तेजोमयाचे तेज : विद्याधर भागवत (सिंधुसाहित्यसरिता – १०)

विद्याधर भागवत (२७ ऑगस्ट १९३२ – १३ जुलै २००३)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा दहावा लेख… विद्याधर भागवत यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे वैजयंती करंदीकर यांनी…
………
विद्याधर भागवत हे नाव मी ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ऐकून होते. डिसेंबर १९९२मध्ये, माझ्या लग्नानंतर लगेचच कणकवलीत एक साहित्यिक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला जाण्याअगोदर ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद काळे, विद्याधर भागवत आदी मान्यवर आमच्या घरी आलेले. ज्येष्ठ लेखकांचे आदरातिथ्य करण्याचा तो माझा पहिलाच अनुभव होता. त्या वेळी विद्याधर भागवत यांची पहिल्यांदा भेट झाली. साधी राहणी, उच्च विचारसरणी! प्रसन्न आणि शांत व्यक्तिमत्त्व. मोठेपणाचा कसलाच बडेजाव नाही, हसतखेळत जणू आपल्याच कुटुंबातील ते एक सदस्य आहेत, असे मला वाटले.

विद्याधर भागवत यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडताना त्यांचे बालपण जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. कारण, बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात. विद्याधर भागवत यांच्याकरितादेखील ही उक्ती सार्थ ठरते. त्यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. ते वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) गावचे सुपुत्र. त्यांचे प्राथमिक शिक्षण वालावल इथे, तर माध्यमिक शिक्षण मालवणला झाले. मराठी व संस्कृत विषयांमध्ये एमए करून बीएड-साहित्य विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केली; पण मला वाटतं, पदवी ही त्यांच्याकरिता केवळ कागदच असू शकते. कारण, ते तर साक्षात ‘विद्यां धारयति इति विद्याधर:। ‘ असे नाव सार्थ करणारे होते.

विद्याधर भागवत यांना वाचनाची आवड अगदी बालवयापासून! वाचनालयात जाऊन पुस्तके वाचायची, अधिकची पुस्तके विकत आणायची… या वाचनाच्या आवडीतून निर्माण झाली भावपूर्ण कविता. त्यांच्या कविता ‘सत्यकथे’तून प्रसिद्ध होत. या कवितांचा संग्रह १९६० साली प्रकाशित झाला. ‘सागरवेला’ हा विद्याधर भागवत यांचा प्रथम आणि ‘कवितेच्या कविता’ हा अंतिम काव्यसंग्रह म्हणता येईल. कारण, त्यांची लेखणी अन्य साहित्यप्रकारांकडे वळल्यावर कवितालेखन मागे पडले. त्यांच्या कवितांना साक्षात दाद दिली होती ती ग. प्र. प्रधान यांनी. ते सावंतवाडी येथे साहित्यिक कार्यक्रमाला आलेले असता त्यांनी विद्याधर भागवत यांच्या कविता ऐकल्या आणि त्यांना दिलेली उत्स्फूर्त दाद म्हणजे ‘साहित्य सहवास’मध्ये कविता प्रसिद्धीकरिता पाठवाव्यात, ही व्यक्त केलेली इच्छा! परंतु, ते काव्यलेखनाकडून गद्यलेखनाकडे वळले.

विद्याधर भागवत यांची साहित्यसंपदा
‘ऐलतटावर पैलतटावर’, ‘प्रस्थान व योगी’, ‘तू अभुक्त आहेस’, ‘गौरी’, ‘वेलवाडी’, ‘ती कधी कळलीच नाही’, ‘जखमी पंख’ या कादंबऱ्या, ‘तीळफुले’ हा ललित कथासंग्रह, ‘असाच काळोख असावा’ हा कथासंग्रह, ‘बालकवी’, ‘एक होता शूरसेन’ हे त्यांचे बालवाड्मय आहे. ‘अंतरीचा दिवा’ ही त्यांनी लिहिलेली प्रसिद्ध एकांकिका आहे.

काव्य : सागरवेला, कवितेच्या कविता
ललित : तीळफुले
कथा : असाच काळोख असावा
कादंबऱ्या : प्रस्थान व योगी, गौरी, वेलवाडी, ऐलतटावर-पैलतटावर, ती कधी कळलीच नाही, कोसळलेले आभाळ, तू अभुक्त आहेस, जखमी पंख
बालवाड्मय : बालकवी, एक होता शूरसेन
एकांकिका : अंतरीचा दिवा

त्यांचे चरित्रात्मक कादंबरी लेखन विशेषत्वाने गाजले. ‘ऐलतटावर-पैलतटावर’ या बालकवींच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरीला वाचकांचा व समीक्षकांचा विशेष प्रतिसाद लाभला. माधव जूलियन यांच्यावर कादंबरी लिहिण्याचा अंकुर त्यातूनच त्यांच्या मनात रुजला. या अंकुराला जोपासण्याची प्रेरणा दिली ती कुसुमाग्रजांनी. कुसुमाग्रज यांनी या कादंबरीकरिता ‘जखमी पंख’ हे शीर्षक सुचवले. ही विविध संदर्भपूर्ण चरित्रात्मक कादंबरीदेखील विशेषत्वाने गाजली. तसेच ‘कवी शब्दांचे ईश्वर’ मालिकेचे सहदिग्दर्शन व मुलाखती, आकाशवाणीकरिता श्रुतिका, तसेच नभोनाट्य लेखनही विद्याधर भागवत यांनी केले आहे.

विद्याधर भागवत यांच्या लेखनशैलीविषी बोलणे ओघाने आलेच. त्यांची भाषा सरळ-साधी-सोपी. ना तिला अलंकारांचे लोढणे, ना बजबजपणा! आपल्या ओघवत्या भाषाशैलीत त्यांनी गद्य व पद्य साहित्य लिहिले. त्यांचे साहित्य वाचले, की प्रकर्षाने जाणवते ती त्यांची सूक्ष्म निरीक्षणक्षमता. निसर्गातील प्रत्येक घटकाचे अवलोकन सूक्ष्मपणे करून त्यांचा चपखल वापर ते आपल्या साहित्यात करतात. निसर्गासह समाजातील विविध घटकांचे. समाजवास्तवाचे भान त्यांना आहे. भावनेच्या भरात वाहवत जाणे त्यांच्या लेखनात आढळत नाही. चरित्रात्मक कादंबरीमध्येही ते बालकवी, माधव जूलियन, प. प. टेंब्येस्वामी यांचे संपूर्ण व्यक्तिचरित्र उभे करतात. अर्थात, ‘उचलली लेखणी लावली कागदाला’ असे त्यांच्या साहित्यात दृष्टीस येत नाही. प्रत्येक संदर्भाचा बारकाईने केलेला अभ्यास, सत्यासत्यतेची केलेली मांडणी हे त्यांच्या साहित्याचे प्रधान वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांच्या साहित्यामध्ये आपसूकच मालवणी भाषा मध्येच प्रवेश करते; पण ती आपले वेगळे अस्तित्व न दर्शवता मराठीमध्ये मिसळून जाते. विविधतेला एकाच धाग्यात गुंफण्याचे हे कौशल्य विद्याधर भागवत यांनी साधले आहे.

विद्याधर भागवत यांचे वाड्मयीन कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी ‘चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था’ या संस्थेची स्थापना केली. तेच त्या संस्थेचे १९८३पासून अध्यक्षदेखील होते. सलग १९ वर्षे ते ‘आरती’ या मासिकाकरिता संपादन साह्य करीत होते. नवोदित लेखकांसाठी त्यांनी मार्गदर्शनात्मक कृतिसत्रे व शिबिरे आयोजित केली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेमध्ये सहकार्य केलेच, तसेच काही वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून व तीन वर्षे संपूर्ण कोकण विभागाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्य पाहिले. सावंतवाडी एज्युकेशन सोसाटीचे ते कार्यवाह होते व सावंतवाडीच्या श्रीराम वाचन मंदिराचे उपकार्याध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी कार्य केले आहे.

विद्याधर भागवत हे केवळ साहित्यिक होते का? तर नाही! उत्तम व्यक्ती, जबाबदार नागरिक, आदर्श शिक्षक अशा विविध व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंनी ते समृद्ध होते. एक शिक्षक म्हणून विद्यार्थिकेंद्रित उपक्रम त्यांनी राबवले. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त करणे, त्यांना पुस्तके उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची कामे त्यांनी केली. विद्यार्थ्यांनी वाचन करावे, याकरिता त्यांनी वाचनालय सुरू केले. तसेच शाळेच्या विकासाच्या दृष्टीनेही त्यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली. विद्याधर भागवत यांच्या सामाजिक कारकिर्दीत खऱ्या अर्थाने कर्मभूमी कुडासे ही ठरली असे आपण म्हणू शकतो. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम कुडासे गावात राबवले. अगदी गावात वर्तमानपत्र चालू करण्यापासून ते श्रमदानातून रस्ता बांधण्यापर्यंतची सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासली. गावात इंग्रजी शाळा नाही म्हणून मुले मागे राहायला नकोत, याकरिता त्यांनी गावात इंग्रजी शाळा सुरू केली आणि शिक्षकांअभावी ते स्वत:च शिकवू लागले. हीच ती वाड्याची इंग्रजी शाळा.

विद्याधर भागवत यांचे व्यक्तिचरित्र बहुआयामी आहे. परंतु, त्याचा देखावा त्यांनी कधीच केला नाही. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग मला इथे नमूद करावासा वाटतो. ते परमहंस परिव्राजकाचार्य टेंब्येस्वामी यांच्या जीवनावर आधारित ‘योगी’ ही कादंबरी लिहीत होते; पण एका विशिष्ट टप्प्यावर त्यांना पुढे काय लिहायचे हे सुचेना! याच विचारात असताना पहाटेच्या समयी त्यांना साक्षात प. प. टेंब्येस्वामी महाराजांचा दृष्टान्त झाला. ते म्हणाले, ‘अरे थांबतोस का? ऊठ! ते बाजूचे पुस्तक काढ. त्यातील पृष्ठ क्र. ३२वरील मजकूर बघ.’ स्वामींच्या आदेशाप्रमाणे भागवत यांनी संदर्भ बघितला आणि ‘योगी’ ही कादंबरी उदयास आली.

विद्याधर भागवत यांचे शेवटचे साहित्य ठरले ते ‘जखमी पंख.’ त्यांच्या अखेरच्या साहित्यकृतीला त्यांच्या ९१ वर्षीय आईने भावार्द्र शब्दांत दाद दिली होती, याउपर भाग्य ते कोणते? त्यांना रामदासस्वामींच्या पत्नीवर साहित्य लिहिण्याची इच्छा होती. त्याचप्रमाणे बा. सी. मर्ढेकर व सावंतवाडी संस्थानचे संस्थानिक बापूसाहेब सावंत यांच्यावर साहित्यलेखनाचा संकल्प त्यांनी सोडला होता; पण नियतीपुढे तो पूर्ण होऊ शकला नाही. २७ ऑगस्ट १९३२ रोजी जन्मलेले विद्याधर भागवत केवळ तीन दिवसांच्या आजारपणात १३ जुलै २००३ रोजी अनंताच्या प्रवासाला निघून गेले.

आज विद्याधर भागवत जरी नसले, तरी त्यांच्या असंख्य आठवणी आपल्याजवळ आहेत, कोकणच्या मातीत पूर्वीएवढ्याच जिवंत आहेत… म्हणूनच म्हणावेसे वाटते
कृष्णमेघांनी जरी सूर्यास आता झाकिले
तेजोमयाचे तेज ते सारेच नाही संपले…

  • वैजयंती विद्याधर करंदीकर
    (लेखिका)
    पत्ता : चैतन्य, आचरे रस्ता, मसुरकर किनई, कणकवली, जि. सिंधुदुर्ग
    मोबाइल : ८६९८९ ८०८४६
    ………
    सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
    ……
    (‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply