माझा समाज सर्वांची जबाबदारी

राजापूर तालुक्यातील गेल्या महिन्यातील एक विदारक प्रसंग. एका माजी शासकीय कर्मचाऱ्याचे ग्रामीण भागात निधन झाले. सायंकाळी निधन झालेल्या या व्यक्तीच्या घराकडे वाडी-वस्तीतील कोणीही फिरकले नाही. अत्यंत जवळचे एक-दोघे नातेवाईक रत्नागिरी, लांज्यातून त्या घरी मध्यरात्री पोहोचले. त्यानंतर अक्षरशः त्याच चौघांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारासाठी सोडाच पण कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठीही त्या घरापर्यंत पोहोचले नाही. त्याचे कारण एकच होते, मरण पावलेल्या व्यक्तीला करोना झालेला असेल तर?

दुसरा एक प्रसंग दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरीत घडला. खेड तालुक्यातील एका व्यक्तीचे रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात करोनामुळे निधन झाले. तेव्हा करोनाप्रतिबंधक लॉकडाउनचे नियम तसे कडक होते. त्यामुळे मुक्त संचाराला बंदी होती. परिणामी त्या व्यक्तीचे नातेवाईक खेडमधून रत्नागिरीत येऊ शकले नाहीत. मरण पावलेली व्यक्ती हिंदू होती. त्या व्यक्तीवर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. मृत व्यक्तीची पत्नी आणि अल्पवयीन मुलगा यांच्यावर मोठीच जबाबदारी पडली. ही परिस्थिती लक्षात घेऊन संकल्प युनिक फाउंडेशन या रत्नागिरीतील सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आणि त्या व्यक्तीवर हिंदू पद्धतीनुसार अंत्यसंस्कार केले. या संस्थेत प्रामुख्याने मुस्लिम व्यक्ती अधिक आहेत. त्यांनीच अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पडली.

एकीकडे करोना झाला असण्याच्या भीतीने मृत व्यक्तीच्या घराकडे कोणीही न फिरणारे शेजारीपाजारी आणि करोनामुळे निधन पावलेल्या हिंदू व्यक्तीवर कोणताच संबंध नसलेल्या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी हिंदू पद्धतीने केलेले अंत्यसंस्कार या समाजातील वेगवेगळ्या दोन घटना आहेत.

करोनामुळे जग व्यापले आहे. या आजाराने मोठी भीती समाजात निर्माण केली आहे. करोनाचे सामूहिक संक्रमण झाल्यामुळे ते कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली आहे. घरोघरी जाऊन तपासणी करून संभाव्य रुग्णांची नोंद घेण्याचे काम या मोहिमेतून केले जात आहे. हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोणतेही संरक्षण नसताना सामाजिक बांधिलकी म्हणून आपले कर्तव्य पार पाडले आहे. पण करोनामुळे निर्माण झालेली भीती या मोहिमेतून दूर होण्याची शक्यता नाही. याउलट सर्दी-पडशासारखी तुलनेने किरकोळ असलेली लक्षणेसुद्धा लपवून ठेवण्याकडेच कल अधिक असण्याची शक्यता आहे. याचे कारण करोनाचे निदान झाले तर शासकीय यंत्रणेत आपण गुरफटले जाऊ आणि त्यातून सहीसलामत सुटका झाली नाही, तर आपण स्वतःहून मरणाच्या दारी जाऊ, अशी लोकांची भावना आहे. करोनाची भीती हेच त्याचे कारण आहे या स्थितीमध्ये सामाजिक प्रबोधनाची अधिक गरज आहे. यासाठी सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांचे नेते- कार्यकर्त्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.

रत्नागिरीतील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवापूर्वी प्लाझ्मादानाविषयी प्रबोधनपर कार्यक्रम घेणार असल्याचे जाहीर केले होते. पण तो प्रत्यक्षात आलाच नाही. वास्तविक तो उपक्रम कोणत्याही परिस्थितीत पार पाडायला हवा होता. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी घराघरांशी संपर्क साधला असता. त्यांच्या व्यथा लक्षात आल्या असत्या. ते झाले नाही. सभा गाजवणे किंवा ढोलताशांच्या साथीने मिरवणुका काढण्याएवढे ते सोपे नाही. म्हणूनच हे काम आव्हानाचे आहे. ते सामाजिक कार्यकर्त्यांनी हिरीरीने पुढाकार घेऊन राबविले पाहिजे. वर दिलेल्या दोन उदाहरणांमुळे समाजात करोनामुळे कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याची कल्पना येईल. गावागावांमध्ये असे प्रसंग घडत असणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात आठ हजार रुग्ण निपजले आहेत. पावणेतीनशे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या सर्वांच्या कुटुंबीयांना वाळीत टाकलेय जाण्यासारख्या प्रसंगातून जावे लागत आहे. म्हणूनच या काळात प्रबोधनाची गरज आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतून शासनाने प्रत्येकाला आपली जबाबदारी आपण स्वतःच घ्यावी, असे सूचित केले आहे. पण सामाजिक जबाबदारी कोणी निभावावी, याबाबत काहीही सूचित केलेले नाही. म्हणूनच माझा समाज सर्वांची जबाबदारी अशा स्वरूपाचे प्रबोधन आता करण्याची आवश्यकता आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २ ऑक्टोबर २०२०)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २ ऑक्टोबरचा अंक मोफत डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply