नावे उघड करा, समूहसंसर्ग रोखा

दापोलीतील एक प्रथितयश डॉक्टर वसंत मेहेंदळे यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. आपले सुमारे चाळीस वर्षे चाललेले रुग्णालय बंद करण्याचा निर्णय त्यांनी मृत्यूपूर्वी महिनाभर घेतला होता. एक सप्टेंबरपासून ते रुग्णालय बंद करण्याच्या आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले होते. ती तारीख उलटून गेली. ते रुग्णालय आणि रुग्णसेवा हाच डॉक्टरांचा श्वास होता. तोच थांबल्यामुळे त्यांनीही जगाचा निरोप घेतला; पण हे रुग्णालय बंद करण्यासाठी त्यांनी दिलेली कारणे खूपच लक्षवेधी होती. त्याकडे ज्यांनी लक्ष द्यायला हवे, ते पार दुर्लक्षच करणार, यात शंका नाही.

करोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना सरकारकडून कोणतेच संरक्षण दिले जात नाही. केवळ रुग्णालये बंद करण्याची, वैद्यकीय परवाना रद्द करण्याची धमकी त्यांना दिली जात आहे. रुग्णसेवा करणाऱ्यांवर हा अन्याय होता. त्याच्या निषेधार्थ आणि त्या परिस्थितीत कोणताही बदल होण्याची शक्यता नसल्याचे लक्षात घेऊन रुग्णालय बंद करण्याचा निर्णय डॉक्टर मेहेंदळे यांनी घेतला होता. करोनासंदर्भातच त्यांनी आणखी एका विषयाकडे लक्ष वेधले होते. करोनाच्या रुग्णांची नावे गुप्त ठेवण्याची पद्धत चुकीची आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यातील मंत्री अशोक चव्हाण अशा व्यक्तींना करोनाची लागण झाल्यानंतर ती माहिती प्रसारित होत असेल, तर सर्वसामान्य लोकांची नावे उघड करायला काहीच हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. ती मागणी त्यांनी सरकारपर्यंत पोहोचवली होती. त्याची कारणेही त्यांनी स्पष्ट केली होती. सर्वसामान्य लोक सर्वसामान्य लोकांमध्येच मिसळत असतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढायला मदत होते. खासगी डॉक्टरांना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णाला करोनाची बाधा झाल्याचे माहीत असले, तर ते त्याचे प्रबोधन करू शकतात; पण नावे गोपनीय ठेवण्याच्या पद्धतीमुळे तो रुग्ण सर्वत्र वावरत राहतो आणि पर्यायाने करोनाचा प्रसार व्हायला अधिक मदत होते. हे टाळले पाहिजे, असे डॉक्टरांचे मत होते.

करोना हा काही लपवून ठेवण्यासारखा आजार नाही; पण त्याविषयी जो प्रचंड मोठा गहजब माजवला गेला आहे, त्यामुळे करोनाविषयीची भीती लोकांच्या मनामध्ये ठासून भरली आहे. करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आलेल्या राष्ट्रीय पथकाने आपले निष्कर्ष सांगितले. पुण्यासारख्या शहरातही लोक आजार लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच त्या भागात रोगाच्या फैलावाला वाव मिळाला, असे त्या पथकाचे निरीक्षण होते. याचाच अर्थ नावे गोपनीय ठेवणे घातक आहे. केंद्र आणि राज्य सरकारनेही त्याचा विचार करायला हवा. करोनाप्रतिबंधक लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे आता सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे लोकांचा एकमेकांशी असलेला संपर्क वाढला आहे. मास्क, सॅनिटायझर या आयुधांचा वापर करण्याचा आग्रह धरला जात असला, तरी दोन व्यक्तींमधील अंतर राखण्यात खूपच मर्यादा आहेत. अशा स्थितीत करोनाबाधिताचा वावर सर्वत्र राहिला, तर ते अधिक धोकादायक आहे. त्यामुळे करोना झालेल्या व्यक्तीची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे हा करोनाचा समूहसंसर्ग रोखण्यासाठी सर्वाधिक प्रतिबंधक उपाय ठरणार आहे. ज्याला करोना झाला आहे, त्याचे नाव समजले, तर ती व्यक्ती राहत असलेली वाडी, गाव सतर्क होऊ शकते. करोनाच्या फैलावाला आळा बसू शकतो. लोक सावधगिरी बाळगू शकतात. करोनाबाधितांची नावे जाहीर करणे हा गुन्हा असेल, तर ज्यांची नावे करोनाबाधित म्हणून जाहीर होत आहेत, त्यांच्याविरुद्ध आधी गुन्हा नोंदविला गेला पाहिजे किंवा नावे जाहीर करण्याबाबत योग्य तो बदल केला पाहिजे.

डॉक्टर मेहेंदळे लोकप्रिय होते. त्यामुळे त्यांच्या ऑनलाइन शोकसभा होतील. अनेक जण शोकसंदेश देतील. श्रद्धांजली वाहतील; पण करोनाच्या रुग्णांची नावे गुप्त राखण्याची पद्धत रद्द करायला लावणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्यासाठी सत्तारूढ आणि विरोधातील राजकीय नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे लोकांचे खरोखरीच भले होईल.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ११ सप्टेंबर २०२०)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा ४ सप्टेंबरचा अंक मोफत डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply