वेगळेपण जपणाऱ्या कोकणातील सर्वसामान्य महिलांच्या कर्तृत्वाचा नवरात्रोत्सवानिमित्ताने जागर

तळेरे (ता. कणकवली) :  श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ‘फ्रेम मी मीडिया’ यांच्या सहकार्याने आणि कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवानिमित्ताने यू-ट्यूबवर एका मालिका तयार करण्यात आली आहे. वेगळ्या वाटा निवडून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोकणातील नऊ महिलांच्या ‘कामाचा गौरव’ आणि त्यांच्या ‘कर्तृत्वाचा जागर’ या मालिकेत करण्यात आला आहे.

श्रुतिका पालकर

नवरात्रोत्सवात आदिशक्तीचा जागर केला जातो. वेगवेगळ्या रूपातील देवींचा महिमा अगाध आहे. त्याला वंदन करण्यासाठी दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावर्षी करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे उत्सवावर बंधने आली आहेत. मात्र महिलांचे कष्ट, जिद्द, वेगळ्या वाटेने चालताना त्यांना करावा लागणारा संघर्ष थांबलेला आणि संपलेला नाही. नेहमीच्या आणि प्रचलित उद्योगांमध्ये त्यांच्या छोट्या छोट्या कामांची गणना होत नसली, तरी कौटुंबिक दैनंदिन व्यवहार त्यांच्यामुळेच सुरू राहतात. त्यामुळेच महिलांच्या कामाची गणती होऊ शकत नाही. त्यांच्या या सतत कार्यरत राहण्याच्या वृत्तीलाच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सलाम करण्यासाठी नऊ दिवस नऊ महिलांचा जीवनपट उलगडणारा ‘कर्तृत्वाचा जागर’ साकारण्यात आला आहे.

सुवर्णा वायंगणकर

या उपक्रमात प्रामुख्याने महिला सक्षमीकरण, सबलीकरण या विषयावर भर देण्यात आले आहे. स्त्रियांना देवी मानल्या जाणाऱ्या आपल्या समाजातील स्त्रिया आणि त्या करत असलेल्या त्यांच्या कामाचा गौरव त्यातून करण्यात आला आहे. विशेष नऊ स्त्रियांचे कार्य व्हिडीओ स्वरूपात, नऊ वेगवेगळ्या भागात यूट्यूब चॅनेलवर दाखविण्यात येणार आहे.

लांजा येथील संगीत शिक्षिका योगिता तांबे या निसर्गातून होणारा नाद आणि त्यांला पारंपरिक संगीताची जोड देत आपली कला सादर करतात. विशेष म्हणजे त्या ७० हून अधिक पारंपरिक वाद्ये वाजवतात. गड-किल्ले सर करणाऱ्या सुवर्णा वायंगणकर गड-किल्ले संवर्धनासाठी आणि त्याचसोबत नऊवारी साडी नेसून वेगवेगळे किल्ले सर करीत आपली संस्कृती जपत आहेत. माया शृंगारे या आपल्या शेतात रानभाज्यांची शेती करतात. गावातील लोकांना औषधी संजीवनीरूपी रानभाज्या मोफत देतात. सामाजिक बांधिलकीची जाण असणाऱ्या आणि एक स्त्री असून दशक्रिया विधी करणाऱ्या श्रद्धा कदम या समाजसेवेचे कार्य करीत आहेत. निसर्ग हाच आपला कॅनव्हास समजून निसर्गातून उपलब्ध झालेल्या साधनांचा वापर करून दगडांचे चित्रण करणाऱ्या श्रुतिका पालकर निसर्गाला देव मानून आपली कला सादर करतात.

इंद्रायणी गावडे

आपल्या रुचकर हाताने भुकेलेल्यांची भूक भागवणाऱ्या इंद्रायणी ऊर्फ नंदा गावडे या ८४ वर्षे वयाच्या नानी ‘अन्नपूर्णा’ म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील फुगडी हा खेळ मनोरंजनासाठी तसेच संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी खेळला जातो. आरती परब ती कला जोपासत आहेत. आपल्या आयुष्याची कळ सोसत प्रेक्षकांना आदिवासी कला प्रकार कळसूत्री आणि चित्रकथी रूपातील बाहुल्यांचे खेळ करून मनोरंजन, समाज प्रबोधन आणि आपल्या ठाकर वारसा जपणार्‍या तनुश्री गंगावणे, प्रेमाचा जिव्हाळा कायम ठेवत वृद्धाश्रम चालवणाऱ्या आणि ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हेच मूल्य अंगी बाळगून जगणाऱ्या श्रेया बिर्जे अशा आपआपल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या या नऊ रणरागिणीच्या कार्याचा जागर करण्यासाठी ही मालिका तयार करण्यात आली आहे.

आरती परब

मालिकेचे दिग्दर्शन सुमित पाटील व किशोर नाईक यांनी केले आहे. छायाचित्रण व संकलन मिलिंद आडेलकर, आरती कादवडकर, मकरंद नाईक, संकेत जाधव यांनी सांभाळले आहे. 

लेखन वेद दळवी, कृष्णा कोरगावकर यांनी केले आहे. संकेत कुडाळकर, साक्षी खाड्ये, धीरज कादवडकर, मंगल राणे, अभिषेक तेंडुलकर,भरत शिंदे यांनी विशेष सहकार्य केले आहे.

यातील विशेष बाब म्हणजे या सगळ्या महिलांना मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी आपला आवाज दिला आहे. त्यात दीप्ती भागवत, स्पृहा जोशी, तन्वी पालव, ऋतुजा बागवे, सुरुची आडारकर, नयना आपटे, अश्विनी कासार, विमल म्हात्रे, चिन्मयी राघवन यांच्या समावेश आहे.

अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम मराठीसोबतच इंग्रजी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील असामान्य, सबला स्त्रियांबद्दलची माहिती पूर्ण जगापर्यंत पोहोचेल, असा विश्वास मालिकेच्या निर्मात्यांना आहे. या अनोख्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल टाटा-पॉवरच्या ‘सहेली’ ग्रुपनेही घेतली आहे.

कुड्याच्या पानांचे द्रोण करून, लोकांना पोटभर जेवू घालणाऱ्या ८४ वर्षांच्या नानी, म्हणजे साक्षात अन्नपूर्णादेवीच…
त्यांचा परिचय करून देणारा हा व्हिडिओ

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Leave a Reply