पत्रकार वसंत दामले न्यासातर्फे चार ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार

रत्नागिरी : पत्रकार वसंत दामले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या न्यासातर्फे रत्नागिरीतील चार ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

दै. सकाळच्या रत्नागिरी आवृत्तीतील दिवंगत पत्रकार वसंत सदाशिव दामले व त्यांच्या मातोश्री अन्नपूर्णा दामले यांची आठवण कायमस्वरूपी समाजासमोर राहण्यासाठी एका सेवाभावी न्यासाची निर्मिती करण्यात येत आहे. नियोजित (कै.) अन्नपूर्णा सदाशिव दामले आणि श्रीमती वर्षा वसंत दामले न्यास असे त्याचे नाव आहे. न्यासाने आपल्या उद्दिष्टांप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरीतील वृत्तपत्र जगतामधील लक्षणीय कारकीर्द असलेल्या पत्रकारांचा शाल, पुष्प, श्रीफळ, सन्मानपत्र आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांची भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यामध्ये पत्रकार पै. रशीदभाई साखरकर यांच्या पत्नी रईसा साखरकर, आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’मध्ये उपसंपादक म्हणून पत्रकारितेत ठसा उमटविणारे आणि नंतर ‘पीटीआय’मध्ये प्रदीर्घ काळ सेवा देणारे ज्येष्ठ पत्रकार बाळ पाटणकर, अनेक वर्षे रत्नागिरीच्या वृत्तपत्र सृष्टीत कार्यरत ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे आणि आकाशवाणी आणि हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेचे जिल्हा प्रतिनिधी तसेच साप्ताहिक ‘कोकण मीडिया’चे संपादक प्रमोद कोनकर यांचा समावेश होता. असा उपक्रम दर वर्षी राबविण्याचा मानस आहे, असे श्रीमती वर्षा दामले यांनी सांगितले.

गेल्या मे महिन्यात या नियोजित न्यासाच्या कार्याचा प्रारंभ करण्यात आला. करोना महामारीविरुद्धच्या लढ्यात धाडसाने आपले कर्तव्य बजावणाऱ्या रत्नागिरी पालिकेच्या स्वच्छतादूतांना व अन्य गरजूंना भेट रक्कम देऊन न्यासाच्या कार्यक्रमांना प्रारंभ झाला, अशी माहिती न्यासाच्या विश्वस्तांतर्फे अॅड. मिलिंद पिलणकर यांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply