कोकणातील पहिले कौशल्य प्रशिक्षण केंद्र देवरूखला सुरू होणार

देवरूख : कोकणातील मुलांना रोजगाराची संधी मिळवून देणारे कोकणातील पहिलेच कौशल्य प्रशिक्षण केंद्र येथील आठल्ये, सप्रे, पित्रे स्वायत्त महाविद्यालयात सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमाचा प्रारंभ येत्या २६ ऑक्टोबरला होणार आहे.

चालू शैक्षणिक वर्षासाठी देवरूख शिक्षण मंडळाचे आठल्ये, सप्रे, पित्रे (स्वायत्त) महाविद्यालय कोकणातील मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्राची उभारणी करत असल्याची घोषणा अध्यक्ष सदानंद भागवत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. केंद्राची दुमजली सर्व साधनांनी युक्त इमारत होणार आहे. अडीच कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी उद्योजक आणि संस्थेचे मानद अध्यक्ष बाळासाहेब जोशी यांची १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. चार विविध अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. कोकणातील हे पहिलेच कौशल्य प्रशिक्षण केंद्र कोकणातील मुलांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करणारे ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, यूजीसी व एनएसओएफकडून कोकणातील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करण्याच्या दृष्टीने एकूण चार अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी त्यात प्रवेश घेऊ शकतात. उपयोजित रसायनशास्त्र, ग्रामीण संसाधन मॅपिंगसाठी भूमाहिती तंत्रज्ञान, श्वाश्वत कृषी तसेच बॅंकिंग आणि वित्त असे हे चार अभ्यासक्रम असून ते तीन वर्षांचे आहेत. या अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी तीस विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. शुल्क सुमारे तीस हजार रुपयांचे असेल. ७० टक्के कौशल्य आणि २० टक्के थीअरी असे अभ्यासक्रमाचे स्वरूप असेल. या अभ्यासक्रमांसाठी विविध कंपन्यांशी महाविद्यालयाने करार केला असून नोकरीची संधी लगेच मिळणार आहे. अभ्यासक्रमासाठी विविध समित्या स्थापन केल्या असून समन्वयक म्हणून प्रा. हेमंत चव्हाण काम पाहत आहेत.

या अभ्यासक्रमाचा प्रारंभ येत्या २६ ऑक्टोबरला होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू विश्वास पेडणेकर, संजय जगताप, डॉ. नरेश चंद्र, देणगीदार मानद अध्यक्ष बाळासाहेब जोशी उपस्थित राहणार आहेत. इमारतीचे भूमिपूजन दिवाळीत होणार आहे.

यावेळी उपाध्यक्ष प्रा. पांडुरंग भिडे, सचिव शिरीष फाटक, सदस्य कुमार भोसले यांच्यास प्राध्यापक उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply