‘कोमसाप’च्या मालवण शाखेने केली ‘पुलं गौरवगीता’ची निर्मिती

मालवण : पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. लेखन, संगीत, नाट्य अशा विविध क्षेत्रांत विपुल आणि दर्जेदार निर्मिती केलेल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या गौरवासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘पुलं गौरवगीता’ची निर्मिती केली आहे. पाच नोव्हेंबर अर्थात मराठी रंगभूमी दिनी या गीताच्या चित्रफितीचे उद्घाटन ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाइन सोहळ्यात झाले.

‘पुलं’च्या वाङ्मयीन, सांस्कृतिक आणि रंगभूमीविषयीच्या योगदानावर आणि त्यांच्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वावर आधारित गीताची रचना ‘कोमसाप’चे आजीव सदस्य आणि गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांनी केली आहे. ‘कोमसाप-मालवण’चे संगीत दिग्दर्शक माधवराव गावकर यांनी या गीताला संगीत आणि स्वर दिला आहे. चित्रफितीची निर्मिती गुरुनाथ ताम्हणकर आणि तेजल ताम्हणकर यांनी केली आहे.

सुरेश ठाकूर म्हणाले, ‘पु. ल. देशपांडे यांची जयंती आठ नोव्हेंबरला असतो. त्याच्या पूर्वसंध्येला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ही निर्मिती केली आहे. पु. ल. देशपांडे यांचे ज्या रंगभूमीसाठी योगदान आहे, त्या रंगभूमी दिनाचे औचित्य साधून आम्ही या चित्रफितीचे उद्घाटन केले. पु. ल. देशपांडे हे मराठी माणसांच्या जीवनातील एक चैतन्यशील लेणे आहे. विनोद, नाट्य, ललितलेखन, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, सामाजिक चिंतन अशा अनेक अंगांनी ‘पुलं’च्या लेखनाने महाराष्ट्र घडविला. अर्धशतकभर त्यांनी मराठी मनाचे रंजन आणि उद्बोधन केले. त्याबरोबर रंगमंच आणि रजतपटावरील अभिनयाच्या आणि संगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राला आनंद दिला. या चित्रफितीत तो संगीत रूपाने मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सर्वांना आमची ही भेट नक्कीच आवडेल.’

या वेळी गीतकार मधुसूदन नानिवडेकर, गायक आणि संगीतकार माधवराव गावकर, निर्मिती प्रमुख गुरुनाथ ताम्हणकर आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रुजारिओ पिंटो उपस्थित होते. ‘कोमसाप-मालवण’चे सचिव अनिरुद्ध आचरेकर यांनी आभार मानले.

(पुलं गौरवगीताचे बोल, तसेच व्हिडिओ सोबत देत आहोत.)

जय जय पुरुषोत्तमा…

वंदन करिती तुला रसिकजन जय जय पुरुषोत्तमा
कलागुणांचा तू अधिकारी गुणाढ्य सर्वोत्तमा

रसिकांवर किती गारूड केले शब्दा शब्दांमधुनि
विनोद नाटक गंभीर आशय, नीटस समीक्षेतुनि
पूर्वरंगचे प्रवासवर्णन आणि रंगपश्चिमा
जय-जय पुरुषोत्तमा

संगीत भोक्ता उत्तम वक्ता नाटक कर्ता गुणी
विनोदबुद्धी व्यक्ती वल्ली गुण गाईन आवडी
किती अलौकिक अद्भुत सद्गुण एकेठाई जमा
जय-जय पुरुषोत्तमा

तू पुरुषोत्तम… तू पुरुषोत्तम कुबेर साहित्याचा
सुंदर मी होणार दिला हा मंत्र एक जिद्दीचा

अष्टपैलूहून अधिक कलागुण त्याला नाही सीमा
जय जय पुरुषोत्तमा…

  • मधुसूदन नानिवडेकर

…..
(सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
……..
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply