‘देवघरा’तील देवमाणूस – श्रीपाद काळे! (सिंधुसाहित्यसरिता – १३)

श्रीपाद रामकृष्ण काळे (८ जुलै १९२८ – १८ जून १९९९)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १३वा लेख… श्रीपाद काळे यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे मधुरा माणगावकर यांनी…
………
आमचे पूजनीय श्रीपाद काळे म्हणजे ‘देवघरा’तील देवमाणूसच जणू! आमच्या ‘देवघरा’ने म्हणजेच देवगडाने हिमालयाच्या उंचीची अनेक साहित्यिक माणसे उभ्या भारतवर्षाला दिली. यामध्ये साहित्यसम्राट न. चिं. तथा तात्यासाहेब केळकर (वानिवडे), संस्कृतिकोशाचे निर्माते पं. महादेवशास्त्री जोशी (वाडा), नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर (नारिंग्रे), ज्येष्ठ लेखक ना. ग. तथा नानासाहेब गोरे (हिंदळे), आदरणीय वि. वा. हडप (कोटकामते), जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक विष्णू वामन मिराशी (कुवळे) यांचा समावेश आहे. त्याच देवगडमधील वाडा नावाच्या गावात आयुष्यभर राहून गावाचे पौराहित्य सांभाळून साहित्यसेवा केलेले देवमाणूस म्हणजे श्रीपाद काळे!

असे घडले शब्दप्रभू….
भर पावसाळ्यात आठ जुलै १९२८ रोजी त्यांचा जन्म वाडा (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) या खेडेगावी झाला. घराणे भिक्षुकीचे. लाइट, फोन, रस्ते, दळणवळण सुविधा न बघितलेला असा हा गाव. शालेय शिक्षण न लाभलेला, शाळेची पायरी न चढलेला, पण शब्दप्रभू असा हा लेखक आणि एखाद्या उच्चशिक्षित समीक्षकापेक्षाही अधिक संवेदनशील, पण अक्षरओळख नसलेली साहित्यप्रेमी आई! अशी थक्क करणारी माय-लेकाची आगळीवेगळी गुरू-शिष्य जोडी. त्यांच्या वडिलांनी घरीच त्यांना लिहिणे, वाचणे शिकविले. भिक्षुकीचे उत्तम शिक्षण दिले. तीव्र बुद्धिमत्ता, प्रचंड निरीक्षणक्षमता व उत्तम आकलनशक्ती यामुळे हे सगळं त्यांनी लीलया पेललं.

साधारणपणे सन १९७१-७२ साली वडिलांना देवाज्ञा झाली. पाठचा भाऊ अल्पशा आजाराने स्वर्गवासी झाला. एक भाऊ घर सोडून गेला, त्याचा पत्ताच लागला नाही. हे सगळे कौटुंबिक धक्के ज्येष्ठ म्हणून त्यांनी पचवले. धीरोदात्तपणे प्रत्येक प्रसंगाला तोंड दिले. स्वतःला शिक्षण घ्यायला जमले नाही; पण धाकटे बंधू वामन काळे (सांगली आकाशवाणी केंद्रातून निवृत्त) यांच्यावर वडिलांसारखी माया केली, त्यांना शिकविले. त्यांच्या वेदपाठशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले. अनेक मुलांचे स्वतःहून पालकत्व स्वीकारले. ते स्वतः दशग्रंथी ब्राह्मण होते. उपाध्ये या नात्याने यजमानांची धार्मिक कार्यं करून देणं ही ते आपली जबाबदारी समजत.

गरिबीचाही हेवा वाटावा, श्रीमंतीचा भास व्हावा आणि श्रीमंतानेही नतमस्तक व्हावं असं संस्कारी घर. आईचं प्रेम, पत्नीची खंबीर साथ यामुळे जगणं समृद्ध झालं. यातूनच कथाबीजं अंकुरत गेली. पहाटे चार-साडेचारला त्यांचा दिवस सुरू होई. एखाद्या व्रतस्थ ज्ञानयोग्याप्रमाणे एकाग्रतेने कंदिलाच्या उजेडात किंवा कडू तेलाच्या दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात एकटाकी लेखन मोठ्या दिमाखात कागदावर अवतरे.

कथाबीजात सामावलेला सिंधुदुर्गचा समृद्ध निसर्ग
भिक्षुकीसाठी ते अनेक गावांची पायी यात्रा करत त्या वेळी त्यांची प्रतिभा निसर्गलेणे टिपत कथाबीजाला नवा आयाम देण्याचे काम करीत असे. त्यांच्या लेखनात प्रामुख्याने कोकणच्या निसर्गाची लोभस वर्णनं ठायी-ठायी दिसतात. मुसळधार पाऊस, वहाळ, पाणंद, घाटावरचं मंदिर, डोंगराला टेकलेलं क्षितिज, भिजलेली टिटवी, काळे काप, बैलरहाट, केबळाची घरं, गळणारी कौलं, गवताच्या टोपल्या, आड, माड, कलमं, साकेरा असे कितीतरी ग्रामीण बोलीतले शब्द त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत विखुरलेले दिसतात.

प्रत्येक माणूस आपला टीपकागद घेऊन जन्माला येतो, तसेच श्रीपाद काळे. सूक्ष्म निरीक्षणक्षमता, नसानसात भरलेलं कोकणचं सौंदर्य त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून अखंड खळाळताना दिसतं. त्यामुळेच कोकणच्या-सिंधुदुर्गाच्या लाल मातीत जन्मलेल्या मला माझं बालपण, माझा गाव त्यांच्या लेखनातून डोळ्यासमोर जिवंत उभा राहतो. लेखकाचं लेखन आणि कथाविश्व जवळचं होऊन जातं. त्यांच्या सर्वच कथा-कादंबऱ्यांतून सामान्य माणसं, त्यांची दुःखं डोकावतात.

संस्कृतीच्या व्यवहारात
हा एक दिलासा आहे
की सामान्य माणूस
कधीही मरत नाही
कितीही मारला तरी

ही कवी नारायण सुर्वेंची जीवननिष्ठा श्रीपाद काळे यांच्या लेखनातून ठळकपणे दिसते. भिक्षुकीच्या व्यवसायात अशा अनेक वल्ली त्यांना भेटल्या, ज्यांनी त्यांची कथा समृद्ध केली.

‘दवबिंदू’मधील स्वातीचं प्रेम मिळालं नाही, बायको शालिनीने रिंगमास्टरसारखं नानूकाकांचं आयुष्य व्यापलं. स्वत्वच हरवून बसलेले नानूकाका उतारवयात पहिल्यांदाच पहाटे फिरायला जातात आणि कवितेच्या संगतीची सचैल सकाळ, चक्क बोरकरांची कविता ‘सचैल गोपी न्हाल्या गं…’ आठवतात. यात मनाला पडलेली प्रेमभूल आणि रम्य पहाट लेखकाने सुंदर रंगवली आहे.

‘कृष्णाकाठी’ कथेतील विद्वान ब्राह्मण, देह कुरूप पण मन पवित्र अशा असामान्य बुद्धिमत्तेच्या तरुणावर सगळं माहीत असूनही जिवापाड प्रेम करणाऱ्या मुलीला तो प्रेमाचीच शपथ घालतो. ‘पुन्हा भेटू नकोस’ सांगतो. दोघे दोन दिशांना जातात. ही प्रेमाची वेगळी परिभाषा काळजाचा ठाव घेते.

मितभाषी ‘अणू’ मोकळ्या वातावरणात लहान मुक्या मुलाच्या सान्निध्यात येते. दुःख सारखंच, नातं जुळतं. पहाटवारा झेलते, सकाळचं धुकं अनुभवते. चेहऱ्यावर हास्य फुलतं. यात लेखकाने मानवी मन आणि निसर्ग यांची सुरेख मैफल रंगवली आहे. अशा लेखणीपुढे नकळतपणे हात जोडले जातात.

‘नजर’ या कथेच्या शीर्षकातच लेखकाने शांताक्काचं कटू सत्य, सत्याला वाचा फोडणारी नजर खूपच वास्तववादी केली आहे. ‘काळ्या कापाखालचं पाणी’ यात तर उच्च पदावरच्या शिस्तप्रिय, बुद्धिमान, व्यग्र दिनचर्या, रागीट स्वभाव असलेल्या अधिकाऱ्याच्या मनाचा तळ दुःखाने किती भरला आहे, हे मार्मिकपणे टिपलेलं आहे.

‘जीवनाची वस्त्रे’मध्ये जगण्याच्या चिंध्या होतात हे लेखकाने एवढं भावस्पर्शी केलंय, की वाचकाचे डोळे पाणावतात. ‘पासंग’मधील ‘कवडसे’, ‘पासंग,’ ‘गोपी,’ ‘हिमालय’ या सगळ्याच कथांमधून मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे अतिशय हळुवारपणे घरंदाजपणाचा बाज ठेवून उलगडलेले दिसतात. त्यामुळेच देवघराचा हा देवमाणूस हिमालयासारखा उत्तुंग वाटतो.

श्रीपाद काळेंच्या कथेतील स्त्रिया कमालीच्या सोशीक, मुला-माणसांत, संसारात रमणाऱ्या, सांजवात, व्रतवैकल्ये, अतिथी स्वागत हेच त्यांचं कार्यक्षेत्र. उंबऱ्याची मर्यादा सांभाळणाऱ्या या नायिकांनी घरातली प्रसन्नता, संस्कार अबाधित ठेवले. बंडाची ऊर्मी दाबून ठेवली. ‘प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी किनार असतेच’ हा आशावाद त्यांच्या लिखाणात दिसतो.

मनाचा ठाव घेणारे कादंबऱ्यांतले काही प्रसंग
‘समर्पण’ या कादंबरीत श्रीपाद काळे यांनी ध्येयाने झपाटलेला, ग्रंथपूर्तीसाठी अहोरात्र वाचन, लेखन करणारा, सर्वस्व पणाला लावणारा ज्ञानतपस्वी साकारला आहे. त्याच्या पत्नीला तिचे सासरे (गुरुजी) विचारतात, ‘तू अशीच राहिलीस… नवऱ्याचे दैहिक सुख…, कधी आठवण झाली नाही? वंश वाढला नाही हा विचार कधी केला नाहीस?’ तेव्हाचं तिचं उत्तर म्हणजेच लेखकाची असामान्य प्रतिभाशक्ती. ‘ती सांगते, नाही. खरंच नाही. त्यांनी ग्रंथपूर्तीसाठी आयुष्य समर्पण केलं. मी त्यांच्यापायी आयुष्य, स्वत्व समर्पण केलं.’ ग्रंथपूर्तीनंतर त्या साधनेतून तो जागा होतो तेव्हा तीच त्याला आपली ओळख सांगते. तिचा त्याग त्याला कळतो. तिचंच ‘शारदा’ हे नाव तो ग्रंथाला देतो. हे अलौकिक लेखन मनाला भावतं.

‘चकवा’मधील आगाशे हा गरीब ब्राह्मण. दैवाने पूर्णपणे चकवलेला तो आणि घरासमोरचं बेढब, निष्पर्ण, पण सहस्रकरांनी फुललेलं चाफ्याचं झाड यांची सुंदर सांगड लेखकाने घातली आहे. ‘मीच नियतीला चकवतो’ सांगणारा आगाशे पोटच्या पोरासाठी मात्र नियतीसमोर हरायला तयार आहे. बापाच्या हृदयाची व्याकुळता लेखकाने अचूक मांडली आहे. ‘सूर आणि सुगंध’ यामध्ये ‘हळुवार नाजूक कळ्या हातावर हळूहळू उमलाव्या’ असा स्वर ही उपमाच रोहिणीचा स्वर सांगते. पुढे हा स्वरच तिचं आयुष्य संपवतो. हे खूपच भावस्पर्शी रेखाटलं आहे.

‘संचित’ या कादंबरीत लेखकाने निष्ठावान, अजातशत्रू, समाजासाठी झटणारा, कधीच हिशेबी आयुष्य न जगलेला सेवाभावी डॉक्टर उभा केला आहे. रस्त्यावरच्या उघड्या पोराला त्याच्या आईच्या परवानगीने स्वतःच्या घरी नेतात त्याला नाव देतात ‘प्रकाश.’ ‘खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. देता यायला लागलं, की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचं उत्तम सर्वांना देणं. आपले अश्रू रोखून हसण्याचं चांदणं पसरणं,’ ही त्यांची शिकवण. स्वतः ब्राह्मण असून, दलित वस्तीतल्या प्रकाशला ते नवं आयुष्य देतात.

मोठा झाल्यावर तो एकदाच आपल्या वस्तीवर जातो. व्यसनापायी चामडीचं फक्त अस्तर असलेला बाप, त्याचा गोणपाटावरचा उघडा देह, भाऊ, बहीण, आई सगळंच पोतेरं झालेलं हे सगळं तो बघतो. डॉक्टर आपल्याला याच समाजासाठी काहीतरी कर असं सांगतात, हे पटत असूनही नंतर स्वतःच्या पायावर उभा राहूनसुद्धा तो आपल्याच सुखी वर्तुळात राहतो. तेच संचित घेऊन जगतो. यात लेखकाने मोठं विदारक सत्य जगासमोर मांडलं आहे. यातून लेखकाची प्रचंड निरीक्षणशक्ती दिसते.

‘रानपाणी’मधली वाकणवाडी म्हणजे निसर्गाचा मुक्त आविष्कार. डोंगराच्या कपारीतून वाहणारा बारमाही झरा, फुलांचा बहर, देऊळ त्याच्या चारही बाजूंनी भरगच्च तुळशी. पावसाळ्यात हिरव्या चाऱ्यातील वस्तीकडे जाणारी लालबुंद डौलदार पायवाट, असंख्य औषधी वनस्पती. वाडीत कुसवेकरांचे चौसोपी खानदानी घर. दादा कुसवेकर निरक्षर विठोबाला वाकणवाडीतली जागा देतात आणि तो तिथे नंदनवन उभं करतो. रानातल्या त्याच्या विहिरीला दादा ‘रानपाणी’ नाव देतात. तेच कादंबरीचं शीर्षक. संपूर्ण कथानक ‘रानपाणी’ आणि तिथे कसणारा विठोबा यांच्या नात्यावर आहे. रानपाण्याशी एकरूप झालेला विठोबा शेवटी रानपाण्याच्या कुशीतच विसावतो. कादंबरी वाचताना देहभान विसरायला होतं. रानपाण्याला भेट देण्याचा मोह अनिवार होतो आणि मग प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर ‘रानपाणी’ वाचून श्रीपाद काळेंना वाडा येथे भेटायला एवढ्या आतुरतेने का गेले असतील, याची साक्ष पटते.

साहित्यकीर्तीचा परिमळ आसमंतात दरवळला…
कस्तुरीचा सुगंध सांगावा लागत नाही, तसंच श्रीपाद काळे यांचं साहित्यातलं योगदान. मानसन्मान स्वतःहून चालत आले. ‘पिसाट वारा’ या त्यांच्या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला. कोकण मराठी साहित्य परिषदेने पावसमध्ये त्यांचा भव्य सत्कार केला. गुजराती, कानडी, हिंदी भाषांतून भाषांतरे झाली. १९९६ साली लोकमान्य टिळक साहित्य पुरस्कार, कवी माधव पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. विविध साहित्य संमेलनांतून प्रमुख साहित्यिक म्हणून उपस्थिती, आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर अनेक कथांचं वाचन व मुलाखती, वाडा लायब्ररीमध्ये अध्यक्ष म्हणून भरीव योगदान, तसंच पत्नी इंदिरा काळे यांच्या नावे उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी ‘कोमसाप’ला आर्थिक देणगी इत्यादी सगळं करत असताना कुठेही त्यांनी मोठेपणा मिरवला नाही.

साहित्यसंपदेचा तेजोमय अमृतकुंभ
श्रीपाद काळे यांच्या तेजोमय अमृतकुंभातील काही निवडक साहित्यसंपदा -पिसाट वारा, संचित, समर्पण, चकवा, दवबिंदू, पासंग, रानपाणी, माया, अभुक्त, उमा, अजुनि चालतोचि वाट, पुढे पाऊल, तुमचे स्थान कोणते, कौटुंबिक हितगूज, दाणे आणि खडे, नवी घडी नवे जीवन, एक काळ एक वेळ, काळोखाची वाट, तुटलेले पंख, संकेत, संधिकाळ, हरवलेले स्वप्न इत्यादी जवळजवळ १२०० कथा व ५०हून अधिक कादंबऱ्यांचं लेखन एवढा अफाट लेखन-प्रपंच. तसंच विविध वृत्तपत्रं, नियतकालिकं, दिवाळी अंक यातून सातत्याने उत्तमोत्तम लेखनाची मेजवानी ते सतत देतच राहिले. खरोखरच साहित्य शारदेच्या मंदिरातलं एक सुंदर स्वप्न म्हणजेच श्रीपाद काळे!

आतिथ्यातली श्रीमंती
केवळ अण्णांना (श्रीपाद काळे यांना अण्णा म्हणत असत) भेटण्यासाठी पद्मश्री मधू मंगेश कर्णिक किती तरी वेळा वाडा येथे त्यांच्या घरी येत. वाडा येथे वाचनालयातर्फे २५-३० वर्षं साहित्य संमेलन भरत आहे. अण्णांनी याची सुरुवात केली. रेणू दांडेकर, वृंदा कांबळी, वैशाली पंडित, उषा परब, उल्का जोशी, प्रा. तरुजा भोसले माहेरच्या ओढीने वाड्याला येत. रवींद्र पिंगेंशी तर अण्णांची गाढ मैत्री. कवी जगदीश खेबूडकर, शं. ना. नवरे, शंकर वैद्य यांसारख्या थोर व्यक्ती या सरस्वतीच्या उपासकाला भेटण्यासाठी वाडा येथे आवर्जून येत. त्यांनी त्यांच्या घरी सुरू केलेल्या वेदपाठशाळेत एक आणासुद्धा न घेता आपल्याकडचं विद्याधन भरभरून दिलं.

अण्णा रिकामे कधीच बसत नसत. माडाच्या झावळ्यांपासून हीर काढणं, जानव्यासाठी सूत काढणं, वाती तयार करणं, द्रोण-पत्रावळी बनवणं, होमासाठी समिधा गोळा करणं… उद्योग अखंड चालूच असे. पत्नी इंदिराबाईंची उत्तम साथ, येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्याची आवड. जणू काही,

‘सुख शांतीच्या फुलांना
तिथे अक्षय्य बहर,
माऊलीच्या ग प्रेमाचा
सदा झरतो निर्झर’

त्यामुळे आलेली माणसं तिथे रमत. श्रीपाद काळे स्वच्छ धोतर, पांढरा अंगरखा, काळी टोपी असा साधा पोशाख परिधान करत; पण रस्त्याने जाताना लोक आदराने नम्र होत. व्रतस्थपणे साहित्यसेवा करणाऱ्या या ज्ञानयोग्याच्या सहवासासाठी लोक चातकाप्रमाणे आतुर असत.

कोकणच्या लाल मातीला आणि हिरव्याकंच सृष्टीला कवेत घेऊन केलेलं चौफेर लेखन वाचकाला कोकणाची आणि लेखकाची भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. एक दशग्रंथी ब्राह्मण, व्रतस्थ ज्ञानयोगी, साहित्यक्षेत्रातले तेजस्वी माणिक, निबंधकार व अर्थशास्त्रविषयक नियतकालिकाचे संपादक अशी ओळख असलेले श्रीपाद काळे म्हणजे कोकणचे भूषणच.

शारदेच्या प्रांगणी देहाचं सोनं झालं…
१८ जून १९९९चा दिवस मात्र दुर्दैवी ठरला. याच दिवशी वाडा वाचनालयाच्या प्रांगणातच सरस्वतीने तिचं हे लाडकं बाळ आपल्यात विलीन करून घेतलं. सरस्वतीच्या या महान उपासकाला यातनाविरहित मृत्यू आला. माझ्यासारख्या प्रत्येक सामान्य माणसासाठी श्रीपाद काळे त्यांच्या लेखनातून दीर्घकाळाचे सहप्रवासी ठरतील, आयुष्याच्या प्रत्येक अवघड वळणावर प्रकाशवाटा तयार करतील. असे माझे आवडते लेखक श्रीपाद काळे यांना विनम्र अभिवादन.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती…

  • मधुरा महेश माणगावकर
    (आचरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत; लेखिका, कवयित्री.)
    पत्ता : मनोरमा अपार्टमेंट, विद्यानगर, कणकवली, जि. सिंधुदुर्ग.
    मोबाइल : ९४२१२ ६३६३७
    ………
    सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
    ……
    (‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply