
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १८वा लेख… हरिहर आठलेकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे श्रद्धा वाळके यांनी…
………
लहानपणी माझ्या वडिलांनी पुस्तकांच्या अद्भुत दुनियेशी माझी ओळख करून दिली आणि कधीही न आटणारा आनंदाचा झराच जणू माझ्या हाती लागला. प्रत्येक वाचकाची स्वतःची अशी एक वेगळी आवड निर्माण होत जाते. माझीही झाली. एक वाचक म्हणून माझ्या भावविश्वाशी मिळतंजुळतं साधंसं, सामान्य जीवनावर आधारित साहित्य मला आवडू लागलं. मला आवडणाऱ्या पुस्तकांतले प्रसंग, घटना, व्यक्ती चित्रपट पाहिल्यासारख्या मी जिवंत पाहू लागले. माझ्या या वाचनप्रवासात मला भेटले माननीय हरिहर आठलेकर गुरुजी! मी त्यांना प्रत्यक्ष कधीच पाहिलं नाही, भेटलेही नाही; पण त्यांच्या पुस्तकांतून त्यांचा परिचय झाला. त्या परिचयाच्या शिदोरीवर सिंधुसाहित्यसरिता या मालिकेत त्यांच्या साहित्याविषयी लिहिण्याचं धाडस मी करते आहे.

‘वळणवाट’ हे मला अतिशय आवडलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक! ही आत्मकथा आहे आणि प्रवासवर्णनदेखील! एका प्रामाणिक निष्ठावंत शिक्षकाची शिक्षणविषयक तळमळ आठलेकर गुरुजींनी अतिशय सुरेख शब्दांत रेखाटली आहे. इतकी स्पष्ट, की कधीही न पाहिलेले आठलेकर गुरुजी, कधीही न पाहिलेला रायपाटण गाव, बऱ्याच व्यक्ती माझ्या नजरेसमोर जिवंत उभ्या राहत होत्या. त्यांच्या काळात जणू मी वावरते आहे असंच वाटत होतं. आजही पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्या या पुस्तकाचं वाचन करण्याचा मोह मला होतो आणि आजही पूर्ण पुस्तक वाचून होईपर्यंत न थांबण्याची अधीरता मी अनुभवतेच. माझे बाबाच आपली गोष्ट सांगत आहेत ही भावना आजही होतेच. वाचकांच्या मनात हे अढळपद मिळवण्याची ताकद गुरुजींच्या लेखणीत नक्कीच आहे.
आठलेकर गुरुजींनी आपला जीवनप्रवास या आत्मकथेत लिहिला आहे. कोकण म्हटलं, की नजरेसमोर उभा राहतो तो नागमोडी वळणाचा रस्ता! त्यापलीकडे काय आहे हे तिथे पोहोचल्याशिवाय समजणारच नाही. आठलेकर सरांचं आयुष्यही असंच वळणदार आहे. सरांनी अगदी लहानपणापासूनचा आपला जीवनप्रवास अतिशय उत्कंठावर्धकरीत्या या पुस्तकात सांगितला आहे. त्यांच्या आयुष्यात बऱ्याच अकल्पित गोष्टी घडत जातात आणि कलाटणी मिळत जाते तीही अचानकच! त्यांचं आयुष्य त्या अनुभवांनी अधिक समृद्ध होत जातं. नव्हे त्यांच्या आयुष्यात आलेली माणसं त्यांचं अनुभवविश्व अधिक समृद्ध करत जातात. त्यांचा एकंदर जीवनप्रवास आणि त्याचबरोबर कोकणाचं निसर्गसौंदर्यवर्णन एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी असंच आहे.
त्यांना प्राथमिक शिक्षक म्हणून आलेले अनुभव शिक्षकांच्या एका मोठ्या गटाचे प्रातिनिधिक अनुभव असल्याने वाचकाला आपलेसे वाटतात. पूर्वीच्या काळातल्या शिक्षकांचा संघर्ष, दगडधोंड्यांच्या वाटेवरची ती पायपीट, तो ध्येयवेडेपणा वाचून भारावल्यासारखं होतं.
‘वळणवाट’नंतर ‘मनातलं भूत आणि इतर कथा’ या बालकथेच्या पुस्तकातून गुरुजी पुन्हा मला भेटले. तेव्हा मी नवनियुक्त शिक्षक होते म्हणजे बालक नक्कीच नव्हते. तरीही एखाद्या बालकाच्या उत्साहाने ते पुस्तक मी पुन्हा पुन्हा वाचलं. गुरुजींच्या वेगळ्या प्रकारच्या साहित्याचा या पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा अनुभव आणि आनंद घेतला. या पुस्तकालादेखील मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा आपटे पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी लहान मुलांसाठी केलेल्या लेखनाची पोचपावती म्हणून त्यांचा ‘नंदूचे पत्र’ हा धडा बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेला होता.

आठलेकर गुरुजींचं आयुष्य म्हणजे अनुभवाचा प्रचंड मोठा खजिनाच आहे. त्यांच्या वळणवाट पुस्तकाच्या नावासारखी अकल्पित आणि सुंदर वळणं त्यांच्या आयुष्यात जागोजागी आहेत. त्या वळणांचा प्रभाव त्यांच्या लेखनावर पडलेला आपल्याला जाणवतो. त्यांच्या जीवनप्रवासात त्यांना किती तरी साखरमाणसं भेटली. त्यांनी ‘साखरमाणसं’ हे पुस्तक लिहून या माणसांना अजरामर केलं. या पुस्तकासाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. ‘वळणवाट’साठीदेखील अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला.
त्यांच्या आयुष्याने पुन्हा एकदा वळण घेतलं आणि सावंतवाडी येथील भटवाडीच्या वेदशाळेत एकवीस वर्षं त्यांनी मानद अध्यापक म्हणून काम केलं. ही भूमिकादेखील त्यांनी उत्तम वठवली. ‘क्रीतपुत्र’ या कादंबरीतून त्यांनी त्यांच्यावर झालेल्या ब्राह्मणी संस्कारांचा परिचय करून दिला आहे. कऱ्हाडे ब्राह्मणांची भाषा तर त्यांच्या सगळ्याच पुस्तकांतून वाचकाला अनुभवता येते.
सिंधुदुर्गाच्या साहित्यविश्वात गुरुजींचा वावरही उल्लेखनीय आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते संस्थापक सदस्य होते. जिल्हा साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते.
त्यांचे बरेच कथासंग्रह, कादंबऱ्या (उदा. क्रीतपुत्र, पांगोरा), बरेच ललित लेख, वैचारिक निबंध प्रसिद्ध आहेत. संप्रेषणाचा एक प्रभावी मार्ग म्हणजे वृत्तपत्र! आठलेकर गुरुजींनी ‘दैनिक प्रहार’मध्ये ‘अक्षरकोकण’साठी लेखन केलं आहे. साप्ताहिक व्याध, किरात आणि अन्य बऱ्याच नियतकालिकांसाठीसुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर यांचे लेखनिक ते एक सिद्धहस्त लेखक असा प्रवास असणारे गुरुजी वाचकांच्या मनात साखरपेरणी करीत होते. मनात मधुरता भरत होते. २०१४ साली त्यांना अप्पासाहेब गोगटे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला. तो त्यांचा उचित सन्मान म्हणता येईल.
त्यांना अनेक पुरस्कार मिळाले सन्मान मिळाले; पण त्यापेक्षाही तमाम वाचकांच्या मनात, आयुष्यात त्यांनी केलेली साखरपेरणी हाही त्यांच्याकडून वाचकांना मिळालेला अमूल्य पुरस्कारच आहे.
– श्रद्धा सतीश वाळके (रेश्मा बाबुराव आगलावे)
(प्राथमिक शिक्षिका)
पत्ता : मु. पो. मसदे विरण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०८
मोबाइल : ९४०४७ ७६६३३
ई-मेल : shraddhawalke80@gmail.com
………..
सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
……
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड