
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा तिसरा लेख… कवयित्री प्रतिभा आचरेकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे शीतल पोकळे यांनी…
………
‘ही मातृभूमी आज पोरकी झाली
भारतभू अश्रू ढाळी ।
ती मावळली तव शौर्य दीप्तीची गाली
जी विलसत होती लाली ।
तू जवाहराच्या पदावरी पद टाकुनी
आजवरी
विजयश्री आणिली माघारी ।
हे बहाद्दूरा, तू अवचित निघून जाशी
सुमनांच्या सुकल्या राशी ।।’
भारताचे लाडके पंतप्रधान पं. लालबहादूर शास्त्री यांच्या ११ जानेवारी १९६६ रोजी झालेल्या आकस्मिक गूढ मृत्यूने व्यथित होऊन लालबहादुर शास्त्रींची निस्सीम चाहती असलेल्या छोट्या प्रतिभाने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी लिहिलेल्या या काव्यपंक्ती! या प्रतिभावान मुलीचे नाव आहे प्रतिभा सारंग-आचरेकर… आचऱ्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री ‘स्पंदन’कार सौ. प्रतिभा आचरेकर!
सावंतवाडीसारख्या निसर्ग व संस्कृतीने संपन्न असलेल्या संस्थानात जन्मलेल्या! आई-वडील संस्कारी शिक्षक! वडील व्यासंगी, हिंदी पंडित, कविमनाचे! कविवर्य बा. भ. बोरकरांच्या कवितांवर मनस्वी प्रेम करणारे! त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या ‘प्रतिभा’ या नावावरून त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचे नाव प्रतिभा ठेवले व भविष्यात तिने ते नाव सार्थ केले. वयाच्या तेराव्या वर्षापासूनच तिने दैनिक लोकसत्तामध्ये ‘प्रतिभेची पाखरे’ या सदरातून कविता लेखनाला सुरुवात केली. त्यांची काव्यवेल खऱ्या अर्थाने बहरली ती ‘पंचम खेमराज’ कॉलेजमध्ये. कविवर्य डॉ. वसंत सावंत यांच्या सान्निध्यात! त्यांच्या त्या आवडत्या शिष्या!
कॉलेजमध्ये असताना गोव्याच्या पार्वतीबाई चौगुले कॉलेजचे रसिक प्राचार्य द. भ. वाघ यांनी एक काव्यस्पर्धा आयोजित केली होती. कारवार, गोवा, रत्नागिरी येथील महाविद्यालयांना खुली होती. या स्पर्धेत भाग घेऊन त्यांच्या कॉलेजने सर्व बक्षिसे जिंकली होती व प्रतिभा सारंग या स्पर्धेतील विजेत्या कवयित्री होत्या. बा. भ. बोरकर या त्यांच्या अत्यंत आवडत्या कविवर्यांच्या हस्ते आणि प्राचार्य द. भ. वाघ, कविवर्य शंकर रामाणी, मधू मंगेश कर्णिक, डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत पारितोषिक मिळाले. त्यांच्या आयुष्यातील हा अत्यंत आनंदाचा, प्रोत्साहित करणारा क्षण!
महाविद्यालयीन जीवनात व त्यानंतरही त्यांचे कथा, लेख, कविता इत्यादी प्रकारचे दर्जेदार लेखन चालूच होते. ‘महाविद्यालयीन जीवनात स्वतंत्र लेखन निर्मिती करून नाव काढणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी प्रतिभा एक!’ असे गुरुवर्य वसंत सावंत यांनी नमूद केले आहे, तर ‘कॉलेज जीवनात माझ्या कवितेला जो बहर आला, पाऊलवाटेवरून ती राजरस्त्यावर आली त्याचे जास्तीत जास्त श्रेय गुरुवर्य वसंत सावंत यांचे!’ असे त्या कृतज्ञतेने नमूद करतात.
लग्नानंतरही आचरा हायस्कूलमध्ये समर्थ शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांचे साहित्य व काव्यलेखन अखंड चालू होते. एक समर्थ लेखिका, सक्षम कवयित्री, व्यासंगी वृत्तपत्रलेखिका, कसबी व्यक्तिचित्रणकार आणि निर्भीड समीक्षक असे विविध पैलू असलेले त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
लेखनविषय उत्स्फूर्त होते, पण निवडक! वाचकाला काही देऊन जाणारे! त्यामुळे त्यांच्या अक्षर सामर्थ्याला मराठी सारस्वतांच्या दरबारात मानाचे स्थान होते! १९६५ ते २००८ अशी त्यांची चार दशकांची समृद्ध लेखन कारकीर्द होती. प्रथितयश विद्वान व्यक्तिमत्त्व! बाईंबरोबरच्या गप्पा म्हणजे सुरेख जमून आलेल्या अविस्मरणीय मैफली होत्या. त्यांची आवडती विद्यार्थिनी व शेजारी होण्याचे भाग्य मला लाभले, तरीही त्यांच्याविषयी लिहिणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.
आचरेकर बाई मुख्यत्वे खुलल्या त्या आपल्या कविता प्रांतात! कविता हा त्यांचा प्राणच होता जणू! लग्नानंतर त्या आचरेवासी झाल्यावर आचऱ्याच्या निसर्गरम्य व सुसंस्कृत वातावरणात त्या रमल्या. आचऱ्याचा निसर्ग त्यांना भावला.
सरस्वतीच्या निजवासाने
धन्य धन्य ही पुण्यधरा
हे त्यांचेच शब्द आचरा गावाबद्दलचे! श्री रामेश्वराच्या अस्तित्वाने पावन झालेले, ज्ञानाची श्रीमंती मिरवणारे संस्थान! १०० वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेले घराजवळील वाचनालय! साहित्य, संगीत, कलाक्षेत्रात आभाळाएवढी कामगिरी केलेले नटश्रेष्ठ भार्गवराम आचरेकर, दिग्दर्शक कमलाकर सारंग, कथाकार अच्युत तारी, चित्रकार एम. आर. आचरेकर, डॉ. बाळ फोंडके इत्यादी दिग्गज मंडळी आचऱ्यातीलच! पु. ल. देशपांडे, पंडित कुमार गंधर्व यांसारखी महान व्यक्तिमत्त्वे आचऱ्याला कार्यक्रमाला येऊन मुक्काम करून राहिलेली! बाईंचे मन हरखून गेले. त्यांच्या काव्यप्रतिभेला नवा आयाम मिळाला.
काव्यप्रवास
कवयित्री प्रतिभा आचरेकर यांच्या कवितांचे रसग्रहण करणे हा एक आनंददायी अनुभव आहे. त्यांची कविता ही स्वयंपूर्ण व स्वयंस्फूर्त आहे. बा. भ. बोरकरांप्रमाणे त्यांना निसर्ग अत्यंत प्रिय आहे. कधी खट्याळ, कधी गंभीर, कधी भावुक, कधी आनंदी त्यांच्या स्वभावछटांशी मिळतीजुळती! नवीन पिढीला मार्गदर्शक, तर समीक्षकांना आपलीशी वाटणारी अशी त्यांची कविता! भाषा संस्कृतप्रचुर, मराठीची उत्तम जाण आणि शब्दांवर निर्विवाद प्रभुत्व! त्यांची कविता मुक्तछंदातील नव्हती, तर गण, मात्रा, वृत्त यात चपखल बसणारी होती. कविता त्यांच्या अंतर्मनात सतत निनादत असायची आणि कोणत्याही क्षणी ती उत्स्फूर्तपणे बाहेर यायची. बरेचदा त्यांच्या कवितांची पहिली वाचक होण्याचे भाग्य मला लाभायचे.
त्यांच्या कवितास्फुरणाचा एक प्रसंग फारच उद्बोधक आहे. आदरणीय ज्येष्ठ लेखक हरिहर आठलेकर यांनी त्यांच्या श्रद्धांजलीपर लेखात हा प्रसंग उद्धृत केला आहे.
आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरात गणपती उत्सवात चलत् चित्र देखावे उभे केले जातात. एका कलावंताने श्रीकृष्णाच्या सुवर्णतुलेचा सेट जिवंत उभा केला होता; पण सेटपुढे लावण्यासाठी समर्पक काव्यपंक्ती त्यांना सुचत नव्हत्या. कोणी तरी त्यांना मंदिराशेजारी राहणाऱ्या आचरेकर बाईंचे नाव सांगितले. बाई त्यांच्या दुकानात गडबडीत होत्या. तेवढ्यात त्या देवळात येऊन सेट बघून गेल्या आणि झर्रकन कागदावर चार ओळी लिहून त्या मूर्तिकाराला दिल्या.
भामा हृदयी गर्व उपजला
मी तर भार्या श्रेष्ठांची।
अहंपणाने तिने घडवली
सुवर्णतुला कृष्णाची।
भगवंताच्या हृदयी जागा
खऱ्या भक्तीची प्रीतीची।
चतुर रुक्मिणी म्हणून दावते
किमया तुलसीपत्राची।।
आणि इथे त्यांच्या सुवर्णतुला कवितेचा जन्म झाला. कृष्णाची सुवर्णतुला याच विषयावर अगम्य तुलाभार ही वेगळी कविताही त्यांनी लिहिली. या दोन्ही कविता वेगवेगळ्या वृत्तात मांडल्या आहेत. समग्र विषयाची एवढी समज त्यांना कशी काय होती याचे आश्चर्य वाटते.
‘स्पंदन’ ही त्यांची मला आवडलेली अजून एक उत्कट कविता.
धुवांधार पावसाच्या
बेबंद कोसळणाऱ्या सरी
त्यातून आरपार दृष्टी
लावून मी इथे
उन्मुक्त अधीर अशी अशांत ।
कवयित्री आपणाशी बोलत असताना स्वतःबद्दल, प्रियकराबद्दल, जीवनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करते. त्यांच्या संवेदनशील मनाचा उन्मुक्त आविष्कार त्यात पाहायला मिळतो.
त्यांना भावलेल्या ‘स्त्री’ची अनंत रूपे त्यानी त्यांच्या स्त्री याच नावाच्या कवितेत चितारली आहेत.
कुणी म्हटलंय कुणास ठाऊक
‘जेलसी दाय नेम इज वुमन’
खरंच, त्याला ठाऊक नसेल?
अथांगते, तुझं नाव स्त्री
उन्मुक्तते, तुझं नाव स्त्री ।
असं वर्णिताना स्त्रीची अथांगता, समर्पित वृत्ती या स्त्री विशेषणासोबतच
स्वतःच्या वाट्याला येणाऱ्या
जीवघेण्या वेदनांचे दुःख
निमूटपणे सोशीत
दुसऱ्यांचं अभिष्ट चिंतणाऱ्या
ममते तुझंही नाव स्त्रीच!
खरं तर तुझंच नाव स्त्री!
हा शेवट आपणास विषण्ण करून जातो.
‘अनामिका’ या कवितेत
दवबिंदूच्या आरशात मज
कुणी अनामिक दिसला गं!
असे दृष्टांताचे वर्णन करून ईश्वराच्या अस्तित्वाची साक्ष पटवत
कसला विभ्रम, कसला संभ्रम
चराचरी तो भरला गं।
वेड लावुनी कितीकांना अन्
त्रिखंड व्यापून उरला गं।
असं म्हणत परमेश्वराच्या साक्षात्काराचा दिव्यानुभव व्यक्त करीत काव्यरसिकांना स्तिमित करून टाकतात.
‘कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांना’ या कवितेत त्या
कवितेच्या सतारिया,
शब्दांचा तू शिल्पकार।
तुझ्या काव्याच्या आकाशी
येतो चांदण्याला पूर।।
अशी त्यांना मानवंदना देतात.
मुंबई शहरातल्या कुणातरी निर्वासित मुलाच्या भावविभोर डोळ्यांची कथा व व्यथा त्यांनी ‘डोळे’ या कवितेत मांडली आहे.
अजून पुसले गेले नाहीत
मनातून
निरुत्तर करणारे
गहन प्रश्न विचारणारे
ते दोन भावविभोर
निष्पाप डोळे।।
कविता वाचता वाचता तो मुलगा, त्याचे निष्पाप डोळे आपल्या मनाचा ठाव घेतात.
अशा भावोत्कट आणि मनोवेधक ४८ कवितांचा समावेश त्यांच्या ‘स्पंदन’ या काव्यसंग्रहात केला गेला आहे. या काव्यसंग्रहाला कविवर्य डॉ. वसंत सावंत यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे. ‘स्पंदन हा कवितासंग्रह मराठी काव्यात लक्षणीय ठरावा असा वेगळा सूर व लय या संग्रहाला आहे. आजच्या लयहीन कवितेच्या काळात मला तो मोलाचा वाटतो,’ असे गौरवोद्गार त्यांनी प्रस्तावनेत काढले आहेत.

‘स्पंदन’चा प्रकाशन सोहळा एक मे १९९३ रोजी अक्षय्यतृतीयेला आचरे येथील श्री रामेश्वर मंदिराच्या भव्य सभामंडपात ज्येष्ठ साहित्यिक, ‘कोमसाप’चे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाला. या समारंभाचे यजमानपण अत्यंत जबाबदारीने पार पाडले ते बाईंचे विद्यार्थी व ‘कोमसाप’चे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांनी! या प्रसंगी नामवंत कवी सर्वश्री अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, निरंजन उजगरे, अशोक बागवे, किशोर कदम आदी असामी उपस्थित होते. त्यांनी ‘कवितांच्या गावा जावे’ हा सदाबहार कार्यक्रम सादर केला. संपूर्ण आचरे गाव, बाईंचे सुहृद, नातेवाईक यांनी या अविस्मरणीय कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
कवितेप्रमाणेच कथाकथनाच्या प्रांतात ज्येष्ठ लेखक व. पु. काळे हे त्यांचे गुरू! ‘वपुं’नी त्यांना अनेक वेळा मार्गदर्शन केले. ‘वपुं’ची उत्साहवर्धक पत्रे त्या नेहमी जपून ठेवत. मी त्या पत्रांची हमखास वाचक असे. सावंतवाडीला कथाकथनाला आल्यावर वपु बाईंची आवर्जून भेट घेत व आत्मीयतेने त्यांच्या लिखाणाचे, वक्तृत्वाचे कौतुक करीत. ‘प्रतिभा, तुझ्यातल्या कवितेएवढेच कथाकारालाही जप. त्यातल्या कुणा एकावर अन्याय होऊ देऊ नकोस,’ असे आवर्जून सांगत.
सामाजिक समस्यांचे भान, स्त्री विषयक समस्यांच्या जाणिवा असलेले, विशेषतः मध्यमवर्गीय समाजात होणारी स्त्रीची घुसमट हे कथाविषय व काव्यविषय त्यांनी प्राधान्याने हाताळले. कथाकथनाप्रमाणेच त्यांचे व्यक्तिचित्रणही मनभावन होते. बॅ. नाथ पै, कवी बा. भ. बोरकर ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे, खासदार मधू दंडवते, ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे, क्रिस्टल पै इत्यादी व्यक्तिमत्त्वांना त्यांनी शब्दबद्ध केले. तरुण भारत, गोमंतक, सकाळ, पुढारी, स्थानिक वृत्तपत्रे यांमध्ये त्यांनी स्फुट लेख व दीर्घ लेख लिहिले. ज्ञानेश्वरीचा त्यांचा अभ्यास थक्क करणारा होता. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे सार्थ निरूपण करतानाच त्या तुकारामांचे अभंगही समजवायच्या.
कोमसाप, साने गुरुजी कथामाला, सेवांगण यांच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्यांचे कुठलेही साहित्य अप्रकाशित राहू नये, अशी बॅ. नाथ पै सेवांगणचे आधारस्तंभ पितृतुल्य ज्ञानेश देऊलकर यांची इच्छा होती.

‘स्पंदन’नंतरही त्यांचे कविता व अन्य लेखन चालू होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे, ‘युगंधरा’चे काम त्यांनी व त्यांची सुविद्य मुले प्रिया, मिलिंद व पती निवृत्ती आचरेकर यांनी हाती घेतले. अर्पणपत्रिकाही बाबांच्या नावे, ‘बाबा तुमच्या बरोबरच्या सोनेरी क्षणांना… ’ तयार झाली; पण त्याचे प्रकाशन होण्याआधीच २२ सप्टेंबर २००८ रोजी सर्वांना दुःखसागरात लोटून त्या देवाघरी गेल्या. अवघ्या साहित्यविश्वाला आणि आमच्यासारखे त्यांचे विद्यार्थी व चाहत्यांना हा अनपेक्षित धक्का होता. त्यांच्या अकाली जाण्याने काव्यविश्व व साहित्यविश्वाचे अपरिमित नुकसान झाले.
पुनर्जन्म आहे की नाही मला माहीत नाही; पण असलाच तर बाईंसह आचऱ्याच्या कुशीत मिळावा आणि बाईंबरोबर जगायचे राहून गेलेले क्षण पुन्हा जगायला मिळावेत, हीच त्या जगन्नियंत्याकडे हृदयस्थ प्रार्थना!
– सौ. शीतल नंदकुमार पोकळे (सुवर्णलता वि. बिडये)
(रिटायर्ड डेप्युटी पोस्टमास्तर, दादर हेड पोस्ट ऑफिस, मुंबई – ४०००१४)
पत्ता : १/डी ९०२ ड्रीम्स कॉम्प्लेक्स, मुंबई – ४०००७८
मोबाइल : ९८६९५ ४४३८३
ई-मेल : sheetal.pokale1957@gmail.com
…..
सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
……
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

