भूकंप झाल्यावर पाहू काय ते!

पालघर जिल्ह्यात डहाणू आणि तलासरी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आतापर्यंत शेकडो धक्के बसले असून काही धक्के त्या भागातील घरे पचवू शकली नाहीत. त्यामुळे त्यांची पडझड झाली. राज्य शासनाचा पुनर्वसन विभाग पाहणी आणि भरपाईचे काम करत आहे. भूगर्भतज्ज्ञ या भूकंपाची कारणे शोधत आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरातही हे धरण १९६७ साली बांधले गेल्यानंतर भूकंपाचे लक्षावधी धक्के बसले आहेत. साताऱ्यालगतच रत्नागिरी जिल्हा असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यालाही हे धक्के जाणवले. १९६७ मध्ये झालेला भूकंप विनाशकारी होता. तेवढा विनाश नंतरच्या काळातील भूकंपाच्या धक्क्यांनी झाला नसला, तरी भूकंपाचे धक्के मात्र सातत्याने जाणवत आहेत. कारण कोकणाचा हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचे अनुमान आधीच काढणे शक्य झाले होते. तसे भूकंपाच्या बाबतीत अजून तरी शक्य झालेले नाही. भूकंप नक्की केव्हा होणार, झाला तर तो किती तीव्रतेचा होणार, याचे अनुमान अजून तरी लावता येत नाही. त्यामुळे भूकंप झाला तर कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे, याचे नियोजन करणे शक्य होत नाही. अशी नैसर्गिक आपत्ती आली तर त्याचे पुनर्वसन करणारे खाते आपल्याकडे आहे. मात्र भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीबाबत जनजागृती, आवश्यक तेथे मदत आणि मार्गदर्शन करणारे कोणतेही खाते अस्तित्वात नाही.

या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते करत असलेल्या विरोधाकडे आणि त्यासाठी पुढे केल्या जाणाऱ्या कारणाकडे पाहिले पाहिजे. कोकण हा भूकंपप्रवण भाग असल्यामुळे तेथे रिफायनरी होऊ नये, असे श्री. राऊत यांचे म्हणणे आहे. ते त्यांनी अनेक वेळा मांडले आहे. नाणारजवळच होऊ घातलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्यातही हेच कारण सांगितले जात होते. तरीही प्रकल्पाचे काम पुढे सुरू आहे. भूकंपप्रवण असलेल्या जगभरातील वेगवेगळ्या भागातही अणुऊर्जा प्रकल्प असल्याचे दाखले प्रकल्पातर्फे आणि हे प्रकल्प उभारणाऱ्या शासनातर्फे दिले जात आहेत. त्या प्रकल्पातील बांधकामे भूकंपरोधक असतील, अशी खात्री दिली जात आहे. ते प्रकल्पांच्या बाबतीत ठीक आहे. पण जे कारण पुढे करून प्रकल्पाला विरोध केला जात आहे, त्या भूकंपाकडे हीच नेतेमंडळी कशा दृष्टीने पाहतात, हेही पाहायला हवे.

महाड येथील इमारत दुर्घटनेनंतर सर्व प्रमुख शहरांमधल्या मोठ्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे फतवे निघाले. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतरही मुंबई-गोवा महामार्गासह प्रमुख रस्त्यांवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे फतवेही निघाले होते. भूकंपाच्या बाबतीतही तसेच होऊ शकते. भूकंप घडावा, त्यापासून विध्वंस घडावा, असे नाही. पण जर कोकण म्हणजे भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात असेल, तर संभाव्य संकट आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी कोणती सावधगिरी बाळगायला हवी, प्रत्येक घराचे, इमारतीचे ऑडिट कसे करावे, ते का करणे आवश्यक आहे, या ऑडिटमध्ये बांधकामे सदोष आढळली असतील आणि ती संभाव्य भूकंपाला तोंड देण्याएवढी सक्षम नसतील, तर काय करायला हवे, याचा आराखडा वास्तविक लोकांच्या या प्रतिनिधींनी करायला हवा. खरोखरीच भूकंपांची संख्या वाढली, त्यांची तीव्रता वाढली, नुकसान झाले, तर पुनर्वसनमंत्री आणि पुनर्वसनाचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांच्या आढावा बैठका नंतर होतीलच. पण त्यापूर्वीची सावधगिरी बाळगण्यासाठी शासन म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून एखादा आराखडा तयार करावा, त्यावर काम करावे, असे या भूकंपप्रवण भागातील राजकीय नेत्यांना कधीही सुचत नाही. राजकीय भूकंप करण्यात, ते होणार असल्याचे संकेत देण्यात आणि त्याबाबतचे शाब्दिक बुडबुडे उडविण्यात या मंडळींना धन्यता वाटते.अर्थातच हे बुडबुडे उडाल्यानंतर त्यावर टाळ्या पिटायला जोपर्यंत खुशमस्करे कार्यकर्ते आहेत, तोपर्यंत त्यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. भूकंप झाल्यावरच पाहू काय ते!

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १८ सप्टेंबर २०२०)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १८ सप्टेंबरचा अंक मोफत डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply