दिवाळीसाठी रत्नागिरीतील कोविड सेंटर्स रोषणाईने नटली; रुग्णांसाठी प्रशासनाची व्यवस्था

रत्नागिरी : करोनाची बाधा झाल्याने रत्नागिरीत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आज (१४ नोव्हेंबर) रुग्णालयात राहूनही दिवाळीचा आनंद लुटता आला. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यासाठी खास व्यवस्था केली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने करोनावर चांगलेच नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील दैनंदिन रुग्ण संख्या गेले काही दिवस एकआकडी राखण्यात यश आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८५८२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१०७ म्हणजेच ९४.४६ टक्के रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळे रुग्णालयात असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

सध्या जिल्ह्यातील ११ कोविड सेंटरमध्ये अजूनही ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील गृह विलगीकरणात असलेले २६ जण वगळता ११ कोविड सेंटरमध्ये ६० रुग्ण उपचार घेत आहेत. ते घरी नसल्याने त्यांना दिवाळीचा आनंद लुटता येण्याची शक्यताच नव्हती. रत्नागिरीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी त्यावर मात करायचे ठरविले. त्यांच्यासह रत्नागिरीच्या आरोग्य विभागाने त्या रुग्णांनाही दिवाळीचा आनंद लुटण्यासारखे वातावरण तयार केले. दिवाळीच्या आनंदोत्सवात घरच्यांपासून दुरावलेल्या या करोनाबाधितांची दिवाळी अगदी घरच्यासारखीच साजरी होत आहे.

कोविड सेंटर असलेले महिला रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील वातावरण दिवाळीमुळे बदलून गेले आहे. या रुग्णांना करोनाची लागण झाली असली, तरी ते गंभीर नाहीत. त्यामुळे पुरेशी काळजी घेऊन तसेच त्यांचे औषधोपचार वेळेवर सुरू ठेवूनही त्यांना सणाचा आनंद देता येऊ शकतो, असा विचार त्यामागे आहे. श्वसनाला त्रास होणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी वगळता दरवाजासमोर विविध रंगांनी भरलेली आकर्षक रांगोळी, पणत्या, रोषणाईसाठी चमचमते कंदील असे आल्हाददायक आणि मंगलमय वातावरण रुग्णालयात तयार झाले आहे. रुग्णांना आज सकाळी फराळही देण्यात आला. दिवाळीचा पुरेपूर आनंद कोविड सेंटरमध्येही रुग्णांना घेता यावा, या उद्देशाने प्रयत्न करण्यात आले. आरोग्य यंत्रणेच्या या अगत्याने करोनाचे रुग्णदेखील भारावून गेले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply