शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२०पासून अधिक आश्विन शके १९४२ हा महिना सुरू होत आहे. या वर्षी १९ वर्षांनी आश्विन महिना अधिक आला आहे. त्या निमित्ताने या भारतीय महिन्याचे महत्त्व विशद करणारी ही मालिका.
भारतीयांना कालगणना फार पूर्वीपासूनच माहीत होती. शालिवाहन शक, विक्रम संवत्सर आणि नंतरची ब्रिटिशांची इसवी सनाची पद्धत भारतात अस्तित्वात आहे.
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य बारा राशींमधून प्रवास करत एक वर्ष पूर्ण करतो. या प्रवासाला त्याला ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे आणि ४७।। सेकंदे लागतात. याला सौर वर्ष म्हणतात. एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतचा काळ म्हणजे चांद्रमास. असे १२ चांद्रमास होण्यासाठी जो काळ लागतो, ते चांद्रवर्ष होय. हा काल सुमारे ३५४ दिवसांचा असतो. सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यांमध्ये सांगड घालण्यासाठी अधिकमासाची योजना केली जाते. यात ११ दिवसांचा पडणारा फरक भरून काढण्यासाठी अधिकमासाची योजना करतात.
ही कालगणना सौरवर्षाशी जुळवून घेण्यात येते. त्यामुळे साधारणपणे तीन वर्षांनी अधिकमास येतो. चैत्र ते कार्तिक या आठ महिन्यांपैकीच कोणता तरी एक महिना अधिक असतो. चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे १२ वर्षांनी, आषाढ १८ वर्षांनी, भाद्रपद २४ वर्षांनी, आश्विन १९ वर्षांनी व कार्तिक ७०० वर्षांनी अधिक येतो. मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे महिने कधीही अधिक येत नाहीत. कारण या महिन्यांमध्ये सूर्याची गती मंद असते आणि त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करायला अधिक वेळ लागतो.
या वर्षी आश्विन महिना अधिक आहे. इंग्रजी कालगणनेनुसार लीप वर्षही आहे. इंग्रजी कालगणनेलाही ३६५ दिवस १२ महिन्यांत बसवण्याची कसरत करावी लागली आहेच.
या अधिक धरलेल्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होत नाही. ज्या महिन्यात सूर्यसंक्रमण नसते, तो अधिकमास. त्या महिन्याला पुढच्या महिन्याचे नाव दिले जाते. कालगणनेच्या पद्धतीमध्ये थोडा फरक असल्यामुळे टिळक पंचांग आणि दाते पंचांग यांचा अधिकमास वेगवेगळा असतो.
एका पौराणिक कथेनुसार पूर्वी काही विशिष्ट धार्मिक कृत्यांसाठी अधिकमास अपवित्र मानला जाई. त्यामुळे त्याला ‘मल मास’ असे म्हटले जाई. आपल्या या नावाचे अधिकमासाला म्हणे खूप वाईट वाटले. म्हणून त्याने आपले गाऱ्हाणे श्री विष्णूंना सांगितले. विष्णूंनी त्याला गोकुळात श्रीकृष्णाकडे नेले. श्रीकृष्णाने दयाळू होऊन अधिकमासाला ‘पुरुषोत्तम’ मास असे नाव देऊन श्रेष्ठत्व बहाल केले.
या अधिकमासात केलेले दान, व्रत, पूजा अत्यंत फलदायी ठरते, असे मानले जाते. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करून त्यांना मोक्ष मिळवून देतो, असा अधिकमासाचा महिमा आहे. या महिन्यात सर्वगुणसंपन्न अशा पुरुषोत्तमाची, राधाकृष्णाची मनोभावे पूजा करावी. भागवत पुराणांचे वाचन करावे. भागवत कथा सप्ताह साजरा करावा. तसेच दानधर्म करावा. मन अधिकाधिक पवित्र ठेवावे. आचरण शुद्ध असावे, असे सांगितले आहे.
……
अधिक मासाविषयी अधिक माहिती
आपले १२ चांद्रमासांचे वर्ष सुमारे ३५४ दिवसांचे असते आणि सौर वर्ष हे ३६५ दिवसांचे असते. म्हणजे दर वर्षी सौर वर्ष मानापेक्षा चांद्रमासांचे वर्षांचे मान ११ दिवसांनी कमी असते. दर वर्षी ११ दिवस शिल्लक राहून ३० दिवस होत आल्यावर म्हणजे सुमारे दर तीन वर्षांनी एकदा अधिकमास येतो व सौर वर्षमानाशी मेळ घालून ऋतुचक्र व कालचक्र यांची योग्य पद्धतीने सांगड घातली जाते. इंग्रजी आणि हिंदू कालगणनेमधील फरक येथे लक्षात घेतला पाहिजे. (हिंदू शकानंतर ७८ वर्षांनी इसवी सन सुरू झाला आहे.)
प्रत्येक चांद्रमासात अमावास्या समाप्तीपूर्वी सूर्याचे संक्रमण होत असते. परंतु सूर्याच्या कमी गतीच्या काळात साधारणपणे २७ ते ३५ महिन्यांच्या कालावधीत एखाद्या चांद्रमासाच्या अमावास्या समाप्तीपूर्वी सूर्याचे राशिसंक्रमण जेव्हा होत नाही, अशा वेळेस त्या महिन्याला मलमास, अधिकमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना, असे संबोधले जाते. त्यानंतरच्या महिन्यास शुद्ध मास किंवा निज मास असे संबोधले जाते.
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक व फाल्गुन यापैकी एखादा महिना तीन वर्षांतून एकदा अधिकमास होऊ शकतो. (मार्गशीर्ष, पौष व माघ हे महिने अधिकमास होत नाहीत.) तसेच ज्या चांद्रमासात सूर्याचे राशिसंक्रमण दोन वेळा होते, त्याला क्षयमास संबोधले आहे. हा क्षयमास सुमारे १४१ किंवा क्वचित १९ वर्षांनी येतो. त्या चांद्रमासाला क्षयमास असे नाव देऊन पुढील महिन्याचेसुद्धा नाव दिले जाते. ज्या वर्षी क्षयमास येतो, त्यावर्षी क्षयमासापूर्वी एक आणि क्षयमासानंतर एक अधिकमास येतो. त्यापैकी पूर्वीच्या अधिकमासास ‘संसर्प’ आणि क्षयमासास ‘अंहस्पति’ अशा संज्ञा आहेत. (कार्तिक, मार्गशीर्ष व पौष यापैकी क्षयमास होतो. कारण सूर्याची गती अधिक असते आणि माघ महिना क्षय किंवा अधिकमास होत नाही.)

यापूर्वी शके १८८५मध्ये कार्तिक क्षयमास आलेला होता (क्षयमासापूर्वी कार्तिक हाच अधिकमास होता.) त्यानंतर शके १९०४ मध्ये पौष क्षयमास आलेला होता (क्षयमासानंतर फाल्गुन अधिकमास होता.) यानंतर शके २०४५मध्ये मार्गशीर्ष हा क्षयमास असेल (क्षयमासापूर्वी आश्विन हा अधिकमास असेल) आणि शक २०६४ मध्ये पौष हा क्षयमास असेल (क्षयमासापूर्वी हा अधिकमास असेल).
…………………
या अधिक महिन्याचे महत्त्व सांगणारी मोठी पोथी आहे. महिन्यातील प्रत्येक दिवसानुसार ३१ दिवसांचे महत्त्व त्यात सांगितले गेले आहे. प्रत्येक अध्यायात ३० ते ५५ असे सुमारे १२०० श्लोक आहेत. श्रीकृष्णाने अधिकमासाचे दुःख दूर करून त्याला ‘पुरुषोत्तम मास’ असे नाव दिले, ही कथा सहाव्या अध्यायात आहे. संस्कृतमध्ये असलेल्या या पोथीविषयी कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने त्या सहाव्या अध्यायातील श्लोकांचा अर्थ आजपासून येथे देणार आहोत. हा अनुवाद रत्नागिरीच्या फाटक प्रशालेतील माजी शिक्षिका सौ. प्रतिभा शरद प्रभुदेसाई यांनी करून दिला आहे.
सौ. प्रभुदेसाई एमए, बीएड, पंडित आहेत. त्यांनी फाटक प्रशालेत संस्कृत आणि इंग्रजीचे अध्यापन केले आहे. त्या सध्या गतिमंद मुलांसाठी निःशुल्क मार्गदर्शन करत आहेत.
……..
१८ सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध प्रतिपदा, शके १९४२
नारद उवाच वैकुण्ठाधिपतिर्गत्वा गोलोकं किं चकार ह । तद्वदस्व कृपां कृत्वा मह्यंशुश्रूषवेsनघ ।।१।।
अर्थ : नारद म्हणाले, हे वैकुण्ठाधिपती नारायणा, आपण गोलोकामध्ये जाऊन काय केलेत, ते पापरहित अशा भगवंता, माझ्यासारख्या श्रोत्यावर कृपा करून सांगावे.
…………..
१९ सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध द्वितीया, शके १९४२
श्रुणु नारद वक्ष्येsहं यज्ज्ञातं तत्र तेsनघ। विष्णुर्गोलोकमगमदधिमासेन संयुतः।।२।।
अर्थ : हे नारदा, अधिकमासाला घेऊन विष्णू भूलोकात गेल्यावर जे घडले ते मी तुला सांगतो, ऐक.
…………..
२० सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध तृतीया/चतुर्थी, शके १९४२
तन्मध्ये भगवद्धाममणिस्तम्भैः सुशोभितम् । ददर्श दूरतो विष्णुःज्योतिर्धाम मनोहरम् ।।३।।
अर्थ : त्या गोलोकामध्ये तेजस्वी रत्नांनी जडविलेले स्तंभ असलेला, अत्यंत सुशोभित असा श्री पुरुषोत्तमाचा महाल श्री विष्णूंनी दुरूनच पाहिला.
…………..
२१ सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध पंचमी, शके १९४२
तत्तेजः पिहिताक्षोsसौ शनैरुन्मील्य लोचने। मन्दं मन्दं जगामाधिमासंकृत्वा स्वपृष्ठतः ।।४।।
अर्थ : त्या महालाच्या तेजाने डोळे दिपून गेलेल्या विष्णूंनी आपले चक्षू हळुवारपणे उघडले व अधिक मासाला आपल्या मागे घेऊन मंद पावले टाकत ते महालाकडे निघाले.
…………..
२२ सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध षष्ठी, शके १९४२
उपमन्दिरमासाद्य साधिमासो मुदान्वितः। उत्थितैद्वारपालैश्च वन्दिताङ्घ्रिर्हरिः शनैः।। ५ ।।
अर्थ : अधिकमासासोबत भगवान पुरुषोत्तमांच्या महालाजवळ जाऊन श्री विष्णू अत्यंत आनंदित झाले. उठून उभ्या राहिलेल्या द्वारपालांच्या अभिवादनाचा स्वीकार करून ते सावकाश महालाकडे गेले.
…………..
२३ सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध सप्तमी, शके १९४२
प्रविष्टो भगवद्धाम शोभासंमुष्टलोचनः । तत्र गत्वा ननामाशु श्रीकृष्णं पुरुषोत्तमम् ।। ६ ।।
अर्थ : भगवंतांच्या सुशोभित महालाच्या दर्शनाने संतुष्ट झालेल्या श्री विष्णूंनी महालात प्रवेश केला व श्रीकृष्ण पुरुषोत्तमाला वंदन केले.
…………..
२४ सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध अष्टमी, शके १९४२
गोपिकावृन्दमध्यस्थं रत्नसिंहासनम्। नत्वोवाच रमानाथो बद्धाञ्जलिपुटः पुरः ।। ७ ।।
अर्थ : मण्डलाकार बसलेल्या गोपींमध्ये रत्नसिंहासनावर आरूढ झालेल्या श्रीकृष्ण पुरुषोत्तमासमोर हात जोडून श्री विष्णू म्हणाले.
…………..
२५ सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध नवमी, शके १९४२
वन्दे विष्णुं गुणातीतं गोविन्दमेकमक्षरम्। अव्यक्तमव्ययं व्यक्तं गोपवेषविधायिनम् ।।
अर्थ : गुणांच्याही पलीकडे असलेल्या, गोविंदाला, अद्वितीय अशा, सूक्ष्म, विकाररहित अशा, गोपवेष धारण करणाऱ्या पुरुषोत्तमाला वन्दन करतो.
…………..
२६ सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध दशमी, शके १९४२
किशोरवयसं शान्तं गोपीकान्तं मनोहरम् । नवीननीरदश्यामं कोटिकन्दर्पसुन्दरम् ।।९।।
अर्थ : किशोरवयीन, शान्तस्वरूप, गोपींना प्रिय असणारा, अत्यंत मनोहारी, नवीन ढगासारखा श्यामवर्ण असलेला आणि कोट्यवधी कामदेवांसारखा सुंदर (अशा पुरुषोत्तमाला मी वंदन करतो.)
…………..
२७ सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध एकादशी, शके १९४२

वृन्दावनवनाभ्यन्ते रासमण्डलसंस्थितम्। लसत्पीतपटं सौम्यं त्रिभङ्गललिताकृतिम् ।।१०।।
अर्थ : वृंदावनामध्ये, रासमंडलात राहणाऱ्या, पीतांबर धारण करणाऱ्या, अत्यंत सौम्य आणि बासरी वाजवताना शरीराला तीन ठिकाणी वक्राकार (त्रिभंग) केल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या (पुरुषोत्तमाला मी वंदन करतो.)
…………..
२८ सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध द्वादशी, शके १९४२
रासेश्वरं रासवासं रासोल्लासमुत्सुकम् । द्विभुजं मुरलीहस्तं पीतवाससमच्युतम् ।। ११ ।।
अर्थ : रासक्रीडेचा जणू ईश्वर असलेल्या, रासक्रीडेमध्ये मग्न असलेल्या, रासलीलेचा आनंद घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असलेल्या, दोन बाहू असलेल्या, हातामध्ये बासरी धारण करणाऱ्या, पीतांबरधारी अच्युताला (मी वंदन करतो.)
…………..
२९ सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध त्रयोदशी, शके १९४२
इत्येवमुक्त्वा तं नत्वा रत्नसिंहासने वरे। पार्षदैः सत्कृतो विष्णुःस उवास तदाज्ञया ।। १२ ।।
अर्थ : अशा प्रकारे श्रीविष्णूंनी श्रीकृष्णांची स्तुती केली. त्यांना नमस्कार केला. त्यानंतर सेवकांनी केलेला सत्कार स्वीकारून श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार उत्तम अशा रत्नखचित सिंहासनावर श्रीविष्णू विराजमान झाले.
…………..
इति विष्णुकृतं स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् । पापानि तस्य नश्यन्ति दुःस्वप्नः सत्फलप्रदः ।। १३ ।।
अर्थ : हे श्रीविष्णूंनी रचलेले श्रीकृष्णांचे स्तोत्र (श्लोक८ते १२) जो रोज सकाळी उठून जो म्हणेल, त्याची सर्व पापे नाहीशी होतील आणि वाईट स्वप्नेही उत्तम फलदायी होतील.
…………..
३० सप्टेंबर २०२०
अधिक आश्विन शुद्ध चतुर्दशी, शके १९४२
भक्तिर्भवति गोविन्दे, पुत्रपौत्रविवर्धिनी। अकीर्तिः क्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वर्धतेचिरम् ।।१४।।
अर्थ : (या स्तोत्रामुळे) मुलां-नातवंडांमध्ये गोविंदाविषयी भक्तिभाव वाढतो. अपकीर्तीचा नाश होतो आणि सत्कीर्ती दीर्घकाळ वाढत राहते.
…………..
१ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन पौर्णिमा, शके १९४२
उपविष्टस्ततो विष्णुः श्रीकृष्णचरणाम्बुजे । नामयामास तं मासं वेपमानं तदग्रतः ।। १५ ।।
अर्थ : आसनस्थ झालेल्या विष्णूंनी नंतर श्रीकृष्णांच्या समोर थरथर कापणाऱ्या अधिकमासाला श्रीकृष्णाच्या चरणांना वंदन करायला लावले.
…………..
२ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण प्रतिपदा, शके १९४२
तदा प्रपच्छ श्रीकृष्णः कोsयं कस्मादिहागतः। कस्माद्रुदति गोलोके न कश्चिद् दुःखमश्नुते ।। १६ ।।
अर्थ : तेव्हा श्रीकृष्णांनी (विष्णूंना) विचारले, ‘हा कोण आहे? कुठून आला? आणि का रडतोय? या गोलोकामध्ये तर कोणीही दुःखी नाही!’ (गोलोक म्हणजे शिवलोक व विष्णुलोकापेक्षाही उच्च स्थानी असलेले अत्यंत ऐश्वर्यसंपन्न असे श्रीकृष्णांचे राहण्याचे ठिकाण, जेथे लेशमात्रही दुःख नाही.)
…………..
३ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण द्वितीया, शके १९४२
गोलोकवासिनः सर्वे सदाssनन्दपरिप्लुताः। स्वप्नेsपि नैव श्रुण्वन्ति दुर्वार्ता च दुरन्वयाम् ।। १७ ।।
अर्थ : गोलोकामध्ये राहणारे सर्वजण नेहमीच आनंदात डुंबत असतात. स्वप्नातसुद्धा वाईट बातमी किंवा वाईट गोष्ट दुरूनही त्यांच्या कानावर पडत नाही.
…………..
४ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण द्वितीया शके १९४२
तस्मादयं कथं विष्णो मदग्रेदुःखित स्थितः। मुञ्चन्नश्रूणि नेत्राभ्यां वेपते च मुहुर्मुहुः ।। १८ ।।
अर्थ : म्हणून हे विष्णो, थरथर कापणारा, सतत अश्रुपात करणारा, अतिशय दुःखी असा हा कोण बरे माझ्यासमोर उभा आहे?
…….
५ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण तृतीया/चतुर्थी शके १९४२
नवाम्बुदानीकमनोहरस्य गोलोकनाथस्य वचो नशम्य । उवाच विष्णुर्मलमासदुःखं प्रोत्थाय सिंहासनतः समग्रम् ।। १९ ।।
अर्थ : मेघश्याम अशा त्या गोलोकस्वामीचे (श्रीकृष्णाचे) बोलणे ऐकून सिंहासनावरून उठून विष्णूंनी मलमासाचे संपूर्ण दुःख सांगितले.
…..
६ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन चतुर्थी शके १९४२
श्रीविष्णुरुवाच वृन्दावनकलानाथ श्रीकृष्ण मुरलीधर। श्रूयतामधिमासीयं दुःखं वच्मि तवाग्रतः ।।२०।।
अर्थ : श्री विष्णू म्हणाले, ‘वृन्दावनाची शोभा असलेल्या हे मुरलीधारी श्रीकृष्णा, मी अधिक मासाचे दुःख आपल्याला सांगतो ते आपण ऐकावे.’
…………..
७ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण पंचमी शके १९४२
तस्मादिहायातो गृहीत्वामुं निरीश्वरम् । दुःखदावानलं तीव्रमेतदीयं निराकुरु।।२१।।
अर्थ : स्वामीरहित (अनाथ) अशा अधिकमासाला मी घेऊन आलो आहे. त्याचे दावानलासारखे भयंकर असे दुःख आपण दूर करावे.
………….
८ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण षष्ठी शके १९४२
अयं तु अधिकमासोsस्ति व्यपेतरविसंक्रमः । मलिनोsयमनर्होsस्ति शुभकर्मणि सर्वदा ।। २२ ।।
अर्थ : हा अधिक महिना आहे. यामध्ये सूर्यसंक्रमण नसते. (या महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जात नाही.) शुभ कार्यामध्ये याला नेहमीच अपवित्र व अयोग्य मानतात.
……
९ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण सप्तमी शके १९४२
न स्नानं न दानं च कर्तव्यं प्रभुवर्जिते । एवं तिरस्कृतः सर्वैर्वनस्पतिर्लतादिभिः।। २३ ।।
अर्थ : अनाथ अशा या महिन्यात स्नान करू नये, दान करू नये (असे म्हणतात.) त्यामुळे अगदी झाडे, वेलीसुद्धा याचा तिरस्कार करतात.
…………..
१० ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण अष्टमी शके १९४२
मासैर् द्वादशभिश्चैव कलाकाष्ठांलवादिभिः। अयनैर्हायनैश्चैव स्वामिगर्वरामन्वितैः ।। २४ ।।
अर्थ : बारा महिने, कला, काष्ठ, लव, अयन (दक्षिणायन, उत्तरायण), संवत्सर (ही सर्व काल मोजण्याची परिमाणे आहेत) या सर्वांना आपापला आधार (स्वामी) असल्याचा गर्व आहे. त्यामुळे ते सगळे याचा (अधिक मासाचा) अनादर करतात.
…..
११ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण नवमी शके १९४२
इति दुःखानलेनैव दग्धोऽयं मर्तुमुन्मुखः। अन्यैर्दयालुभिःपश्चात्प्रेरितो मामुपागतः।।२५।।
अर्थ : दयाळू लोकांनी पाठवल्यामुळे, दुःखाने पोळलेला, मरणासाठी अधीर झालेला अधिक मास माझ्याकडे आला.
….
१२ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण दशमी शके १९४२
शरणार्था ह्रषीकेश वेपमानो रुदन्मुहुः । सर्वनिवेदयामास दुःखजालमसंवृतम् ।। २६ ।।
अर्थ : हे हृषीकेशा, शरण आलेल्या याने (अधिक मासाने) थरथर कापत आणि रडत रडत आपले सर्व दुःख मला सांगितले.
………..
१३ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण एकादशी शके १९४२
एतदीयं महद् दुःखमनिवार्यं भवद्रुते। अतस्त्वामाश्रितो नूनं करे कृत्वा निराश्रयम् ।। २७ ।।
अर्थ : याचे दारुण असे हे दुःख आपल्याशिवाय कोण दूर करू शकणार? म्हणून निराधार अशा याला (अधिक मासाला) हात धरून आपल्या आश्रयाला आणले आहे.
…..
१४ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण द्वादशी शके १९४२
त्वदीयचरणाम्भोजं गतो नैवावशोचते। इति वेदविदो वाक्यं भावि मिथ्या कथं प्रभो।। २८ ।।
अर्थ : हे प्रभो, आपल्याला शरण आलेल्याचे दुःख नाहीसे होते, असे वेदांच्या जाणकारांचे म्हणणे आहे. ते खोटे कसे असेल?
…..
१५ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी शके १९४२
मदर्थमपि कर्तव्यमेतद् दुःख निवारणम् । सर्वं त्यक्त्वाहमायातो यातं मे सफलं कुरु।। २९ ।।
अर्थ : याचे (अधिक मासाचे) दुःख दूर करणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून मी माझी सर्व कामे सोडून आलो आहे. त्यामध्ये मला यश मिळू दे.
……
१६ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन अमावास्या शके १९४२
इति विज्ञाप्य भूमानं बद्धाञ्जलिपुटो हरिः। पुरस्तस्थौ भगवान निरीक्षंस्तन्मुखाम्बुजम् ।।३०।।
अर्थ : परमात्मा श्रीकृष्णाच्या समोर हात जोडून उभे राहून अधिक मासाचे सर्व दुःख त्यांना सांगून श्री विष्णू त्यांच्या मुखकमलाकडे पाहू लागले.
…………
श्री पुरुषोत्तम उवाच समीचीनं कृतं विष्णो यदत्रागतवान् भवान् । मलमासं करे कृत्वा लोके कीर्तिमवाप्स्यसि।।३१।।
अर्थ : श्री पुरुषोत्तम (श्रीकृष्ण) म्हणाले, हे विष्णो, आपण या मलमासाला घेऊन माझ्याकडे आलात हे योग्यच केलेत, या कामामुळे जगात आपल्याला कीर्ती लाभेल.
…………
अहमेतैर्यथालोके प्रथितः पुरुषोत्तमः। तथाऽयमपि लोकेषु प्रथितः पुरुषोत्तमः।।३२।।
अर्थ : मी जसा या जगामध्ये ‘पुरुषोत्तम’ म्हणून प्रसिद्ध आहे, तसाच हासुद्धा ‘पुरुषोत्तम’ म्हणूनच प्रसिद्ध होईल.
…………
अस्मै समर्पिताः सर्वै ये गुणा मयि संस्थिताः। पुरुषोत्तमेति यन्नाम प्रथितं लोकवेदयोः ।।३३।।
अर्थ : माझ्यामध्ये जे जे गुण आहेत, ते ते सर्व मी याला अर्पण केले आहेत. आता जग याला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखेल.
इति श्रीबृहन्नारदीयपुराणे पुरुषोत्तममासमहात्म्ये श्रीनारायणनारदसंवादे पुरुषोत्तमविज्ञप्तिर्नाम षष्ठोऽध्यायः।।
…………
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. ते आणि त्याचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
उत्तम उपक्रम !
अभिनंदन !!!