मालवणी मातीतील कथेचे झाड – लुई फर्नांडिस (सिंधुसाहित्यसरिता – १७)

लुई बस्त्याव फर्नांडिस (१ जून १९२२ – २ सप्टेंबर १९९२)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १७वा लेख… लुई फर्नांडिस यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे ऋतुजा केळकर यांनी…
………
स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळात अनेक ख्रिस्ती बांधवांनी मराठी भाषेत वैविध्यपूर्ण लेखन केले. कथेच्या माध्यमातून अनेक ख्रिस्ती लेखकांनी जीवनातील अनेक अनुभवांवर, समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषेवर नितांत प्रेम करणारा, कथा, कादंबरी, नाटक, व्यक्तिचित्रे, स्फुट असे विविधांगी कसदार लेखन करणारा, कोकणच्या लाल मातीतील एक थोर साहित्यिक, भारताच्या स्वातंत्र्यासाठी भूमिगत कार्य करणारा महान स्वातंत्र्यसैनिक म्हणजे लुई बस्त्याव फर्नांडिस.

लुई यांचा जन्म मालवणमधील गवंडीवाड्यात एका गरीब मच्छिमार कुटुंबात एक जून १९२२ रोजी झाला. लुई शाळेत उशिरा गेले. परिस्थितीमुळे त्यांना फारसे शिक्षण घेता आले नाही; मात्र सदानंद भांडारकर, दादा शिखरे यांच्याबरोबर ते पत्रकारितेचे धडे गिरवू लागले. सुरुवातीला लुई टोपण नावाने कथा लिहू लागले. आत्मविश्वास आल्यानंतर मात्र लुई यांनी खूप कथा लिहिल्या. साहित्यिक म्हणून ते खूप उशिरा प्रकाशात आले.

राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, ध्येयनिष्ठा इत्यादी मूल्यांची जाणीव लुई फर्नांडिस यांच्या कथा प्रकर्षाने व्यक्त करतात. सतत चाळीस वर्षे त्यांनी कथालेखन केले.

कोकणातील निसर्गसौंदर्य, विशाल समुद्रकिनाऱ्यावरील सागराची गाज, भरती-ओहोटीचा रमणीय देखावा, चांदण्या रात्रीचे नयनरम्य वर्णन, मालवण भागातील ऐतिहासिक किल्ले, देखावे यांचे वर्णन त्यांच्या कथांमध्ये व्यक्त झाले आहे. लुईंनी सुरुवातीला विविध दिवाळी अंकांमधून कथालेखन केले. दर्यावर्दी, ललना, जनयुग, मेनका, हंस, पैंजण, आघाडी, राजहंस, लोकप्रभा इत्यादींमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत असत. त्या वाचण्यासाठी अनेक जण आतुरलेले असत.

‘कोऱ्या पानाची फडफड’ हा त्यांच्या निवडक दहा कथांचा संग्रह त्यांच्या निधनानंतर १९९४ साली प्रसिद्ध करण्यात आला. ही त्यांची एकमेव छापील साहित्यकृती.

लुई फर्नांडिस यांच्या कथा विषयांत विविधता आहे. चले जाव आंदोलन, भारतीय कलांची अधोगती, हिंदू-मुस्लिम यांच्यातील संघर्ष, नवविवाहित स्त्रीची मानसिकता, गरिबीने हताश झालेले कुटुंब, प्रेम, मित्रत्व, कौटुंबिक नातेसंबंध यांसारखे अनेक विषय त्यांच्या लेखणीतून लीलया उतरले आहेत. समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांच्या सिद्धहस्त लेखणीने केले आहे. त्यांच्या कथांमध्ये मालवणी बोलीचा वापर झालेला असला, तरी त्यांच्या कथा स्वच्छ पुणेरी भाषेतच लिहिलेल्या असत. त्यांच्या लेखनावर कुणाचाही प्रभाव नव्हता. त्यामुळे त्यांची कथा ही खास त्यांची अशीच होती. ती रंजक होती. साधी, सोपी, सरळ कथनशैली. नेमके संवाद, अल्पाक्षरत्व आणि स्वत:च्याच भावविश्वात रमलेल्या नायक-नायिका, हे लुईंच्या कथांचे वैशिष्ट्य.

लुई कविमनाचे होतेच. परंतु देशप्रेमाने त्यांचे हृदय काठोकाठ भरलेले होते. चले जाव आंदोलनाच्या वेळी लुईंनी भूमिगत राहून स्वातंत्र्यलढ्याचे काम लिलया केले. लुईंचा वेश साधा, बोलणे फार कमी, चेहरा निरागस. त्यामुळे काळजात चाललेल्या उलथापालथीची छटासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नसे. साळसूदपणे पोलिसांच्या कारवाया ते बघायचे. हा साधा माणूस ‘इन्कलाब’वाला असेल, असे पोलिसांना स्वप्नातसुद्धा वाटत नसे. ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रक्षोभक बुलेटिन काढल्याच्या आरोपावरून त्यांना पकड वॉरंट निघाले होते; मात्र कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे त्यांना तुरुंगात जाणे परवडणारे नव्हते. त्यामुळे छुपा प्रचार ते आपल्या लेखनातून करत असत.

एकाहून एक सरस कथा लिहिणाऱ्या लुईंनी आपल्या जीवनात स्वत:ची एकही प्रकाशित वाङ्मयकृती पाहिली नाही. त्यांच्या अंतर्मनाची फडफड कोऱ्या कागदासारखी चालूच राहिली. समाजाचा एक घटक म्हणून लौकिकार्थाने त्यांचे जीवन कोऱ्या कागदासारखेच राहिले होते.

या थोर कथाकाराबाबतीत असे म्हणावेसे वाटते –
यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमीवर
नाही चिरा नाही पणती

दोन सप्टेंबर १९९२ रोजी या सिद्धहस्त साहित्यिकाचे निधन झाले. प्रसिद्धिपराङ्मुख असल्यामुळे त्यांचा मानसन्मान मालवण किंवा इतरत्रही झाला नाही. त्यांचा पहिला कथासंग्रह उपलब्ध नाही. त्यांच्या कथांवर संशोधन करून अनेकांनी पीएचडी, एमफिलसाठी प्रबंध लिहिले आहेत. यातच कथालेखक लुई फर्नांडिस यांचे यश सामावलेले आहे. मालवणी मातीतल्या या कथेच्या झाडाला, थोर साहित्यिक सुपुत्राला विनम्र अभिवादन.

सौ. ऋतुजा राजेंद्र केळकर
(ग्रंथपाल, बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण)
पत्ता : २३२३ क, राजशिल्प, धुरीवाडा, मालवण, जि. सिंधुदुर्ग
मोबाइल : ९४२०४२३७९०
…..
सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
……
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply