मी विद्यार्थिप्रिय शिक्षिका बनण्याचे सारे श्रेय गुरुजींनाच जाते.

गुरवे नमः गुरवे नमः!

 • सुगंधा केदार गुरव
  (केंद्रप्रमुख, केंद्रशाळा आचरे नं. १, मु. पो. आचरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)
  पत्ता : मु. पो. आचरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१४
  मोबाइल : ९४२०० ७८५१९
  ई-मेल : Skgurav07@gmail. com
  …..
  (उद्याचा लेख सदानंद कांबळी यांचा)
  (या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply