निसर्गाचं वर‘दान’ सांभाळू या!

अधिक (पुरुषोत्तम) मास सुरू आहे. भारतीय जीवनपद्धतीनुसार, या महिन्यात केलेल्या सत्पात्री दानाचं फळ शतपटीने अधिक मिळण्याची मान्यता आहे. इतर दानांप्रमाणे निसर्गाचं वर‘दान’रूपी सान्निध्यही मनुष्याला समाधान प्राप्त करून देतं. म्हणूनच निसर्ग सान्निध्याचा वसा आणि वारसा संवर्धित करून पुढील पिढीकडे जसाच्या तसा सुपूर्द करण्यासाठी मनुष्याने अधिक मासानिमित्ताने पावलं उचलायला हवीत. त्या निमित्ताने धीरज वाटेकर यांनी लिहिलेला हा लेख…
…..
अधिक (पुरुषोत्तम) मास सुरू आहे. भारतीय जीवनपद्धतीनुसार, या महिन्यात केलेल्या सत्पात्री दानाचं फळ शतपटीने अधिक मिळण्याची मान्यता आहे. अर्थात हे दान म्हणजे ‘डोनेशन’ नव्हे! या संकल्पनेत कोणी दिलं? काय दिलं? कोणाला दिलं? या बाबी गुप्त राहतात. गरीब, गरजूंना मदत मिळावी हा या संस्कृतीचा उद्देश! याचा आधार घेऊन मानवाने कालौघात ग्रंथदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, विद्यादान, गोदान, कन्यादान, अर्थदान आदी संकल्पनांना महत्त्व प्राप्त करून दिलं. सध्या ‘करोना’मुक्त झालेल्यांकडून होणाऱ्या ‘प्लाझ्मा’दानालाही विशेष महत्त्व आहे. तरीही सर्वोत्तम दान म्हणून सध्या निसर्गाकडे पाहायला हवंय. निसर्गकृपेनं, निरपेक्ष भावनेनं मिळालेल्या निसर्गदानाने मनुष्यजीवन भरून पावलं आहे. निसर्ग समतोल राखणं आपली जबाबदारी होती. इतर दानांप्रमाणे निसर्गाचं वर‘दान’रूपी सान्निध्यही मनुष्याला समाधान प्राप्त करून देतं. म्हणूनच निसर्ग सान्निध्याचा वसा आणि वारसा संवर्धित करून पुढील पिढीकडे जसाच्या तसा सुपूर्द करण्यासाठी मनुष्याने अधिक मासानिमित्ताने पावलं उचलायला हवीत.

केळशी (दापोली) येथील निश्चित कालमापन असलेली जगातील पहिली त्सुनामी निर्मित वाळूची टेकडी (१५२४) (सर्वांत वरील फोटो – चिपळूण तालुक्यातील कळमुंडी देवराई)

निसर्ग म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचतत्त्वांनी बनलेली सृष्टी. निसर्गाच्या ह्याच पंचतत्त्वांतून मनुष्याला जन्म‘दान’ मिळतं. मेल्यावरही मानवी देह पंचत्वात विलीन होतो. निसर्ग एकाच वेळी आपला गुरू, मित्र आणि डॉक्टर असतो. निसर्गाशी असलेलं मानवी नातं अतूट असूनही त्याच्या जतन, पोषणासह वृद्धी करण्याचं ‘कर्तव्यदान’ मनुष्य विसरला. खोल दऱ्या, निर्मळ झरे, कमळांनी भरलेले तलाव, अथांग सरोवरं, रम्य सागरकिनारे, घनदाट जंगलं, बर्फाच्छादित शिखरं, उत्तुंग पर्वत, वाऱ्याच्या झोक्यानं डोलणारी हिरवीगार सृष्टी, नारळी-सुपारीच्या बागा, डोंगराआडून उगविणारा सूर्यदेव, निळ्याशार आकाशात सप्तरंगांची उधळण करणारी त्याची किरणं, ऋतुचक्र, फुलांचा सुगंध, पक्ष्यांची किलबिल आदी त्याच्याच दानाच्या छटा आपल्याला जगण्याची नित्य प्रेरणा देत असतात.

ह्या निसर्गरूपी कृष्णानं आपल्यासारख्यांना न मागता भरभरून दिलं. त्या बदल्यात मनुष्याने निसर्गाला काय दिलं? त्याने उपद्रवी प्रदूषण वाढवून निसर्गसौंदर्याचा ऱ्हास केला. इमारतींचे टॉवर उभारून चांदोबाला लपवलं. जंगलतोड करून पर्जन्यमान अनियमित केलं. अतिवृष्टी उशाशी आणून ठेवली. स्वार्थलोलुपतेची पट्टी डोळ्यावर बांधल्याने ‘निसर्ग जगला तर आपण जगू’ हे तत्त्व तो विसरला. जगण्यातली गंमत हरवून बसला. ‘सुखासीन जीवन’युक्त प्रगती हा त्याचा पारंपरिक स्वभाव हव्यासात बदलला; मात्र डोळ्यानेही न दिसणार्यात ‘करोना’ने त्याचा प्रगतीचा अहंकार धुळीस मिळवला. करोना वयाने वर्षभराचाही नाही. तरीही जगाकडे त्याच्याविरुद्ध लढण्याची निश्चित व्यवस्था नाही. अंदाजांच्या आधारे उपचार सुरू आहेत. ‘रोगप्रतिकारशक्ती’ शब्दाला मागणी वाढली आहे.

धामणदेवी (खेड) येथील खाडीकिनारा सूर्यास्त

निसर्गाचा ऱ्हास धोकादायक स्थितीत आलेला असला, तरी त्याची प्रतिकारशक्ती मानवापेक्षा कित्येकपट असल्याचं लॉकडाउनमध्ये दिसून आलं. मानव बंदिस्त होताच निसर्गानं वातावरणाला स्वच्छ बनविलं. भारतातल्या वातावरणाची २०१६ आणि २०२०मधली दोन छायाचित्रं ‘नासा’ने प्रसिद्ध केली. वैज्ञानिकांनी छायाचित्रांद्वारे भारतात धूळ-मातीसह इतर प्रदूषणाचा स्तर कमी झाल्याचे निदर्शनास आणलं. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातल्या एका गावातून या काळात लोकांना हिमालयाचं पूर्वी न होणारे दर्शन झालं. अधिक मासापासून अंगच्या वाईट सवयी त्यागून विशेष संकल्प सोडण्याची परंपरा असल्याने, ‘निसर्ग आहे तसाच ठेवा’ या उक्तीनुसार आपण विचार करायला हवा.

मेडिकल सायन्स प्रगत असताना करोना विषाणू झपाट्याने लोकांचा जीव घेऊन गेला. हा निसर्गाचा Balancing Act (समतोल) ठरावा. ज्या महाराष्ट्राला आपण देशातलं विकसित राज्य म्हणतो तिथं सर्वाधिक धरणं असूनही सिंचनाखालची जमीन कमी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भूजलातली घट, पाण्याच्या समस्या, वाळवंटीकरणासह करोनाचे रूग्ण आणि मृत्यूची आकडेवारीही इथेच सर्वाधिक दिसतेय. तरीही आमचा विकास सुरू आहे. घराघरातल्या मनुष्याला, आयुष्य स्वत:साठी नसून इतरांच्या सेवेसाठी असल्याचा धडा करोनाने शिकवला. मानव ‘जीवो जीवस्य जीवनम्’ म्हणत दोन वेळचं अन्न आपल्यापर्यंत कसं येईल, ह्याच्या काळजीत दिसला. निसर्ग आपल्याला जगवतो आहे हे यंत्रयुगात झाकोळलेलं सत्य ‘करोना’ने उघड केलं.
कोट्यवधी वर्षांपासून मानवी जीवनाच्या आधार असलेल्या नद्यांची जंगलं (अॅमेझॉन) आम्ही पैशांसाठी जाळली. मिठी, गंगा, यमुनांपासून सगळ्या नद्यांत रसायनं आणि घाण ओतली. आम्ही माणसं पृथ्वीवर राहायला नालायक आहोत. करोना हा आम्हां उन्मादलेल्यांना निसर्गानं दिलेला शेवटचा इशारा असेल का? शाळेत शिकत असताना दर वर्षी इंद्रधनुष्याची कमान दिसायची. नकळत ‘तानापिहिनिपाजा’ उजळणी व्हायची. आज तेही प्रमाण कमी झालं. निसर्गाने सौंदर्याचा साक्षात्कार घडवीत निर्माण केलेल्या रंगछटा पाहताना मानवी डोळे थकून जायचे; पण छटा संपायच्या नाहीत. मानवी शरीरालगत ऊर्जेचं वलय (ऑरा) असतं. प्राचीन योगशास्त्राच्या अभ्यासातून आपण याचं महत्त्व समजू शकतो. आपल्या विचारांचा वलयावर परिणाम होतो. हे वलय स्वच्छ आणि सक्षम असेल, तर त्याचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो. हे तेजोवलय आपली ‘पर्सनल सिग्नेचर’ असून, त्याच्या उन्नतीतही निसर्गाची भूमिका महत्त्वाची असते.

पालशेत (गुहागर) येथील अश्मयुगकालीन गुहा

निसर्गाने जे जे जन्माला घातलं त्या प्रत्येकाला नियम घातले. आम्ही हव्यासापोटी नियमांचं उल्लंघन केलं नि करोना भेटीला आला. कुठे तरी वाचलेलं, पूर्वी म्हणे समुद्रकिनारी वाळूऐवजी मीठ पसरलेलं होतं. समुद्राचं पाणी अमृतासारखं गोड होतं. सजीवांची तहान भागवण्यासाठी या पाण्याचा उपयोग व्हायचा. मानवी उत्कांतीत अन्नाला चव यावी म्हणून मिठाचा सुरू झालेला मोजका वापर नंतर हव्यासात बदलला. या क्रियेला निसर्गाने प्रतिक्रिया दिली. मीठ समुद्रात वाहून गेलं, फक्त वाळू उरली. समुद्राचे पाणी खारं झालं. आज खारं पाणी प्रक्रिया करून मानव पिण्यायोग्य बनवतोय. कदाचित वृक्षतोडीचंही असंच होईल म्हणून ‘निसर्गदान’ संकल्पनेचं महत्त्व समजवून सांगायला ‘करोना’ आलाय.

निसर्गाला गृहीत धरून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याची कल्पना आपण कशी करू शकतो? निसर्गाने दिलेलं दान जपत जगण्या-वागण्यातून ते संवर्धित करण्याकामी आपण स्वतःला समर्पित करायला हवंय. विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या शाखा कितीही छाटण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या नव्याने उगवतात, आपलं ‘दान’ मानवाच्या पदरात टाकतात. निसर्गाच्या सान्निध्यात मानवाला मिळणारं समाधान हेही निसर्गाच्या निर्हेतुक ओंजळीतून निसटलेलं दानच! विनोबांची ‘भूदान’ चळवळ सर्वश्रुत आहे. अधिक मासातल्या दानामागे वैज्ञानिक सूत्र, सामाजिक आशय आणि नैतिकता गुंफलेली आहे. दानामुळे संबंधित वस्तूवरील आपला हक्क समाप्त होऊन दुसऱ्याचा स्थापित होतो. घेणाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे उपकार न राहता केलेलं दान सात्त्विक समजतात. याकारणे श्रद्धा, तुष्टि, भक्ती, ज्ञान, अलोभ, क्षमा आणि सत्य या सात गुणांची रुजवात आपल्या व्यक्तिमत्त्वात होत राहाते. भारतीय जीवनपद्धतीत यांचं महत्त्व विशेष असल्याने आपण निसर्गाला आहे तसा ठेवण्याची ‘अभय’शपथ घ्यायलाच हवी!

 • धीरज वाटेकर
  (‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक; कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २० वर्षे कार्यरत पत्रकार)
  पत्ता : ‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.
  मोबाइल : ९८६०३६०९४८
  ई-मेल : dheerajwatekar@gmail.com
  ब्लॉग : dheerajwatekar.blogspot.com

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

माध्यमविषयक सेवांसह पुस्तके, इनहाउस जर्नल्स आदींसाठी संकलन, संपादन, प्रकाशन , ई-बुक निर्मिती आदी सेवा कोकण मीडियातर्फे पुरविल्या जातात. कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिकही चालवले जाते. पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकणातील विषयांना साप्ताहिकात प्रसिद्धी दिली जाते.
साप्ताहिक कोकण मीडियाकरिता लेखन पाठवण्यासाठी,

तसेच जाहिरातींसाठी संपर्क : 9422382621
ई-मेल : kokanmedia@kokanmedia.in

Leave a Reply