किंजवड्याचे शब्दप्रभू – बाळकृष्ण प्रभुदेसाई (सिंधुसाहित्यसरिता – १४)

बाळकृष्ण प्रभुदेसाई (मार्च १९४० – जानेवारी १९८०)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १४वा लेख… बाळकृष्ण प्रभुदेसाई यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे डॉ. उज्ज्वला सामंत यांनी…
………
साधारणपणे १९७० ते ८०च्या दशकातील कथाकारांनी ग्रामीण जीवनाचा अनुभव घेताना निसर्ग आणि मानवी मन उलगडण्याचा प्रयत्न केला. या प्रादेशिक व ग्रामीण कथाकारांमध्ये बाळकृष्ण प्रभुदेसाई हे नाव अग्रक्रमाने घेता येईल. मधू मंगेश कर्णिक, आरती प्रभू यांच्या साहित्यातून कोकणचे निसर्गसौंदर्य डोकावते; पण अस्सल कोकणी जीवनाचा आविष्कार बाळकृष्ण प्रभुदेसाई यांच्या लेखनातून अभ्यासता येतो.

व्यक्तिगत जीवन
बाळकृष्ण विनायक प्रभुदेसाई हे मार्च १९४०मध्ये किंजवडे (ता. देवगड) येथे जन्मले. शिक्षणासाठी व नोकरीसाठी त्यांनी गावोगाव वास्तव्य केले. संवेदनाक्षम मनाच्या ह्या लेखकाचे मन मात्र नोकरीत रमले नाही. व्यक्तिगत आयुष्य अस्वस्थ असूनही त्यांचा पिंड लेखनात रमला. साहित्य क्षेत्रात, विशेषत: नाट्यक्षेत्रात काही तरी करून दाखविण्याची इच्छा असणाऱ्या या कोकणवासीय लेखकाला अवघे चाळीस वर्षांचे आयुष्य लाभले. जानेवारी १९८०मध्ये त्यांचा कोल्हापूर येथे मृत्यू झाला.

लेखनविश्व
प्रभुदेसाई यांचे ‘जहाज’ (१९७७) व गंधर्व (१९८७) हे दोन कथासंग्रह, आदिवास (१९७८) व नायक (१९८३) (मरणोत्तर) या कादंबऱ्या आहेत. तसेच, ‘आला क्षण गेला क्षण’ व ‘कालचक्र एक क्षण थांबले’ ही त्यांची दोन नाटके अप्रकाशित आहेत.
त्यांचा लेखनकाल साधारणपणे १९६६ ते १९७४पर्यंत. त्यांच्या ‘जहाज’ या पहिल्या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य पुरस्कार व वाल्मिक पारितोषिक लाभले. तसेच मुंबई विद्यापीठाने ‘एमए’साठीही या कथासंग्रहाची निवड केली. यावरूनच या कथासंग्रहाची वाङ्मयीन गुणवत्ता लक्षात येते. कोकणच्या निसर्गसौंदर्याचा शब्दरूप आविष्कार खऱ्या अर्थाने अनुभवायचा असेल, तर ‘जहाज’ हा कथासंग्रह वाचावा.

साधारणपणे १९७० ते ८०दरम्यानचा कोकण मूर्तिमंत रूपात त्यांच्या लेखनातून दिसतो. हा लेखक केवळ कोकणच्या निसर्गसौंदर्यावर लुब्ध नाही, तर तेथील जीवन, व्यक्तिमनाचे आंतरिक द्वंद्व, मानसिक जडणघडण यांचे पडसाद त्यांच्या लिखाणातून दिसतात. व्यंकटेश माडगूळकरांच्या लेखनाचा प्रभाव देसाईंच्या लिखाणावर दिसतो; पण प्रभुदेसाई बाह्य व्यक्तिचित्रणे व निसर्गवर्णनापेक्षा आंतरिक द्वंद्व रेखाटण्यात रमताना दिसतात. तसेच संवेदनशीलता, कोकणभक्ती, जगण्याचे मूळ शोधण्याची वृत्ती, प्रतीकात्मकता अशा अनेक बाबतींत प्रभुदेसाई आरती प्रभूंच्या जातकुळीचे दिसतात; पण दोघांच्याही लेखनात वैविध्य दिसून येते.

कोकणी माणसाचा चिरपरिचित परिसर अगदी सहजपणे या लेखनात अंतर्भूत आहे. ‘फूल जितक्या सहज सुंदरपणे उमलावे तितक्या अकृत्रिमपणे कलाबीजाचा आविष्कार होत असतो,’ ह्यावर पूर्ण विश्वास असणारा हा लेखक.

वास्तव चित्रण
स्वानुभव हा त्यांच्या लेखनाचा पाया आहे. प्रतीकात्मकता, निसर्गसौंदर्य, जीवनानुभव, संस्कृती, नित्य अनुभव, नियतीच्या चौकटीतील निमूट जीवन, जगण्याचा अनुभव यांचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येतो. वास्तव रेखाटताना सर्जनशील मनाला न पटणाऱ्या गोष्टी प्रभुदेसाई मांडताना दिसतात. ‘गंधर्व’ या कथेमध्ये तानी भावणीच्या संदर्भात मामा ‘मुळात या भावणी कोकणात आणल्या कुणी? खोत इनामदारांनीच ना?’; ‘तानी भावीण असली म्हणून लगेच वाईट कशी? तिच्या पिढ्यान् पिढ्या गावानं नासवल्या तेव्हा चालतं’ या परखड बोलण्यातून किंवा ‘भावीण वाड्यावर चोरूनमारून आली तर चालते, पण राजरोस नको,’ हे विचार किंवा ‘नायक’ या कादंबरीतील पंढरी दलित लेखक आहे. त्या कादंबरीतील ‘त्या निष्प्रेम उजाड भूमीने जणू त्यांना जन्म देऊन दूर लोटून दिले होते आणि तरीसुद्धा चिवटपणे त्या कातळात रुजलेल्या करवंदीसारख्या त्याच्या आणि त्याच्या जमातीच्या पिढ्यान् पिढ्या त्या रणरणत्या उन्हात जणू होरपळून जात होत्या,’ हे अस्पृश्य समाजाचे वर्णन जगण्याच्या अस्वस्थतेसहित आले आहे. पंढरीच्या निमित्ताने लेखकाने लेखक, लेखक अनुभव, साहित्यविश्व व दलित लेखक यांविषयी चिंतन मांडले आहे. ‘आदिवास’ कादंबरीतील इंजा धनगराच्या गोष्टीतील वास्तव असो, उच्चवर्णीय समाजातील असूनही प्रभुदेसाई या सर्वांच्या दु:खाशी एकरूप होताना दिसतात. त्यांच्या व्यथा-वेदनांना शब्दरूप देताना दिसतात.

नियतीशरणता
प्रभुदेसाई यांच्या व्यक्तिरेखा सहसा नियतीला आव्हान देताना, नियतीविरोधात दंड थोपटताना दिसत नाहीत, तर जगरहाटीसमोर हार मानून निमूटपणे जगताना दिसतात. ‘आला क्षण गेला क्षण’मधील पापा पळशीकरही अशाच स्वभवाचे दिसतात. मुलगा आशुतोष व सून सुनंदा त्यांना त्रास देतात; पण त्यांची पन्नाशीची प्रेयसी सुवर्णा त्यांना स्वीकारण्याचा निर्णय घेते, तेव्हा मात्र ते कचरतात व मुलांबरोबर निघून जातात.

‘नायक’ कादंबरीतील पंढरीही शहरातून गावात आलेला हरिजन गावात सुधारणा करू इच्छितो; पण जातभाईंचा शून्य प्रतिसाद पाहिल्यावर हतबल होऊन तो मुंबईस निघून जातो.

स्त्रीचित्रण
प्रभुदेसाईंच्या कथा-कादंबऱ्यांत स्त्रीचित्रण ओघवते व पुसट आले आहे. परिस्थिती जाणून असलेली, तरी सावध असणाऱ्या, समर्पण भावना असणाऱ्या अशा त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत. पुरुषपात्रे स्त्रीच्या या समर्पण भावनेचा गैरफायदा घेताना दिसतात. उदा. सुलोचना – पंढरी, पापा – सुवर्णा.

‘गंधर्व’ कथेत जानकी भावणीवरून संशय घेतल्याने मामाने भावकी सोडली आणि तो मठात राहतो. आता उतारवयात तो तिला आपल्यासोबत ठेवू इच्छितो. व्यवहारी जगात हे नाते आदर्शवत होय.

प्रतीकात्मकता व शब्दसौंदर्य
प्रभुदेसाई आपले अनुभवविश्व कलाकृतीच्या अनुषंगाने बांधताना प्रतीकात्मकतेचा वापर करतात. ‘कापूसकोंड्याची गोष्ट’मधील ‘गाईचा डोळा’ असो, किंवा ‘गरूड’ या कथेतील ‘दर्या बघ कसा तळमळतोय – त्याला सांगता येईल का आपले दु:ख!’ ‘आजी गेली तेव्हा गर्द हिरवा घुमट अंधारून आला होता,’ ‘उन्हं हरवली होती,’ ‘काळोखात अजगराचे प्रचंड धूड त्यांच्या अंगावर सरकत जात होते,’ अशी प्रतिमा-प्रतीकांची सौंदर्यपूर्ण भाषा हा त्यांच्या लेखनाचा स्थायी भाव आहे. त्यांच्या कलाकृतीत कातळ, आभाळ, गिधाडे ही प्रतीके वेगवेगळ्या रूपात भेटतात आणि आशय संपन्न करतात.

लहान मुलाचे अनुभवविश्व साकारण्यात हा लेखक जास्त रमतो; पण उच्चवर्णीय ते दलित, (आदिवास, नायक) बाल ते वृद्ध (कापूसकोंड्याची गोष्ट, गंधर्व, शाळेचे दिवस) अशा वेगवेगळ्या विषयांच्या गाभ्याला त्यांची लेखणी स्पर्श करून जाते.

त्यांचे अनुभवविश्व हे त्यांनी स्वत: जगलेले आहे. त्यांच्या स्नुषा शशिकला देसाई ‘त्यांच्या लेखनातील बऱ्याच व्यक्तिरेखा अगदी काल-परवापर्यंत भेटत होत्या,’ असे सांगतात. निसर्गसौंदर्य, बोली, व्यक्ती रेखाटन, मानसिक द्वंद्व, प्रदेशांशी असणारी बांधिलकी, हुबेहूब चित्रण ही सर्व गुणवैशिष्ट्ये प्रभुदेसाईंच्या लेखनातून दिसतात. असा हा प्रदेशाशी शब्दाने बांधला गेलेला निर्मिक!

 • डॉ. उज्ज्वला यशवंत सामंत
  (मराठीच्या प्राध्यापिका, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण, जि. सिंधुदुर्ग)
  मोबाइल : ९४२१२ ६१४३९
  ई-मेल : samantuj@gmail.com
  ………
  सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
  ……
  (‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply