माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक ८ (कणकवली शाळा क्र. चारचे एकावडे गुरुजी)

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील आठवा लेख आहे कल्पना धाकू मलये यांचा… कणकवली शाळा क्रमांक चारचे (तत्कालीन) मुख्याध्यापक दत्ताराम तुकाराम एकावडे यांच्याविषयीचा…
………
नमस्कार. मी कणकवली जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक पाच आणि चारची मुख्याध्यापिका आहे. हा भार पेलवत असताना खूप संमिश्र भावना दाटून येतायत. मी ज्या शाळेत माझं पहिलं पाऊल टाकलं ती शाळा म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली, गजबजलेली, जि. प. शाळा कणकवली क्र. ४. आजही मन ४० वर्षं मागे फिरून पहिलीच्या वर्गात जाऊन बसतं आणि मग डोळ्यांसमोर उभे राहतात करड्या शिस्तीचे एकावडे गुरुजी. दत्ताराम तुकाराम एकावडे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक…

शाळा सकाळ आणि दुपार सत्रात भरायची. सकाळ सत्रातली शाळा साडेसात वाजता भरायची. साडेसात वाजले, की शाळेचं मुख्य गेट बंद. नंतर येणाऱ्या मुलांची लांबलचक रांग लागायची. परिपाठ संपल्यानंतर, उशिरा येणाऱ्यांच्या हातावर सकाळच्या थंड वातावरणात एकावडे गुरुजींची सणसणीत पट्टी बसल्यामुळे हात सुन्न व्हायचे. मला कधी उठायला उशीर झाला, तर चाळीतली मुलं टाकून निघून जायची. एकावडे गुरुजींच्या घड्याळाच्या काट्याची एवढी जरब होती.

पहिलीच्या वर्गाला शिकवणाऱ्या नऊवारीतल्या खानोलकरबाईंनी आणलेली लिमलेटची गोळी पहिल्या तासाला तोंडात विरघळताना नजर व्हरांड्यात जागता पहारा देणाऱ्या एकावडे गुरुजींच्या पावलांवर स्थिरावायची. गुरुजींच्या कडक शिस्तीच्या बडग्याची ना मुलांनी तक्रार केली, ना पालक वकिली करायला शाळेत गेले.

कणकवली शाळा क्रमांक चार

गुरुजी तेवढेच प्रेमळ होते. उपक्रमांच्या बाबतीत नेहमी आग्रही असायचे. परिपाठाला पटांगणात शेकडो मुलं शिस्तीने रांगेत बसलेली असायची ती निव्वळ धाकापोटी नाही, तर परिपाठातल्या नाविन्यतेमुळे. विद्यार्थ्यातली चमक ओळखून त्याला सादरीकरणाची संधी प्राधान्याने दिली जायची. शाळेसाठी वाढदिवस निधी गोळा केला जायचा. शाळाबुडव्यांची पालखी हमखास असायची.

स्वच्छ, सारवलेल्या वर्गखोल्या, अंगणासह शाळा बागेतल्या फुलांसारखी प्रसन्न हसायची. बहारदार स्नेहसंमेलन आणि नियमित व्यायाम प्रसन्न करून जायचे. एकावडे गुरुजींनी घालून दिलेले शिस्तीचे, वेळेच्या बंधनाचे धडे गिरवताना खूप अभिमान वाटतो.

गुरुजींची उंची मी कधीच गाठू शकणार नाही. गुरुजींनी ज्या शाळेचं मुख्याध्यापकपद भूषवलं, शाळा नावारूपाला आणली, ती शाळा बंद कपाट होऊन माझ्या शाळेच्या आश्रयाला आली आणि मी माझ्याच शाळेची भारवाही मुख्याध्यापक झालेय. उरात हुंदका दाटून येतोय.

  • कल्पना धाकू मलये
    (मुख्याध्यापिका, जि. प. शाळा कणकवली क्र. ५ आणि ४; लेखिका)
    पत्ता : शिवाजीनगर, मु. पो. ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०२
    मोबाइल : ९६७३४ ३८२३९
    …..
    (पुढचा लेख उज्ज्वला धानजी यांचा)
    (या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply